गीता रहस्य प्रकरण सातवे (कापिलसांख्यशास्त्र
व क्षराक्षरविचार)
या सातव्या प्रकरणामध्ये
टिळकांनी न्यायशास्त्र व सांख्यशास्त्र यांचा शास्त्रशुध्द पध्दतीने सविस्तरपणे अभ्यास
केलेला आहे. तसेच सांख्यशास्त्र गीतेमध्ये कोणत्या उद्देशाने आहे अशा सर्व
गोष्टींचे परिक्षण केलेले आहे.
सृष्टीतील सर्व वस्तुंचे
वर्गीकरण करून खालच्या वर्गापासून वरच्या वर्गांत चढत चढत गेल्याने सृष्टीतील सर्व
वस्तुंचे मूलभूत वर्ग किती होतात, त्यांचे गुणधर्म कोणते, त्यापासून पुढे इतर
पदार्थ किती होतात आणि या गोष्टी कोणत्या प्रकारे सिध्द होऊ शकतात, इत्यादि सर्व
प्रश्नांचा न्यायशास्त्रांत विचार केलेला आहे.
सांख्यशास्त्राचा पहिला
सिध्दांत असा आहे कि, या जगात नवे असे काहीच उत्पन्न होत नाही; कारण शून्य म्हणजे
पूर्वी नव्हतेच त्यापासून शून्याखेरीज दूसरे काहीच निष्पन्न होणे शक्य नाही.
म्हणून उत्पन्न झालेल्या वस्तूत म्हणजे कार्यात जे गुण दृष्टीस पडतात, ते
ज्यापासून सदर वस्तु उत्पन्न झाली त्यांत म्हणजे कारणात सूक्ष्म रूपाने तरी असलेच
पाहिजेत असे नेहमी समजले पाहिजे. बौध्द व कणाद यांच्या मते एका पदार्थाचा नाश होऊन
त्यापासून दूसरा नवा पदार्थ तयार होतो. सांख्य व वेदांतास हे मान्य नाही. ते
म्हणतात,--वृक्षाच्या बीजामध्ये जी द्रव्ये होती ती नाहिशी न होता त्यांनीच
जमिनीतून व हवेतून दूसरी द्रव्ये आकर्षून घेतल्यामुळे बीजास अंकुर ही नवी अवस्था
प्राप्त होते. जगातील सर्व पदार्थांचे जे मूलभूत द्रव्य आहे, त्यास सांख्यशास्त्रामध्ये प्रकृती
म्हणतात. प्रकृती याचा अर्थ मूळचे असा असून या प्रकृतीपासून पुढे होणाऱ्या
पदार्थास विकृती म्हणतात. सांख्यशास्त्राप्रमाणे सृष्टीतील सर्व पदार्थांचे
अव्यक्त(मूळप्रकृती), व्यक्त(प्रकृतीचे विकार) आणि पुरुष(ज्ञ) असे तीन वर्ग होतात.
यापैकी व्यक्त पदार्थांचे स्वरूप प्रलयकाली नाश पावत असल्यामुळे मूळ अव्यक्त प्रकृती
आणि पुरुष ही दोनच तत्वे शिल्लक रहातात, आणि ही दोन्ही मूलतत्त्वे अनादि व स्वयंभू
आहेत, असा सांख्यशास्त्राचा सिध्दांत असल्यामुळे त्यास द्वैती(दोन मूलतत्त्वे
मानणारे) म्हणतात. प्रकृती आणि पुरुष यांच्या पलिकडे ईश्वर, काल असे कोणतेच मूलतत्त्वे ते मानीत नाहीत. पुरुष(आत्मा)
निर्गुण, अकर्ता आहे हे सांख्यशास्त्राचे मत जरी वेदांतास मान्य असले तरी एकाच
प्रकृतीला पहाणारे स्वतंत्र पुरुष मुळातच असंख्य आहेत ही पुरुषासंबंधाची कल्पना वेदांतास
मान्य नाही. उपाधिभेदामुळे जीव निरनिराळे भासतात, वस्तुत: सर्व ब्रह्म एकच आहे असे
वेदांत मानते. त्रिगुणातीत अवस्थेला भागवतामध्ये निर्गुण असे चौथे वर्गीकरण केलेले
आहे. सात्विक, राजस, व तामस या तीन वर्गापेक्षा वर्गीकरणाची तत्त्वे फाजील वाढवीत
बसणे युक्त नाही. म्हणून सत्त्वगुणाच्या अत्यंत उत्कर्षानेच अखेर त्रिगुणातीत अवस्था
प्राप्त होते असे मानून सात्विक वर्गामध्येच त्रिगुणातीत अवस्थेची गणना सांख्यशास्त्रामध्ये
केलेली आहे. आणि गीतेमध्ये सुध्दा तीच पध्दत स्विकारलेली आहे. गीतेमध्ये
वेदांतमार्गच सांगितलेला आहे. परंतु श्रीकृष्णाने वेदांत सांगताना सांख्य
परिभाषेचा अनेक ठीकाणी उपयोग केल्यामुळे गीतेमध्ये सांख्यशास्त्रातील विचार ग्राह्य
आहेत असा गैरसमज होण्याचा संभव आहे. म्हणून गीतेमध्ये सांख्यशास्त्रातील कोणते विचार
ग्राह्य आहेत आणि कोणते विचार ग्राह्य नाहीत हे टिळकांनी बारकाईने स्पष्ट केले
आहे. याचा जाणकारांनी बोध घेतला पाहिजे.
No comments:
Post a Comment