Wednesday, 18 April 2018

गीता रहस्य


गीता रहस्य
गीता आणि वेद यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे टिळकांनी केले त्यापेक्षा जास्त व्यवस्थित संशोधन कोणीहि केलेले नाही. अगाध विद्वत्ता, अमर्याद स्वार्थत्याग व आजन्म देशसेवा यामुळे जनताजनार्दनांच्या ह्रदयात टिळकांनी अद्वितीय स्थान मिळविले आहे. असे महात्मा गांधीजींनी बनारस-कानपूरच्या भाषणामध्ये म्हणले आहे.
गीता रहस्य हा ग्रंथ लो. टिळकांनी मंडालेच्या कारागृहामध्ये नोव्हेंबर१९१० ते मार्च१९११ या काळामध्ये लिहीला. १९१४मध्ये टिळकांनी मंडालेच्या कारागृहामधून सुटका झाली. परंतू  गीता रहस्याच्या हस्तलिखित वह्या लवकर परत मिळण्याचे चिन्ह दिसेना, तेव्हा टिळक म्हणाले,--भिण्याचे काहीएक कारण नाही. वह्या सरकारच्या कबजांत असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यामध्ये आहे. फुरसतीच्या वेळी जसाच्या तसा लिहून काढीन. ही आत्मविश्वासाची तेजस्वी भाषा साठीच्या घरात आलेल्या वयोवृध्द गृहस्थाची आहे आणि ग्रंथ साधा नसून गहन तत्त्वज्ञानाचा आहे. यावरून टिळकांच्या प्रवृत्तिपर प्रयत्नवादाची यथार्थ कल्पना येते. भक्तीची ज्ञानाशी व नंतर दोन्हींची व्यवहारातील कर्माशी सुंदर जोड घालून कर्मास प्रवृत्त करणारे हे कर्मयोगशास्त्र हाच श्रीमदभगवत-गीतेतील मतितार्थ टिळकांनी या गीता रहस्य ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. श्रीमदभगवत-गीता ही पाठांतरासाठी अथवा वृध्दांसाठी नाही. तर ती तारूण्यापासून अभ्यासण्याची आणि अनुभव व ज्ञानाच्या कसोटीवर आत्मसात करून आचरण्याची अथवा कर्म शुध्द करण्याचे रहस्य आहे. अशा या महान ग्रंथाचा सर्वांनी प्रेमाने व आदराने स्विकार केला पाहिजे.
प्रत्येक मनुष्याने शुध्द परमेश्वरस्वरूपाचे ज्ञान संपादन करून त्याद्वारा आपली बुध्दी निर्मल व पवित्र करणे हे पहिले कर्तव्य आहे, हे  टिळकांनी या गीता रहस्य ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले आहे. परंतु हा गीतेतील मुख्य मुद्दा नव्हे. युध्द करणे हा क्षत्रियाचा धर्म असला तरी उलटपक्षी कुलक्षयादि घोर पातके घडून जे युध्द मोक्षप्राप्तिरूप आत्मकल्याणाचा नाश करणार ते का करू नये, अशा कर्तव्यमोहांत युध्दारंभी अर्जुन पडला होता. म्हणून तो मोह घालविण्यासाठी शुध्द वेदांतशास्त्राधारे कर्माचे व त्याच बरोबर मोक्षप्राप्तिचे पूर्ण विवेचन करून आणि कर्मे कधीच सुटत नाहीत व सोडूहि नयेत असे ठरवून, ज्या युक्तीने कर्मे केली म्हणजे कोण्तेच पाप न लागता अखेर त्यानेच मोक्ष मिळतो, त्या युक्तीचे ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयोगाचेच गीतेमध्ये प्रतिपादन आहे, असा टिळकांचा अभिप्राय आहे.

