Wednesday, 18 April 2018

गीता रहस्य ६


गीता रहस्य प्रकरण सहावे (आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार)
या सहाव्या प्रकरणामध्ये टिळकांनी आधिदैवत पंथाचे शास्त्रशुध्द पध्दतीने स्पष्टीकरण सविस्तरपणे अनेक उदाहरणे देऊन केलेले आहे. तसेच क्षेत्रक्षेत्रज्ञविचार गीतेमध्ये कोणत्या उद्देशाने आहे अशा सर्व गोष्टींचे परिक्षण केलेले आहे.
बुध्दीच्या दोन अर्थांचा भेद जेव्हा व्यक्त करणे जरूर पडते तेव्हा निवडानिवड करणाऱ्या शास्त्रीय बुध्दीस व्यवसायात्मिक बुध्दी म्हणतात. आणि वासनेमध्ये जी बुध्दी असते तीला वासनात्मक बुध्दी म्हणतात. गीतेमध्ये बुध्दी या शब्दाचा या दोन्ही अर्थाने प्रयोग केलेल आहे. कर्मयोगाचे विवेचन नीट समजण्यासाठी बुध्दी या शब्दाचे दोन्ही अर्थ नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. मनुष्य कोणतेही कर्म करू लागला म्हण्जे ते कर्म चांगले आहे किंवा वाईट आहे, करण्यासारखे आहे किंवा नाही, इत्यादि गोष्टींचा तो आपल्या व्यवसायात्मिक बुध्दी-इंद्रियांच्या मनांत होऊन सदर कर्म करण्यास तो प्रवृत्त होतो. असा या मनोव्यापाराचा क्रम आहे. कार्याकार्याचा निकाल करणे हा ज्या व्यवसायात्मिक बुध्दीचा व्यापार आहे ती बुध्दी ताळ्यावर असली म्हणजे मग भलभलत्या वासना मनात उत्पन्न होऊन मन बिघडत नाही, म्हणून प्रथम व्यवसायात्मिक बुध्दी शुध्द व स्थिर केली पाहिजे असा गीतेतल्या कर्मयोगशास्त्राचा पहिला सिध्दांत आहे. कर्माचा विचार करताना कर्माच्या परिणामाकडे पहाण्यापेक्षा ते कर्म करणाराची वासनात्मक बुध्दी कशी आहे हे प्रथम पाहिले पाहिजे असा गीतेचा सिध्दांत आहे. बुध्दी एकच असून चांगल्याची निवड करणे हा सात्विक धर्म त्या एकाच बुध्दीत पूर्वसंस्काराने, शिक्षणाने, इंद्रियनिग्रहाने किंवा आहारादिकांनी येत असतो; आणि या पूर्वसंस्कारादि कारणांच्या अभावी तीच बुध्दी केवळ कार्याकार्यनिर्णयाचे कामीच नव्हे तर, इतर बाबतीत ही राजस किंवा तामस होऊ शकते. आपली बुध्दी सात्विक करणे हे प्रत्येकाचे काम होय. इंद्रियनिग्रहानेच ते काम होऊ शकते. जोपर्यंत व्यवसायात्मिक बुध्दी मनुष्याचे खरे हित कशात आहे याची निवडानिवड न करता केवळ इंद्रियांच्या मर्जीप्रमाणे वागत असते तोपर्यंत त्या बुध्दीस शूध्द म्हणता येत नाही. म्हणुन मन व इंद्रिये बुध्दीच्या ताब्यात ठेवली पाहिजेत हे तत्त्व गीतेमध्ये अनेक वेळा सांगितले आहे. सर्व मनुष्यांमध्ये एकच आत्मा आहे हे तत्त्व बुध्दीमध्ये पक्के झाले पाहिजे. तीलाच आत्मनिष्ठ बुध्दी म्हणतात. व्यवसायात्मिक बुध्दी आत्मनिष्ठ झाल्यावर वासनात्मक बुध्दी आपोआप शुध्द व पवित्र राहून सात्त्विक कर्म घडते अध्यात्मदृष्ट्या हेच सर्व सदाचाराचे मूळ म्हणजे कर्मयोगशास्त्राचे रहस्य आहे. मन आणि बुध्दी ही विचार करण्याची साधने आहेत. जड शरीरामध्ये प्राणरूपी चेतना म्हणून आणखी एका तत्त्वाचा शरीरामध्ये समावेश केला पाहिजे. ज्या चित-शक्तीने जडामध्ये ही हालचाल किंवा व्यापार उन्नत होतो त्याला चेतना म्हण्तात. याखेरीज परक्याचे व माझे असा भेद ज्यामुळे उत्पन्न होतो तो एक निराळाच गुण आहे. कारण बुध्दी फक्त सारासार विचार करून निर्णय करणारी असल्यामुळे आपपरभेदाचे मूळ म्हणजे अहंकार हे तत्त्व वेगळेच आहे. ही मन, बुध्दि, चित्त, अहंकार ज्या पंचमहाभुतात्मक शरीरामध्ये रहातात त्याला गीतेमध्ये क्षेत्र म्हणतात. आणि या क्षेत्राला जो पूर्णत: जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या विचाराखेरीज बाह्य सृष्टिचा म्हणजे ब्रह्मांडाचा ही विचार करून काय निष्पन्न होते ते पहावे लागते त्याला क्षराक्षरविचार म्हणतात.

No comments:

Post a Comment