Wednesday, 18 April 2018

गीता रहस्य


गीता रहस्य
गीता आणि वेद यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे टिळकांनी केले त्यापेक्षा जास्त व्यवस्थित संशोधन कोणीहि केलेले नाही. अगाध विद्वत्ता, अमर्याद स्वार्थत्याग व आजन्म देशसेवा यामुळे जनताजनार्दनांच्या ह्रदयात टिळकांनी अद्वितीय स्थान मिळविले आहे. असे महात्मा गांधीजींनी बनारस-कानपूरच्या भाषणामध्ये म्हणले आहे.
गीता रहस्य हा ग्रंथ लो. टिळकांनी मंडालेच्या कारागृहामध्ये नोव्हेंबर१९१० ते मार्च१९११ या काळामध्ये लिहीला. १९१४मध्ये टिळकांनी मंडालेच्या कारागृहामधून सुटका झाली. परंतू  गीता रहस्याच्या हस्तलिखित वह्या लवकर परत मिळण्याचे चिन्ह दिसेना, तेव्हा टिळक म्हणाले,--भिण्याचे काहीएक कारण नाही. वह्या सरकारच्या कबजांत असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यामध्ये आहे. फुरसतीच्या वेळी जसाच्या तसा लिहून काढीन. ही आत्मविश्वासाची तेजस्वी भाषा साठीच्या घरात आलेल्या वयोवृध्द गृहस्थाची आहे आणि ग्रंथ साधा नसून गहन तत्त्वज्ञानाचा आहे. यावरून टिळकांच्या प्रवृत्तिपर प्रयत्नवादाची यथार्थ कल्पना येते. भक्तीची ज्ञानाशी व नंतर दोन्हींची व्यवहारातील कर्माशी सुंदर जोड घालून कर्मास प्रवृत्त करणारे हे कर्मयोगशास्त्र हाच श्रीमदभगवत-गीतेतील मतितार्थ टिळकांनी या गीता रहस्य ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. श्रीमदभगवत-गीता ही पाठांतरासाठी अथवा वृध्दांसाठी नाही. तर ती तारूण्यापासून अभ्यासण्याची आणि अनुभव व ज्ञानाच्या कसोटीवर आत्मसात करून आचरण्याची अथवा कर्म शुध्द करण्याचे रहस्य आहे. अशा या महान ग्रंथाचा सर्वांनी प्रेमाने व आदराने स्विकार केला पाहिजे.
प्रत्येक मनुष्याने शुध्द परमेश्वरस्वरूपाचे ज्ञान संपादन करून त्याद्वारा आपली बुध्दी निर्मल व पवित्र करणे हे पहिले कर्तव्य आहे, हे  टिळकांनी या गीता रहस्य ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले आहे. परंतु हा गीतेतील मुख्य मुद्दा नव्हे. युध्द करणे हा क्षत्रियाचा धर्म असला तरी उलटपक्षी कुलक्षयादि घोर पातके घडून जे युध्द मोक्षप्राप्तिरूप आत्मकल्याणाचा नाश करणार ते का करू नये, अशा कर्तव्यमोहांत युध्दारंभी अर्जुन पडला होता. म्हणून तो मोह घालविण्यासाठी शुध्द वेदांतशास्त्राधारे कर्माचे व त्याच बरोबर मोक्षप्राप्तिचे पूर्ण विवेचन करून आणि कर्मे कधीच सुटत नाहीत व सोडूहि नयेत असे ठरवून, ज्या युक्तीने कर्मे केली म्हणजे कोण्तेच पाप न लागता अखेर त्यानेच मोक्ष मिळतो, त्या युक्तीचे ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयोगाचेच गीतेमध्ये प्रतिपादन आहे, असा टिळकांचा अभिप्राय आहे.

No comments:

Post a Comment