गीता रहस्य प्रकरण पाचवे (सुखदु:ख
विवेक)
या पाचव्या प्रकरणामध्ये
टिळकांनी आधिभौतिक सुखवादाचे शास्त्रशुध्द पध्दतीने स्पष्टीकरण सविस्तरपणे अनेक
उदाहरणे देऊन केलेले आहे. तसेच अध्यात्मिक सुख कोणते, गीतेमध्ये कोणते सुख
अपेक्षित आहे अशा सर्व गोष्टींचे परिक्षण केलेले आहे.
सुखदु:खे द्विविध माना
किंवा त्रिविध माना. त्यापैकी दु:ख कोणासच नको असते; म्हणून सर्व प्रकारच्या
दु:खांची अत्यंत निवृत्ती करणे आणि आत्यंतिक व नित्य सुखाची प्राप्ती करून घेणे
हाच मनुष्याचा परम पुरुषार्थ होय असे वेदांत व सांख्य दोन्ही शास्त्रातून म्हटले
आहे.
मनुष्य कानांनी ऎकतो,
त्वचेने स्पर्श करतो, डोळ्यांनी पहातो, जिभेने खातो व नाकाने वास घेतो; आणि
इंद्रियांचे हे व्यापार इंद्रियांच्या स्वाभाविक वृत्तीस अनुकूल किंवा प्रतिकूल
असतील त्याप्रमाणे मनुष्यास सुख किंवा दु:ख होत असते. ही सुखदु:खे जाणण्याचे
म्हणजे आपल्या पदरात बांधून घेण्याचे काम प्रत्येक मनुष्यास अखेरीस आपल्या मनानेच
करावे लागत असते. यावरून आधिभौतिक सुखदु:खाचा अनुभव होण्यास केवळ इंद्रियेच कारण असून त्यास
पुढे मनाचे साह्य असावे लागते. आणि आध्यात्मिक सुखदु:खे तर मानसिकच असतात. अशा रितीने
आधिभौतिक व आध्यात्मिक दोन्ही सुखदु:खाचा अनुभव मनावरच अवलंबून असतो. आपणांस जे
कर्म करायचे ते मनोनिग्रहाने त्यातील फलाशा सोडून सुखदु:खाच्या ठायी समबुध्दी ठेऊन
आपण करीत गेले तर कर्मे न सोडिता ही त्यांच्या दु:खाची बाधा आपणांस लागत नाही असे
गीता सांगते. फळाची आशा सोडणे म्हणजे फळ मिळाले असता ते सोडणे किंवा किंवा ते फळ
कोणासही कधीही न मिळावे असा नाही. फलाशा आणि कर्म करण्याची नुसती इच्छा यात पुष्कळ
भेद आहे.
शुभ-अशुभ प्राप्त झाले
असता जो नेहमी अनासक्त असून त्या शुभ-अशुभांचे अभिनंदन किंवा द्वेष करित नाही त्यास
स्थितप्रज्ञ म्हणतात. सुख पाहून फुरफुरून जाऊ नये आणि दु:खाने ख्ट्टू ही होऊ नये
तसेच ती सुखदु:खे निष्काम बुध्दीने सोशिली पाहिजेत. वेदांतशास्त्राच्या
परिभाषेमध्ये त्याला कर्म ब्रह्मार्पण करणे म्हणतात, तर भक्तीमार्गामध्ये
कृष्णार्पण म्हणतात. हेच गीतार्थाचे सार आहे. फलाशा सोडण्यास वैराग्याने
इंद्रियांचा व मनाचा पूर्ण निरोध करावा लागतो.
संसारातील दु:खे
टाळ्ण्यासाठी असंतोष व त्याच बरोबर कर्मे यांचा समूळ नाश करणे योग्य नसून फक्त
फलाशा सोडून सर्व कर्मे करीत रहाणे हेच श्रेयस्कर आहे. कर्माचा त्याग सांगितलेला
नसून कर्मफळाचा त्याग कर्मयोगशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आत्मप्रसादरुपी अत्यंत सुख आणि त्यालाच
जोडून असणारी कर्त्याची शुध्द बुध्दी या आध्यात्मिक कसोटीनेच कर्माकर्माची परिक्षा केली पाहिजे असा कर्मयोगशास्त्रामध्ये
अखेर सिध्दांत केला आहे. मन आणि बुध्दीच्या पलिकडे जाऊन नित्य आत्म्याचे नित्य
कल्याणच कर्मयोगशास्त्रामध्ये प्रधान मानले आहे. कर्मयोगमार्ग वैदिक धर्मामध्ये
अनादि कालापासून स्वतंत्रपणे चालत आलेला आहे. या मार्गाच्या प्रवर्तकांनी
वेदांताची तत्वे न सोडता कर्मयोगशास्त्राची उपपति नीट लावली आहे. भगवत-गीता याच
पंथाची आहे.
No comments:
Post a Comment