गीता रहस्य १


गीता रहस्य प्रकरण पहिले (विषय प्रवेश)
या पहिल्या प्रकरणामध्ये टिळकांनी आपल्या सर्व धर्मशास्त्रांचा तसेच पाश्चात्यांचा विचार यांचा श्रीमदभगवत-गीतेतील मतितार्थाशी काय संबंध आहे याचे विवेचन सविस्तरपणे केले आहे. गीता म्हणजे उपदेश. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये गीता पुष्कळ असल्या तरी श्रीमदभगवत-गीतेचे श्रेष्ठत्व निर्विवाद असल्यामुळे श्रीमदभगवत-गीतेचे परीक्षण करून त्यातील तात्पर्य सांगण्याचे कार्य अनेक पंडितांनी केलेले आहे. ग्रंथाचे परीक्षण दोन प्रकारचे असते; एक अंतरंगपरीक्षण व दुसरे बहिरंगपरीक्षण. समग्र ग्रंथाचे अवलोकन करून त्यातील मर्म, रहस्य मतितार्थ काढणे यास अंतरंगपरीक्षण म्हणतात. ग्रंथ कोठे व कोणी लिहिला, त्याची भाषा कशी, त्यात माधुर्य किती, शब्दरचनेची व्याकरणशुध्दता, कोणकोणत्या मतांचा, स्थलांचा, व्यक्तींचा उल्लेख, इत्यादि केवळ बाह्यांगाचे विवेचन यास बहिरंगपरीक्षण म्हणतात. संप्रदायानुसार गीतार्थ लिहीण्याचा प्रघात सुरू झाल्यावर निरनिराळे पंडित आपापल्या संप्रदायाच्या विचारानुसार गीतार्थ लिहू लागले. आणि त्या त्या संप्रदायामध्ये ते ते ग्रंथ मान्य होत गेले. या सर्व संप्रदायामध्ये श्री शंकराचार्यांचा संप्रदाय अतिप्राचिन आहे. श्री शंकराचार्यांचे म्हणणे असे आहे कि,.डोळ्यांना दिसणारे जगत  खरे नसून सर्वत्र एकच शुध्द व नित्य परब्रह्म भरलेले आहे. आणि त्याच्या मायेने नानात्वाचा भास होतो. .आत्मा मुळात परब्रह्मस्वरूप असतो. .आत्म्याच्या व  परब्रह्मस्वरूपाच्या ऎक्याचे पूर्ण ज्ञान म्हणजे अनुभवात्मक ओळख झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. हाच अद्वैतवाद आहे.
कोण्त्याही ग्रंथाचे तात्पर्य काढण्या साठी सात गोष्टीं लक्षात घ्याव्या लागतात. १.उपक्रम, २.उपसंहार, ३.अभ्यास, ४.अपूर्वता, ५.फळ, ६.अर्थवाद, ७.उपपत्ति.
उपक्रम म्हणजे ग्रंथाचा हेतु. उपसंहार म्हणजे ग्रंथाचा शेवट होय. अभ्यास म्हणजे त्या ग्रंथामध्ये अनेक वेळा कोणता मुद्दा सांगितलेला आहे. अपूर्वता म्हणजे या ग्रंथामध्ये नविन कोणता विषय सांगितलेला आहे. फळ म्हणजे या ग्रंथाचे प्रयोजन कोणते आहे, काय साध्य होणार आहे. अर्थवाद म्हणजे ग्रंथातील विषयावर आधी कोण कोण काय काय म्हणतात याचे विवेचन होय. उपपत्ति म्हणजे पूर्व लेखकांची मते कशी चूकीची आहेत, तसेच काही मते कशी बरोबर आहेत याची तर्कशास्त्रदृष्ट्या स्पष्ट करून सांगणे. टिळकांच्या मते श्रीमदभगवत-गीतेचे रहस्य प्रवृत्तिपर म्हणजे कर्मपरच आहे. याच रहस्याचे परिक्षण करून त्यातील संगति स्पष्ट करणे हाच या गीता-रहस्य या ग्रंथाचा हेतु आहे.

