Wednesday, 18 April 2018

गीता रहस्य ८


गीता रहस्य प्रकरण आठवे (विश्वाची उभारणी व संहारणी)
या आठव्या प्रकरणामध्ये टिळकांनी ब्रह्मांडाच्या निर्मितीचा सांख्यशास्त्रानुसार सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तसेच हे सांख्यतत्त्व गीतेतील तत्त्वज्ञानाशी कोणत्या उद्देशाने सहमत आहे आणि कोणत्या उद्देशाने सहमत नाही अशा सर्व गोष्टींचे परिक्षण केलेले आहे.
प्रकृती कशी निर्माण होते, तीचा पसरा कसा वाढतो, कोणत्या तत्त्वाने, विनाश, इत्यादि या प्रकृतीच्या व्यापाराला विश्वाची उभारणी व संहारणी म्हणतात. कारण ही सृष्टी असंख्य पुरुषांचे फायद्यासाठीच प्रकृतीने निर्माण केली आहे. एका परमात्म्यास आपण अनेक व्हावे अशी बुध्दी झाल्यावर सृष्टी निर्माण झालेली आहे. याच न्यायाने अव्यक्त प्रकृती देखील स्वत:ची साम्यावस्था मोडून पुढे व्यक्त सृष्टी निर्माण करण्याचा निश्चय प्रथम करीत असते. निश्चय म्हणजेच व्यवसाय करण्याची बुध्दी होय. म्हणून प्रकृतीमध्ये व्यवसायात्मिक बुध्दी हा गुण प्रथम उत्पन्न होतो. साधे कार्य करण्यासाठी प्रथम बुध्दी व्हावी लागते, तसेच प्रकृतीला आपला पसारा वाढविण्यासाठी प्रथम बुध्दी व्हावी लागते. मनुष्यास होणारी बुध्दी आणि प्रकृतीला होणारी बुध्दी या दोन्ही एकाच वर्गातल्या आहेत. प्रकृतीला होणारी बुध्दी सुक्ष्म असली तरी तीचे ज्ञान मनुष्य़ास होते. एकजिनसीपणा सोडून बहुजिनसीपणा उत्पन्न होणे यास पृथकत्व म्हणतात. बुध्दीपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या पृथकपणाच्या या प्रकृतीच्या गुणाला अहंकार म्हणतात. पृथकपणा मी-तू या शब्दांनीच प्रथम व्यक्त होतो. व्यवसायात्मिक बुध्दी आणि अहंकार हे दोन व्यक्त गुण मूळ साम्यावस्थेतल्या प्रकृतीत उत्पन्न झाले म्हणजे प्रकृतीचा एकजिनसीपणा मोडला जाऊन तीच्यापासून अनेक पदार्थ बनू लागतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, व गंध या पंचमहाभूताच्या तन्मात्रा आहेत. या तन्मात्रांची इंद्रिये आहेत, ज्ञानेंद्रिये. या ज्ञानेंद्रियांची रचना मोठी विलक्षण आहे, कि एका इंद्रियाला एकच गुण समजतो. डोळ्यांना वास घेता येत नाही. नाकाला दिसत नाही. पाच गुणांपैकी पदार्थांचे अनेक भेद होऊ शकतात.  शब्द या गुणाचे लहान, मोठा, कर्कश, मंजुळ इत्यादि भेद होऊ शकतात. मूळ प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या पंचमहाभूतांचा सूक्ष्म इंद्रियांशी संयोग झाल्यानंतर सजीव प्राण्याचे शरीर तयार होते. पण हे शरीर जडच असते. इंद्रियांना प्रेरणा देणारे तत्त्व जड प्रकृतीपासून वेगळे असून त्यास पुरुष म्हणतात. पुरुष अकर्ता असून प्रकृतीच्या संयोगातून सृष्टि निर्माण होते. सत्व, रज, व तम या तिन गुणानेच प्रत्येकाचा स्वभाव बनत असतो. वेदांताच्या भाषेमध्ये कर्मानुसार लिंगशरीर नवे नवे जन्म घेते. जन्म घेताना आईबापाच्या शरीरातून जी द्रव्ये लिंगशरीर आकर्षून घेते त्या द्रव्यातही पुन: दूसरे भाव येत असतात. देवयोनि, मनुष्ययोनि, पशुयोनि, वृक्षयोनि, हे भेद या भावाच्या समुच्चयाचा परिणाम आहे. या सर्व भावात सात्विकतेचा उत्कर्ष होऊन जेव्हा मनुष्यास ज्ञानवैराग्य प्राप्त होते, तेव्हा कैवल्यपद प्राप्त होते तेव्हा लिंगशरिरातून सुटका होऊ शकते.
या अपार सृष्टिला एका वृक्षाची उपमा दिलेली आहे. अव्यक्त(प्रकृती) हे ज्याचे बी, बुध्दी हे ज्याचे खोड, अहंकार हा ज्याचा मुख्य पल्लव, मन व दहा इंद्रिये ज्याच्या आतल्या ढोल्या, तन्मात्रा ज्याच्या मोठ्या शाखा, आणि महाभुते ज्याच्या डहाळ्या, पाने फुले ही शुभाशुभ फळे, सर्व प्राणिमात्रांना आधारभूत, पुरातन ब्रह्मवृक्ष आहे. याला तत्त्वज्ञानरूपी तलवारीने छेदून तुकडे करावेत. ज्ञानी पुरुषाने जन्म, जरा व मृत्यु उत्पन्न करणारे मोहपाश तोडावेत. ममत्व, अहंकाराचा त्याग करावा. म्हणजे तो मुक्त होतो.
सृष्टिच्या संहारसमयी उलट क्रमाने सर्व व्यक्त पदार्थ अव्यक्तामध्ये लय पावतात. पृथ्वी मध्ये
पाण्यामध्ये, पाणी अग्निमध्ये, अग्नि वायुमध्ये, वायु आकाशामध्ये, आकाश तन्मात्रांमध्ये, तन्मात्रा अहंकारामध्ये, अहंकार बुध्दीमध्ये, बुध्दी प्रकृतीमध्ये, प्रकृती परब्रम्हामध्ये लय पावतात. असा हा संहारणीचा खेळ आहे.

No comments:

Post a Comment