गीता रहस्य प्रकरण बारावे
(सिध्दावस्था व व्यवहार)
या बाराव्या प्रकरणामध्ये
टिळकांनी स्थितप्रज्ञाचे कार्य, सिध्द
पुरुषाचे सामाजिक कार्य, परोपकार व योगक्षेम इत्यादी विषयांचे वेदांतानुसार, सविस्तरपणे
विवेचन केलेले आहे.
ज्ञानी पुरुषाने सर्व
प्रापंचिक कर्मे निष्काम बुध्दिने करून सामान्य जनांस सदाचाराचा धडा घालून दिला
पाहिजे, किंबहुना हाच मार्ग अधिक श्रेयस्कर व ग्राह्य होय असे म्हटल्यावर, ज्ञानी
पुरुष जगातील व्यवहार कसे करतो हे पहाणे जरूरीचे आहे. त्यातूनच धर्माधर्म, कार्याकार्य,
कर्तव्याकर्तव्य यांचा निर्णय करण्यास जे साधन प्राप्त होते. हेच कर्मयोगाचे
वैशिष्ट्य आहे. शुध्द नीतीची तत्वे लोकांच्या मनात भरण्यासाठी सर्व नीतीचे मूळ जी
शुध्द वासना तीलाच मानवदेहधारी बनवून ज्ञानी व नीतिमान पुरुषांचे हे चित्र
कल्पनेने तयार केले, पण ही स्थिती काल्पनिक नसून मनोनिग्रहाने व प्रयत्नाने
इहलोकीच प्राप्त होते. ही काही सामान्य गोष्ट नाही. हजारो लोकांमध्ये एखादाच असा
प्रयत्न करतो, आणि असा प्रयत्न या हजारो लोकांमध्ये एखाद्यासच अनेक जन्मांनंतर परमावधीची
ही स्थिति शेवटी प्राप्त होते असे गीतेमध्ये स्पष्ट म्हटले आहे. नीतीच्या राज्यात
स्थितप्रज्ञ पुरुषांचा अधिकार असतो. त्यांच्या मनात कोणतीही काम्य बुध्दि नसते,
म्हणून कर्तव्याखेरीज दूसऱ्या कोणत्याच हेतूने कर्म करण्यास ते प्रवृत्त नसतात व
त्यामुळे पाप पुण्य हे शब्द अत्यंत शुध्द या पुरुषांच्या वर्तनास कधीच लागू होत
नाहीत. पाप पुण्य यांच्या पलिकडे त्यांची मजल गेलेली असते. कर्मयोगी
स्थितप्रज्ञाच्या बुध्दी प्रमाणे सर्व भूतांचे ठायी ज्यांची साम्य बुध्दि झाली आणि
ज्यांचा स्वार्थाचा सर्वस्वी परार्थात लय झाला त्याला नीति शास्त्र सांगण्याची
जरूर नाही, तो स्वत:च स्वयंप्रकाश झाला. गीतेमध्ये कर्माच्या विचारापेक्षा त्या
कर्माच्या प्रेरक बुध्दिचा विचार महत्वाचा मानते. ज्याची बुध्दि पूर्ण
साम्यावस्थेस पोचली तो लोकांना केवळ अधिभौतिक सुख मिळ्वून देण्यासाठी च आपले सर्व
व्यवहार करील हे संभवनीय नाही. तो दूसऱ्यांचे नुकसान करणार नाही हे खरे, पण हे
त्याचे मुख्य ध्येय नसून समाजातील मनुष्याची बुध्दि अधिकाधिक शुध्द होत जाऊन
आपल्याप्रमाणेच अखेर सर्व लोक जेणे करून आध्यात्मिक पूर्णावस्थेस पोचतील असे
प्रयत्न स्थितप्रज्ञ करीत असतो. मनुष्याचे हेच श्रेष्ठ कर्तव्य आहे. समाजात
मनुष्यांनी एकमेकाशी कसे वागावे याचा आत्मौपम्य बुध्दिचा जो हा सुलभ नियम तो इतका
व्यापक, सुबोध व विश्वतोमुख् आहे कि सर्व भूतांचे ठायी असलेले आत्मैक्य ओळखुन
आत्मवत समबुध्दिने दुसऱ्यांशी वागत जा. असा निर्बंध घालून दिल्यावर सविस्तरपणे
सांग्ण्याची आवश्यकता नसते. पूर्णावस्थेस पोचलेले कर्मयोगी सर्वभुतात्मैक्य ओळखून
सर्व भूतांशी निर्वैरपणे जरी वागत असले तरी अनासक्त बुध्दीने पात्रापात्रतेचा
सारासार विचार करून स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेले कर्म करण्यास चुकत नाहीत. अशा
रितिने केलेल्या कर्मामुळे कर्त्याच्या साम्य बुध्दिसही काही कमीपणा येत नाही.
ब्रह्मात्मैक्यज्ञानाने आपली बुध्दि निर्विषय, शांत, सर्व भूतांशी निर्वैर व सम
ठेवणे, आणि आपणांस ही स्थिती प्राप्त झाली म्हणून सामान्य अज्ञानी लोकांस न
कंटाळता, या लोकांची बुध्दि न बिघडविता देहकाल परिस्थिती प्रमाणे ज्यांना जे योग्य
असेल त्याचाच त्यांस उपदेश करून व स्वत:च्या निष्काम कर्तव्याचरणाने सदाचाराचा
यथाधिकार प्रत्यक्ष धडा घालून देऊन सर्वांस हळूहळू यथासंभव शांतपणे पण उत्साहाने
उन्नतीच्या मार्गास लावणे हाच ज्ञानी पुरुषांचा खरा धर्म आहे.
No comments:
Post a Comment