गीता रहस्य प्रकरण तिसरे (कर्मयोगशास्त्र)
या तिसऱ्या प्रकरणामध्ये
टिळकांनी गीतेतील अनेक शद्बांच्या व्याख्या शास्त्रशुध्द पध्दतीने स्पष्ट करून
त्याचे विवेचन सविस्तरपणे अनेक उदाहरणे देऊन केलेले आहे. युध्दभुमीमध्ये अर्जुनावर
आलेला प्रसंग लोकविलक्षण नसून, संसारात अशा प्रकारची लहान मोठी संकटे ज्या अर्थी
सर्वांनास प्राप्त होत असतात, त्या अर्थी या कर्मयोगशास्त्राचे भगवतगीतेमध्ये जे
विवेचन केले आहे ते सर्वांनी शिकणे जरूर आहे. म्हणुन या शास्त्रातील प्रमुख शद्बांच्या
व्याख्या प्रथमत: समजावून सांगितलेले आहेत. प्रत्येक धर्मामध्ये ईश्वरप्राप्तीसाठी
काहीतरी कर्म करण्यास सांगितलेले असते. आपल्या वैदीक धर्मामध्ये नित्य, नैमित्तिक
व काम्य असे तीन भेद केलेले आहेत. नेहमी केलेच पाहिजे असे जे स्नानसंध्यादिक कर्म
ते नित्यकर्म होय. हे नित्यकर्म केल्याने
काही विषेश फल किंवा अर्थसिध्दी होत नाही, परंतू नित्यकर्म केले नाही तर
दोष घडतो. काही निमित्ताने करावे लागणारे कर्म हे नैमित्तिक कर्म होय, उदा. अनिष्ट
ग्रहशांती, प्रायश्चित्त वगैरे. याखेरीज काही विशिष्ट गोष्टीची इच्छा होऊन
त्यासाठी शास्त्रास अनुसरून जे कर्म केले जाते ते काम्य कर्म होय,
उदा.पुत्रप्राप्तीसाठी किंवा पाऊस पडण्यासाठी यज्ञ वगैरे. नित्य, नैमित्तिक व काम्य या तिन्ही कर्माखेरीज शास्त्राने जी
त्याज्य सांगितलेली आहेत, त्यांना निषिध्द कर्म म्हणतात. ही कर्मे करताना मनुष्याने
कोणता मार्ग स्विकारावा हे ठरविण्यास काही युक्ती आहे काय, आणि असल्यास कोणती हाच
गीतेचा प्रतिपाद्य विषय आहे. मनुष्य जे काही करतो –त्याचे खाणे, पिणे, खेळणे, बसणे,
ऊठणे, रहाणे, श्वासोच्छ्वास करणे, हसणे, रडणे, वास घेणे, पहाणे, बोलणे, ऎकणे, चालणे, देणे, घेणे, निघणे,
येणे, निजणे, जागे रहाणे, मारणे, लढाई करणे, मनन करणे, आज्ञा करणे,
निषेध करणे, दान करणे, यज्ञयाग करणे, शेती करणे, व्यापार करणे, निश्चय करणे, गप्प
बसणे इत्यादि सर्वांना गीतेमध्ये कर्म म्हणले आहे. मग ती कायीक, वाचिक असो कि
मानसिक असोत, किंबहुना जगणे, मरणे ही सुध्दा कर्मच आहेत.
कर्मापेक्षा ही अधिक गहन
शब्द आहे योग. योग या शब्दाचा अर्थ चित्तवृत्तींचा निरोध पातंजली योगसुत्रामध्ये
दिलेला आहे. परंतू इतका संकुचित अर्थ गीतेमध्ये अपेक्षित नाही. हे माहित करून
घेतले पाहिजे. योग हा शब्द युज म्हणणे, जोडणे या धातूपासून निघाला असून धात्वर्थ जोड, जुळणी, मिळवणी, संगती असा
हे, व पुढे तशी स्थिती प्राप्त होण्याचा उपाय, साधन म्हणजे कर्म असा ही झाला आहे.
योगक्षेम या शब्दात योग म्हणजे प्राप्त न झालेल्या वस्तु मिळविणे असा अर्थ आहे. योग
म्हणजे कर्म करण्याची विशेष प्रकारची कुशलता, युक्ती, चतुराई अशी या शब्दाची
व्याख्या गीतेतच मुद्दाम स्पष्टपणे केलेली आहे.
एकच कर्म करण्याचे जे अनेक
योग, साधने, किंवा मार्ग असतात त्यापैकी पराकाष्ठेचाचांगला व शुध्द मार्ग कोणता, तो
नेहमी आचरता येईल की नाही, नसल्यास त्याला अपवाद कोणते व् ते का उत्पन्न होतात, जो
मार्ग चांगला समजतो तो चांगला का, किंवा ज्यास वाईट म्हणतो वाईट का आणि हा चांगला वाईट पणा कोणी
व कोणत्या धोरणाने ठरवावा, इत्यादि गोष्टी ज्या शास्त्राने निश्चित करता येतात,
त्यास कर्मयोगशास्त्र किंवा गीतेतल्या संक्षिप्त रूपाप्रमाणे योगशास्त्र म्हणतात.
No comments:
Post a Comment