गीता रहस्य प्रकरण अकरावे
(संन्यास व कर्मयोग)
या अकराव्या प्रकरणामध्ये
टिळकांनी संन्यासधर्मानुसार कर्मयोगास कसे महत्व आहे हे वेदांतानुसार, सविस्तरपणे सांगितलेले
आहे.
ज्यांना जगाचा व्यवहार
नि:सार वाटतो ते संसारातून निवृत्त होतात व अरण्यात जाऊन धर्मशास्त्रानुसार
चतुर्थाश्रम घेतात म्ह्णून कर्मत्यागच्या या मार्गास संन्यास असे म्हणतात. त्यातील
प्रधान भाग कर्मत्याग आहे. संन्यास व कर्मयोग हे दोन्ही मार्ग नि:श्रेयस आहेत, तरी या दोहोंमध्ये
कर्मयोगाची योग्यता विशेष आहे. हा उपदेश गीतेमध्ये केलेला आहे. लोकव्यवहारदृष्ट्या
विचार करता बुध्दी निष्काम करून कर्म करीत रहाणे हा मार्गच सर्वात श्रेष्ठ आहे.
कारण संन्यास व कर्म ही दोन्ही त्यात कायम रहातात. असा उपदेश गीतेमध्ये केलेला
असून त्याचप्रमाणे अर्जुन युध्दास प्रवृत्त झाला. कर्मसंन्यास(सांख्य) व निष्काम
कर्म(योग) असे वैदिकधर्माचे दोन स्वतंत्र मार्ग जरी निष्पन्न झाले तरी ते
विकल्पात्मक न मानता संन्यासापेक्षा कर्मयोगाची मातब्बरी विशेष असा गीतेचा ठाम
सिध्दांत असल्यामुळे कर्मयोगाच्या श्रेष्ठतेसंबंधाने गीतेमध्ये पुढे आणखी म्हटले
आहे कि ज्या जगात आपण रहातो ते जग आणि त्यात आपले क्षणभर ही जिवंत रहाणे हे सुध्दा
कर्मच आहे, तर मग कर्म सोडून जाणार कोठे ? जिवनाबरोबर खाणे, पीणे इत्यादी सर्व
व्यवहार करावेच लागतात. संन्यासाला सुध्दा तहान-भुख आहेच की. नुसती कर्मवासना असणे
यात काही दु:ख नसून त्यातील आसक्ति हे दु:खाचे खरे मूळ आहे. म्हणून सर्व
प्रकारच्या वासना मारीत न बसता ज्ञानाने केवळ आसक्ति सोडून सर्व कर्मे करावीत असा
गीतेचा सिध्दांत आहे. चातुर्वर्ण्यव्यवस्थेप्रमाणे प्राप्त झालेली आपली कर्मे
निष्काम बुध्दिने कशी करावीत याचा प्रत्यक्ष धडा घालून देणे असा अर्थ लोकसंग्रह या
शब्दाचा गीतेमध्ये अभिप्रेत आहे. ज्ञानाचा व कर्माचा जो विरोध आहे तो ज्ञान व काम्यकर्माचा
आहे. ज्ञान व निष्काम कर्म यात अध्यात्मदृष्ट्या ही विरोध नसून कर्म अपरिहार्य
असल्यामुळे ज्ञानी पुरुषाने जन्मभर यथाधिकार निष्कामतेने कर्म करीत राहिले पाहिजे
हाच वेदांतातील सिध्दांत गीतेने स्विकारलेला आहे. व्यावहारिक कर्माच्या फलातील
आसक्ति इंद्रियनिग्रहाने कमी कमी करून कर्मे शुध्द म्हणजे निष्काम बुध्दिने करित
गेल्याने हळूहळू साम्यबुध्दिरूप आत्मज्ञान देहेंद्रियात मुरून जाते व शेवटी पूर्ण
सिध्दि प्राप्त होते. यथाशक्ति व यथाधिकार निष्काम कर्मे करित गेल्याने
कर्मबंधन सुटून चित्तशुध्दीने अखेर पूर्ण ब्र्ह्मज्ञान प्राप्त झाल्यावर सिध्दावस्थेत
ज्ञानी व स्थितप्रज्ञ पुरुषाने कर्मच करित रहावे. एखाद्या कर्माचा भयंकर प्ररिणाम
डोळ्यापुढे दिसत असताही शहाण्या पुरुषाने ते का केले पाहिजे हे सांगण्यासाठीच
गीता-शास्त्राची प्रवृत्ति झाली असून हेच गीतेचे वैशिष्ट्य आहे. कर्मक्षय म्हणजे
कर्म सोडणे असा अर्थ नसून फलाशा सोडल्यानेच कर्माचा क्षय होतो.
गीतेवरील सांप्रदायिक
टिकाकारांनी कर्ममार्गास गौणत्व देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, तो निव्वळ सांप्रदायिक
आग्रहाचा परिणाम असून, कर्मयोग हे ज्ञानप्राप्तीचे किंवा संन्यासाचे नुसते साधन
आहे. असा जो या टीकांतून ठिकठीकाणी शेरा दिलेला असतो, तो केवळ त्यांच्या पदरचा
असतो. गीतेचा खरा भावार्थ तसा नाही. गीतेवरील सन्यासमार्गीय टिकांतला हाच मुख्य
दोष आहे; टिकाकाऱ्याच्या या सांप्रदायिक आग्रहातून सुटका झाल्याखेरीज गीतेच्या खऱ्या
रहस्याचा बोध होणे कधीच शक्य नाही.
No comments:
Post a Comment