Wednesday, 18 April 2018

गीता रहस्य १३


गीता रहस्य प्रकरण तेरावे (भक्तिमार्ग)
या तेराव्या प्रकरणामध्ये टिळकांनी भक्तिची व्याख्या, भक्तिमार्गाची श्रेष्टता ब्रह्मार्पणाचे विवेचन, भक्तिमार्गाचा आधिकारी इत्यादी विषयांचे वेदांतानुसार, सविस्तरपणे विवेचन केलेले आहे.
दिर्घकाळ एखाद्या वस्तुचा क्रम एकसारखा अबाधित आहे असे आढळून आल्यावर तो क्रम पुढे नित्य तसाच राहिल असे मानणे ही एक प्रकारची श्रध्दाच आहे; जरी त्यास अनुमान हे भपकेदार नाव दिले तरी हे अनुमान बुध्दिगम्य कार्यकारणात्मक नसून मुळात श्रध्दात्मकच आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. निर्गुण परब्रह्म सामान्य मनुष्यास कळणे कठीण एवढी एकच अडचण असेल तर बुध्दिमान पुरुषांमध्ये मतभेद असला तरी ही अडचण श्रध्देने दूर करता येण्यासारखी आहे. कारण या पुरुषांपैकी अधिक विश्वसनीय कोण हे पाहून त्याच्याच वचनावर श्रध्दा ठेऊ म्हणजे झाले. परमेश्वरस्वरूपाचे प्रेमाने आकलन करून मन तदाकार करणे हाच काय तो एक मार्ग आहे. हा मार्ग प्राचीन काळापासून चालत आलेले असून त्यालाच उपासना किंवा भक्ति म्हणतात. ईश्वराचे ठिकाणी निरतिशय प्रेम त्यास भक्ति म्हणतात. उपास्य ब्रह्म जरी सगुणच असले तरी तेच अव्यक्ताऎवजी व्यक्त व त्यातही विशेषत: मनुष्यदेहधारी स्विकारले म्हणजे तो भक्तिमार्ग होतो. अनादि, अनंत, अचिंत्य हे परमेश्वरस्वरूप जरी श्रेष्ठ आहे तरी ते निर्गुण, अज्ञेय, व अव्यक्त त्याचा जेव्हा अनुभव येतो तेव्हा उपास्य व उपासक हा द्वैतीभेद शिल्लक रहात नसल्यामुळे उपासनेला तेथपासून सुरुवात होऊ शकत नाही. ते साध्य आहे, साधन नव्हे; आणि तद्रुप होण्याची जी अद्वैताची स्थिती ती प्राप्त होण्यास उपासना हा उपाय आहे. मी व्यक्त असता मला मूर्ख लोक व्यक्त म्हणजे मनुष्यदेहधारी मानतात, परंतू ते खरे नसून माझे अव्यक्त स्वरूपच सत्य होय, असा श्रीकृष्णाने अर्जुनास स्पष्ट बोध केलेला आहे. मनाने ज्याचे मनन करता येत नाही, उलट मनच ज्याच्या मनशक्तीत येते ते खरे ब्रह्म असे तू समज; ज्याची प्रतिक म्हणून उपासना करतात ते खरे ब्रह्म नव्हे, असे पुन्हा श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलेले आहे. प्रतीक कोणतेही असो, भक्तिमार्गातील फल प्रतीकाचे ठायी आपण जो भाव ठेवतो त्याचे आहे, प्रतीकाचे नव्हे; म्हणून प्रतीका बद्दल तंटे करण्यात शहाणपणा नाही. वर्णाचा, आश्रमाचा, ज्ञातीचा किंवा स्त्री-पुरुषादिकांचाही भेद न ठेवता ब्रह्मात्मैक्यज्ञान व्यवहारलोप न करता आबाल-वृध्दास सुलभ करून देण्याचे गीतेतील भक्तिमार्गाचे हे सामर्थ्य व समता लक्षात आणली म्हणजे सर्व धर्म सोडून तू मला एकट्यालाच शरण ये, मी तुला पापांपासून मुक्त करेन, घाबरू नकोस. असा प्रतिज्ञापूर्वक गीताशास्त्राचा जो उपसंहार गीतेच्या शेवटच्या अध्यायात भगवंतांनी केला आहे त्यातील मर्म उघड होते. व्यवहारात पापांपासून अलिप्त राहून परमेश्वरप्राप्तीरूप आत्मश्रेय संपादन करण्याचे जे प्रत्यक्ष मार्ग किंवा उपाय ते धर्म अशा व्यापक अर्थी शब्दाचा या ठीकाणी उपयोग केलेला आहे.

No comments:

Post a Comment