गीता रहस्य प्रकरण नववे (अध्यात्म)
या नवव्या प्रकरणामध्ये
टिळकांनी अध्यात्म या विषयाचा वेदांतानुसार, सांख्यशास्त्रानुसार सविस्तरपणे अभ्यास
केलेला आहे. तसेच हे या अध्यात्माचा गीतेतील तत्त्वज्ञानाशी कोणता संबंध आहे याचे
परिक्षण केलेले आहे.
प्रकृती व पुरुष हे
साख्यांचे द्वैत गीतेस मान्य नसून या दोहोंच्या पलिकडे तिसरे सर्वव्यापक, अव्यक्त
व अमृत तत्त्व चराचर सृष्टीच्या बुडाशी आहे. हा गीतेतील अध्यात्मज्ञानाचा पहिला सिध्दांत
आहे. प्रकृती, पुरुष व परमेश्वर
या त्रयीलाच अध्यात्मशास्त्रात अनुक्रमे जगत, जीव, व परब्रह्म म्हणतात. या तीघांचे स्वरूप, परस्पर संबंध यांचा निर्णय करणे हेच वेदांतशास्त्राचे मुख्य कार्य आहे.
गीते प्रमाणे उपनिषदातून अव्यक्त परमेश्वराचे स्वरूप कधी सगुण तर कधी
सगुण-निर्गुण असे उभयविध तर कधी निर्गुण असे तीन प्रकारांचे वर्णन
आढळते. उपासनेला प्रत्यक्ष मूर्तीच डोळ्यांपुढे पाहिजे असे नाही.
निराकार सुध्दा उपासना होऊ शकते. उपासकाच्या अधिकारभेदाप्रमाणे
उपास्य अव्यक्त परमेश्वराचे गुण ही उपनिषदातून सांगितले आहेत. अनादि, स्वतंत्र, एकजिनसी,
एक, निरंतर, सर्वव्यापी व्
निर्गुण अशा तत्त्वाच्या अस्तित्वाबद्दल उपनिषदातून तत्त्वज्ञान सांगितलेले आहे,
त्यापेक्षा आधिक संयुक्तीक तत्त्वज्ञान संपूर्ण जगामध्ये कोणीही सांगितलेले
नाही. अध्यात्मशास्त्रातील ब्राह्मी स्थिती कधी भक्तिमार्गाने,
तर कधी योगमार्गाने आणि कधी सांख्यमार्गाने प्राप्त होते असा गीतेचा
अभिप्राय आहे. सर्वाभूती एकच आत्मा, हा
समबुध्दियोग संपादन करुन तो सदैव जागृत ठेवणे हीच आत्मज्ञानाची व आत्मसुखाची पराकाष्ठा असून आपली
बुध्दि याप्रमाणे
शुध्द आत्मनिष्ठावस्थेस आणणे यातच मनुष्याचा परम पुरुषार्थ आहे
असा निश्चय केलेला आहे. मानवजातीचे आध्यात्मिक परम साध्य कोणते याचा
निर्णय झाल्यानंतर जगामध्ये आपणांस जे व्यवहार करवयाचे ते कोण्त्या धोरणाने केले पाहिजेत,
किंवा हे व्यवहार ज्या शुध्द बुध्दिने करावयाचे तिचे स्वरूप काय असा
जो कर्मयोगशास्त्रातील मुख्य प्रश्न त्याचा ही उलगडा यातच सहज होऊन जातो, कारण हे सर्व व्यवहार परिणामी ब्रह्मात्मैक्यरूप समबुध्दिस पोषक होतील अशा
रितीनेच केले पाहिजेत. कर्मयोगाचे हेच आध्यात्मिक तत्त्व गीतेमध्ये
सांगितलेले आहे. कर्माचे फायदे कोणते व परिणाम काय, हे कर्म का केले पाहिजे इत्यादि प्रश्नांचा कर्मयोगशास्त्रामध्ये करावा लागतो.
त्याप्रमाणे तो गीतेमध्ये केलेला आहे. सृष्टीचे
अगम्य मूलतत्त्व काय, व त्यापासून ही विविध दृश्यसृष्टी कशी झाली
या बद्दल वेदांतामध्ये जे तत्त्वज्ञान सांगितलेले आहे, त्यासारखे
प्रगल्भ, स्वतंत्र, व मूळात हात घालणारे
तत्त्वज्ञान दूसऱ्या कोणत्याही धर्मग्रंथामध्ये आढळत नाहीत.
No comments:
Post a Comment