गीता रहस्य २


गीता रहस्य प्रकरण दूसरे (कर्मजिज्ञासा)
या दूसऱ्या प्रकरणामध्ये टिळकांनी कर्म करताना कोणते कर्म करू असा प्रश्न आपल्या अनेक धर्मशास्त्रांमध्ये तसेच पाश्चात्यांच्या लेखनामध्ये कोठे कोठे आलेला आहे याचे विवेचन सविस्तरपणे अनेक उदाहरणे देऊन केलेले आहे. इतिहासातील कर्माकर्म-संशयाचे प्रसंग शोधून त्यावर प्रतिभावंतांनी लेखन केलेले आहे. उदा. महाभारतातील प्रसंग, मनुस्मृतीतील प्रसंग, शेक्सपियर यांची हॅमलेट, करायलनेस हि नाटके, वगैरे.
अहिंसा, सत्य, अस्तेय, कायावाचामनाची शुध्दता, व इंद्रियनिग्रह हे पाच सनातन नीतिधर्म आहेत. हिंसा करू नये असेच सर्व धर्मांमध्ये सांगितलेले आहे. परंतू मनुस्मृतीमध्ये आततायी म्हणजे दुष्ट मनुष्य तो गुरु आहे, म्हातारा अगर पोर आहे, का विद्वान ब्राह्मण आहे, इकडे न पाहता बेशक ठार करावा सांगितलेले आहे. अर्वाचीन फौजदारी कायद्याने ही आत्मसंरक्षणाचा हक्क काही मर्यादा ठेवून कबूल केला आहे. अशा प्रसंगी अहिंसे पेक्षा आत्मसंरक्षणाची योग्यता अधिक मानतात.
सत्य याबाबतीत सुध्दा असेच आहे. सत्याचे आचरण करावे असेच सर्व धर्म सांगतात. परंतू अपवादात्मक प्रसंगी परिस्थीती विचित्र होते. दरवडेखोरांच्या गोष्टीचा दाखला देऊन श्रीकृष्ण अर्जुनास कर्णपर्वामध्ये तर भीष्म युधिष्ठिरास शांतिपर्वामध्ये सांगतात—न बोलता सुटका होण्यासारखी परिस्थीती असेल तर काही झाले तरी बोलू नये; आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलण्यामुळे शंका येण्याचा संभव असेल तर, त्यावेळी सत्यापेक्षा खोटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांती ठरलेले आहे. कारण सत्यधर्म केवळ उच्चारणावर ठरत नसून ज्याने सर्वांचे कल्याण होते त्यावर ठरत असतो. मी खोटे बोलण्याने ख्रिस्ती धर्माचा अधिक प्रसार होतो तर त्यामुळे मी पापी कसा ठरणार असे ख्रिस्ताचा शिष्य पॉल याच्या तोंडचे उदगार बायबलच्या नव्या करारात दाखल असून, प्राचीन ख्रिस्ती धर्मोपदेशक कित्येकदा याचप्रमाणे आचरण करीत, असे ख्रिस्ती धर्माचा इतिहासकार मिलमन याने म्हटले आहे.
थट्टेमध्ये, बायकांशी बोलताना, विवाहप्रसंगी, प्राणावर संकट आले असता, गो-ब्राह्मणांचे रक्षणासाठी खोटे बोलले तर ते पातक नाही, असे महाभारत सांगते. तर भर्तृहरी म्हणतो,--तेजस्वी पुरूष आनंदाने प्राणही देतील पण आपली प्रतिज्ञा मोडणार नाही.
अस्तेय म्हणजे दूसऱ्याच्या संपत्तीचा ह्व्यास न करणे. परंतू चहुकडे दुष्काळ पडल्यामुळे विकत, मजुरी करून, किंवा धर्मार्थ ही अन्न मिळत नाही अशी आपत्ती प्राप्त झाल्यावर चोरीने आत्मसंरक्षण केले तर ते पाप नाही असे ही धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे.
अहिंसा, सत्य, अस्तेय, याच बरोबर इंद्रियनिग्रहाची सुध्दा सामान्यधर्मात गणना केली जाते. इंद्रियनिग्रहाची सुध्दा अपवाद आहेतच. म्हणून मनुष्याने कसे कर्म करावे असा गहन प्रश्न त्याच्यापुढे उभा रहातो. योगवसिष्ठातसुध्दा ज्ञानमूलक प्रवृत्तिमार्गाचाच उपदेश वसिष्ठांनी श्रीरामास केलेले आहे. तसेच या सर्व विषयांचे शास्त्रीयरित्या विवेचन करून त्यातील सामान्य मर्म महाभारतासारख्या धर्मग्रंथामध्ये कोठे तरी सांगणे जरूर होते, हे मर्म अर्जुनाचा कर्तव्यमोह घालविण्याच्या निमीत्ताने श्रीकृष्णाने त्यास उपदेश केला आहे. वेदांतातील गहन तत्त्वज्ञानाच्या आधारे कार्याकार्यव्यवस्थिती लावणारा हा प्राचीन संस्कृत भाषेतील एकमेव ग्रंथ आहे.

