Wednesday, 18 April 2018

गीता रहस्य १


गीता रहस्य प्रकरण पहिले (विषय प्रवेश)
या पहिल्या प्रकरणामध्ये टिळकांनी आपल्या सर्व धर्मशास्त्रांचा तसेच पाश्चात्यांचा विचार यांचा श्रीमदभगवत-गीतेतील मतितार्थाशी काय संबंध आहे याचे विवेचन सविस्तरपणे केले आहे. गीता म्हणजे उपदेश. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये गीता पुष्कळ असल्या तरी श्रीमदभगवत-गीतेचे श्रेष्ठत्व निर्विवाद असल्यामुळे श्रीमदभगवत-गीतेचे परीक्षण करून त्यातील तात्पर्य सांगण्याचे कार्य अनेक पंडितांनी केलेले आहे. ग्रंथाचे परीक्षण दोन प्रकारचे असते; एक अंतरंगपरीक्षण व दुसरे बहिरंगपरीक्षण. समग्र ग्रंथाचे अवलोकन करून त्यातील मर्म, रहस्य मतितार्थ काढणे यास अंतरंगपरीक्षण म्हणतात. ग्रंथ कोठे व कोणी लिहिला, त्याची भाषा कशी, त्यात माधुर्य किती, शब्दरचनेची व्याकरणशुध्दता, कोणकोणत्या मतांचा, स्थलांचा, व्यक्तींचा उल्लेख, इत्यादि केवळ बाह्यांगाचे विवेचन यास बहिरंगपरीक्षण म्हणतात. संप्रदायानुसार गीतार्थ लिहीण्याचा प्रघात सुरू झाल्यावर निरनिराळे पंडित आपापल्या संप्रदायाच्या विचारानुसार गीतार्थ लिहू लागले. आणि त्या त्या संप्रदायामध्ये ते ते ग्रंथ मान्य होत गेले. या सर्व संप्रदायामध्ये श्री शंकराचार्यांचा संप्रदाय अतिप्राचिन आहे. श्री शंकराचार्यांचे म्हणणे असे आहे कि,.डोळ्यांना दिसणारे जगत  खरे नसून सर्वत्र एकच शुध्द व नित्य परब्रह्म भरलेले आहे. आणि त्याच्या मायेने नानात्वाचा भास होतो. .आत्मा मुळात परब्रह्मस्वरूप असतो. .आत्म्याच्या व  परब्रह्मस्वरूपाच्या ऎक्याचे पूर्ण ज्ञान म्हणजे अनुभवात्मक ओळख झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. हाच अद्वैतवाद आहे.
कोण्त्याही ग्रंथाचे तात्पर्य काढण्या साठी सात गोष्टीं लक्षात घ्याव्या लागतात. १.उपक्रम, २.उपसंहार, ३.अभ्यास, ४.अपूर्वता, ५.फळ, ६.अर्थवाद, ७.उपपत्ति.
उपक्रम म्हणजे ग्रंथाचा हेतु. उपसंहार म्हणजे ग्रंथाचा शेवट होय. अभ्यास म्हणजे त्या ग्रंथामध्ये अनेक वेळा कोणता मुद्दा सांगितलेला आहे. अपूर्वता म्हणजे या ग्रंथामध्ये नविन कोणता विषय सांगितलेला आहे. फळ म्हणजे या ग्रंथाचे प्रयोजन कोणते आहे, काय साध्य होणार आहे. अर्थवाद म्हणजे ग्रंथातील विषयावर आधी कोण कोण काय काय म्हणतात याचे विवेचन होय. उपपत्ति म्हणजे पूर्व लेखकांची मते कशी चूकीची आहेत, तसेच काही मते कशी बरोबर आहेत याची तर्कशास्त्रदृष्ट्या स्पष्ट करून सांगणे. टिळकांच्या मते श्रीमदभगवत-गीतेचे रहस्य प्रवृत्तिपर म्हणजे कर्मपरच आहे. याच रहस्याचे परिक्षण करून त्यातील संगति स्पष्ट करणे हाच या गीता-रहस्य या ग्रंथाचा हेतु आहे.

No comments:

Post a Comment