Wednesday, 18 April 2018

गीता रहस्य १०


गीता रहस्य प्रकरण दहावे (कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य)
या दहाव्या प्रकरणामध्ये टिळकांनी कर्मयोगशास्त्रातील सर्व विषयाचा वेदांतानुसार, सांख्यशास्त्रानुसार सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तसेच हे कर्मयोगशास्त्र गीतेतील तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना कसे महत्वाचे आहे याचे परिक्षण केलेले आहे.
पिंडी आणि ब्रह्मांडी दोन्ही च्या मुळामध्ये एकच नित्य व स्वतंत्र आत्मा आहे, तर पिंडीच्या आत्म्यास ब्रह्मांडीचा आत्मा ओळखण्यास कोणती हरकत असते. ती दूर कशी करावी हे प्रश्न निर्माण होतात. ते सोडविण्यासाठी नामरूपांचे विवेचन करणे जरूर पडते. कारण वेदांतदृष्ट्या परमात्मा आणि त्यावरील नामरूपांचे पांघरूण असे सर्व पदार्थांचे दोनच वर्ग होत असल्यामुळे नामरूपात्मक पांघरूणाखेरीज दूसरे काहीच शिल्लक रहात नाही. नामरूपांचे हे पांघरूण काही ठीकाणी दाट तर काही ठीकाणी पातळ असल्यामुळे दृष्य सृष्टीतील पदार्थांत सचेतन व अचेतन आणि सचेतनातही पशु, पक्षी, मनुष्य, देव, गंधर्व, राक्षस इत्यादि भेद होतात. मनुष्य एकदा कर्माच्या फेऱ्यात सापडल्यावर त्याच्या एका नामरूपात्मक देहाचा नाश झाल्यावर कर्मबंधनामुळे त्याला या सृष्टीमध्ये निरनिराळी रूपे प्राप्त होणे चुकत नाही. अध्यात्मदृष्ट्या या नामरूपात्मक परंपरेस जन्ममरणाचा फेरा म्हणतात. प्रत्येक मनुष्यास कर्मबंधनामुळे त्याच्या कर्मानुसार त्याला सुखदु:खे भोगावी लागतात. या कर्माचे संचित, प्रारब्ध, व क्रियमाण असे तीन प्रकार आहेत. प्रत्येक मनुष्याने आत्ताच्या क्षणापर्यंत केलेले जे कर्म या जन्मातले तसेच पूर्वीच्या सर्व जन्मातले ते सर्व त्याचे संचित म्हणजेच साठविलेले कर्म होय. या संचितापैकी ज्याकर्मांची फळे भोगण्यास सुरवात झाली त्यास प्रारब्ध म्हणतात. आणि क्रियमाण म्हणजे वर्तमानामध्ये करीत असलेले कर्म होय. मीमांसकांच्या दृष्ट्या सर्व कर्मांचे नित्य, नैमितीक, काम्य, व निषिध्द असे चार भेद आहेत. नित्यकर्मे केली नाहीत तर पाप लागते (संध्यादिक वगैरे) आणि निमित्त उपस्थित झाल्यावर ती करावी लागतात. म्हणून नित्य, व नैमितीक कर्मे करावी लागतात. काम्यकर्मे केल्यावर त्याची फळे भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तर निषिध्दकर्मे केल्यावर पाप लागते. म्हणून काम्य, व निषिध्दकर्मे करू नयेत असे मीमांसक सांगतात. ब्रह्मस्वरूपाचे व ब्रह्माच्या अलिप्तपणाचे ज्ञान होऊन तेच जन्मभर कायम ठेवण्यानेच कर्मबंधनातून सुटका होते. म्ह्णून कर्मबंधनातून सुटका होण्यास कर्म सोडणे हा मार्ग नसून कर्म सोडणे हा भ्रम आहे. कारण कर्म कोणालाच सोडत नसते. कर्म करताना ममत्वयुक्त आसक्ती सुटली की कर्म बंधनातून सुटका होते. खरे नैष्कर्म्य हेच आहे, कर्म सोडण्यात नाही. हेच तत्वज्ञान गीतेमध्ये सांगितलेले आहे. हाच खरा कर्मयोग श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलेला आहे. संपूर्ण गीतेचा हाच खरा सिध्दांत आहे. याचा अर्थ गीतेमध्ये  श्रीकृष्णाने अर्जुनास कर्मयोगाचाच उपदेश केलेला आहे.

No comments:

Post a Comment