Wednesday, 18 April 2018

गीता रहस्य २


गीता रहस्य प्रकरण दूसरे (कर्मजिज्ञासा)
या दूसऱ्या प्रकरणामध्ये टिळकांनी कर्म करताना कोणते कर्म करू असा प्रश्न आपल्या अनेक धर्मशास्त्रांमध्ये तसेच पाश्चात्यांच्या लेखनामध्ये कोठे कोठे आलेला आहे याचे विवेचन सविस्तरपणे अनेक उदाहरणे देऊन केलेले आहे. इतिहासातील कर्माकर्म-संशयाचे प्रसंग शोधून त्यावर प्रतिभावंतांनी लेखन केलेले आहे. उदा. महाभारतातील प्रसंग, मनुस्मृतीतील प्रसंग, शेक्सपियर यांची हॅमलेट, करायलनेस हि नाटके, वगैरे.
अहिंसा, सत्य, अस्तेय, कायावाचामनाची शुध्दता, व इंद्रियनिग्रह हे पाच सनातन नीतिधर्म आहेत. हिंसा करू नये असेच सर्व धर्मांमध्ये सांगितलेले आहे. परंतू मनुस्मृतीमध्ये आततायी म्हणजे दुष्ट मनुष्य तो गुरु आहे, म्हातारा अगर पोर आहे, का विद्वान ब्राह्मण आहे, इकडे न पाहता बेशक ठार करावा सांगितलेले आहे. अर्वाचीन फौजदारी कायद्याने ही आत्मसंरक्षणाचा हक्क काही मर्यादा ठेवून कबूल केला आहे. अशा प्रसंगी अहिंसे पेक्षा आत्मसंरक्षणाची योग्यता अधिक मानतात.
सत्य याबाबतीत सुध्दा असेच आहे. सत्याचे आचरण करावे असेच सर्व धर्म सांगतात. परंतू अपवादात्मक प्रसंगी परिस्थीती विचित्र होते. दरवडेखोरांच्या गोष्टीचा दाखला देऊन श्रीकृष्ण अर्जुनास कर्णपर्वामध्ये तर भीष्म युधिष्ठिरास शांतिपर्वामध्ये सांगतात—न बोलता सुटका होण्यासारखी परिस्थीती असेल तर काही झाले तरी बोलू नये; आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलण्यामुळे शंका येण्याचा संभव असेल तर, त्यावेळी सत्यापेक्षा खोटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांती ठरलेले आहे. कारण सत्यधर्म केवळ उच्चारणावर ठरत नसून ज्याने सर्वांचे कल्याण होते त्यावर ठरत असतो. मी खोटे बोलण्याने ख्रिस्ती धर्माचा अधिक प्रसार होतो तर त्यामुळे मी पापी कसा ठरणार असे ख्रिस्ताचा शिष्य पॉल याच्या तोंडचे उदगार बायबलच्या नव्या करारात दाखल असून, प्राचीन ख्रिस्ती धर्मोपदेशक कित्येकदा याचप्रमाणे आचरण करीत, असे ख्रिस्ती धर्माचा इतिहासकार मिलमन याने म्हटले आहे.
थट्टेमध्ये, बायकांशी बोलताना, विवाहप्रसंगी, प्राणावर संकट आले असता, गो-ब्राह्मणांचे रक्षणासाठी खोटे बोलले तर ते पातक नाही, असे महाभारत सांगते. तर भर्तृहरी म्हणतो,--तेजस्वी पुरूष आनंदाने प्राणही देतील पण आपली प्रतिज्ञा मोडणार नाही.
अस्तेय म्हणजे दूसऱ्याच्या संपत्तीचा ह्व्यास न करणे. परंतू चहुकडे दुष्काळ पडल्यामुळे विकत, मजुरी करून, किंवा धर्मार्थ ही अन्न मिळत नाही अशी आपत्ती प्राप्त झाल्यावर चोरीने आत्मसंरक्षण केले तर ते पाप नाही असे ही धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे.
अहिंसा, सत्य, अस्तेय, याच बरोबर इंद्रियनिग्रहाची सुध्दा सामान्यधर्मात गणना केली जाते. इंद्रियनिग्रहाची सुध्दा अपवाद आहेतच. म्हणून मनुष्याने कसे कर्म करावे असा गहन प्रश्न त्याच्यापुढे उभा रहातो. योगवसिष्ठातसुध्दा ज्ञानमूलक प्रवृत्तिमार्गाचाच उपदेश वसिष्ठांनी श्रीरामास केलेले आहे. तसेच या सर्व विषयांचे शास्त्रीयरित्या विवेचन करून त्यातील सामान्य मर्म महाभारतासारख्या धर्मग्रंथामध्ये कोठे तरी सांगणे जरूर होते, हे मर्म अर्जुनाचा कर्तव्यमोह घालविण्याच्या निमीत्ताने श्रीकृष्णाने त्यास उपदेश केला आहे. वेदांतातील गहन तत्त्वज्ञानाच्या आधारे कार्याकार्यव्यवस्थिती लावणारा हा प्राचीन संस्कृत भाषेतील एकमेव ग्रंथ आहे.

No comments:

Post a Comment