Wednesday, 18 April 2018

गीता रहस्य ४


गीता रहस्य प्रकरण चौथे (आधिभौतिक सुखवाद)
या चौथ्या प्रकरणामध्ये टिळकांनी आधिभौतिक सुखवादाचे शास्त्रशुध्द पध्दतीने स्पष्टीकरण सविस्तरपणे अनेक उदाहरणे देऊन केलेले आहे. कर्माकर्म विवेचनाचा अभ्यास करताना आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक असे तीन प्रकारचे मार्ग असून धर्मशास्त्रानुसार आध्यात्मिक मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. परंतू आध्यात्मिक मार्गाचे महत्त्व पूर्णपणे लक्षात येण्यासाठी आधिभौतिक, आधिदैविक या दोन्ही मार्गाचा अभ्यास करावा लागतो. कोणत्याही कर्माचे केवळ बाह्य फल पाहून नीतिचा व अनीतिचा निर्णय करणाऱ्या या पक्षास टिळकांनी आधिभौतिक सुखवाद हे नाव दिले आहे. कारण नीतिमत्तेच्या निर्णयार्थ या मताप्रमाणे ज्या सुखदु:खाचा विचार करावयाचा ती सर्व प्रत्यक्ष दिसणारी, बाह्य म्हणजे बाह्य पदार्थांचा इंद्रियांशी संयोग झाल्याने उत्पन्न होणारी अर्थात आधिभौतिक असून हा पंथ ही सर्व जगाचा केवळ आधिभौतिकदृष्ट्या विचार करणाऱ्या पंडितांनीच उपस्थित केलेला आहे. गीतेतील कर्मयोगशास्त्राचे स्वरूप व महत्व पूर्णपणे लक्षात येण्यास नीतिशास्त्राच्या या आधिभौतिक पंथाची जितकी माहिती असणे अत्यंत जरूर आहे तेव्हढीच ढोबळ माहिती या प्रकरणामध्ये टिळकांनी दिलेली आहे.
आधिभौतिक सुखवादामध्ये एक वर्ग निव्वळ स्वार्थसुखवाद्यांचा आहे. परलोक किंवा परोपकार सर्व खोटे असून आध्यात्मिक धर्मशास्त्रे लुच्च्या लोकांनी आपले पोट भरण्यासाठी लिहीली आहेत. या जगात खरा काय तो ज्या कृत्याने साधेल किंवा ज्याने आपल्या स्वत:च्या आधिभौतिक सुखाची अभिवृध्दी होईल तेच न्याय्य, प्रशस्त किंवा श्रेयकर समजले पाहिजे, असे या पंथाच्या लोकांचे म्हणणे आहे. परंतू अर्जुनाने त्रैलोक्याच्या राज्याला सुध्दा तिलांजली दिलेली होती. आधिभौतिक सुखाच्या या पंथाचा नुसता उल्लेख करणे म्हणजेच त्यांचे खंडन करणे होय.
दूसरे आधिभौतिक पंडित असे म्हणतात किं स्वत:चे सुख किंवा स्वार्थ जरी साध्य असला तरी लोकांना आपल्याप्रमाणेच सवलत दिल्याखेरीज आपल्याला सुख मिळणे शक्य नसल्यामुळे स्वसुखासाठीच दूरदर्शीपणाने इतर लोकांच्या सुखाकडे सुध्दा आपणांस पाहिले पाहिजे. या आधिभौतिक वाद्यांची गणना दूसऱ्या वर्गामध्ये टिळकांनी केलेली आहे.
आत्मा कोण आहे हे पहिल्याने पहा, ऎक, त्याचे मनन व ध्यान कर असा याज्ञवल्क्यांचा अखेरचा उपदेश आहे. या उपदेशाने आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाची एकदा ओळख पटली म्हणजे
मग सर्व जगच आत्ममय होऊन स्वार्थ आणि परार्थ ह भेद मनातून नाहिसा होतो. तोच उपदेश गीतेमध्ये भगवंताने सांगितलेला आहे. हाच पंथ सर्वोच्च प्रतिचा आहे.
भर्तृहरि नितिशतकामध्ये म्हणतो—आपला फायदा सोडून जे लोकांचे कल्याण करतात तेच खरे सत्पुरुष होय. स्वार्थ न सोडता लोकांसाठी झटणारे सामान्य पुरूष होय. आणि आपल्या फायद्यासाठी लोकांचे नुकसान करणारे पुरूष नसून राक्षस आहेत.
सुखाचे अजून दोन प्रकार आहेत—प्रेयस व श्रेयस. प्रेयस म्हणजे इंद्रियांस प्रिय वाटणारे तात्कालिक सुख होय. व श्रेयस म्हणजे आत्म्याचे खरे व चिरकालीन कल्याण होय. सज्जन मनुष्य प्रेयसा पेक्ष श्रेयसाचा मार्ग पत्करतो.

No comments:

Post a Comment