गीता रहस्य ३


गीता रहस्य प्रकरण तिसरे (कर्मयोगशास्त्र)
या तिसऱ्या प्रकरणामध्ये टिळकांनी गीतेतील अनेक शद्बांच्या व्याख्या शास्त्रशुध्द पध्दतीने स्पष्ट करून त्याचे विवेचन सविस्तरपणे अनेक उदाहरणे देऊन केलेले आहे. युध्दभुमीमध्ये अर्जुनावर आलेला प्रसंग लोकविलक्षण नसून, संसारात अशा प्रकारची लहान मोठी संकटे ज्या अर्थी सर्वांनास प्राप्त होत असतात, त्या अर्थी या कर्मयोगशास्त्राचे भगवतगीतेमध्ये जे विवेचन केले आहे ते सर्वांनी शिकणे जरूर आहे. म्हणुन या शास्त्रातील प्रमुख शद्बांच्या व्याख्या प्रथमत: समजावून सांगितलेले आहेत. प्रत्येक धर्मामध्ये ईश्वरप्राप्तीसाठी काहीतरी कर्म करण्यास सांगितलेले असते. आपल्या वैदीक धर्मामध्ये नित्य, नैमित्तिक व काम्य असे तीन भेद केलेले आहेत. नेहमी केलेच पाहिजे असे जे स्नानसंध्यादिक कर्म ते नित्यकर्म होय. हे नित्यकर्म केल्याने  काही विषेश फल किंवा अर्थसिध्दी होत नाही, परंतू नित्यकर्म केले नाही तर दोष घडतो. काही निमित्ताने करावे लागणारे कर्म हे नैमित्तिक कर्म होय, उदा. अनिष्ट ग्रहशांती, प्रायश्चित्त वगैरे. याखेरीज काही विशिष्ट गोष्टीची इच्छा होऊन त्यासाठी शास्त्रास अनुसरून जे कर्म केले जाते ते काम्य कर्म होय, उदा.पुत्रप्राप्तीसाठी किंवा पाऊस पडण्यासाठी यज्ञ वगैरे. नित्य, नैमित्तिक व काम्य या तिन्ही कर्माखेरीज शास्त्राने जी त्याज्य सांगितलेली आहेत, त्यांना निषिध्द कर्म म्हणतात. ही कर्मे करताना मनुष्याने कोणता मार्ग स्विकारावा हे ठरविण्यास काही युक्ती आहे काय, आणि असल्यास कोणती हाच गीतेचा प्रतिपाद्य विषय आहे. मनुष्य जे काही करतो –त्याचे खाणे, पिणे, खेळणे, बसणे, ऊठणे, रहाणे, श्वासोच्छ्वास करणे, हसणे, रडणे, वास घेणे,                                       पहाणे, बोलणे, ऎकणे, चालणे, देणे, घेणे, निघणे, येणे, निजणे, जागे रहाणे, मारणे, लढाई करणे, मनन करणे, आज्ञा करणे, निषेध करणे, दान करणे, यज्ञयाग करणे, शेती करणे, व्यापार करणे, निश्चय करणे, गप्प बसणे इत्यादि सर्वांना गीतेमध्ये कर्म म्हणले आहे. मग ती कायीक, वाचिक असो कि मानसिक असोत, किंबहुना जगणे, मरणे ही सुध्दा कर्मच आहेत.
कर्मापेक्षा ही अधिक गहन शब्द आहे योग. योग या शब्दाचा अर्थ चित्तवृत्तींचा निरोध पातंजली योगसुत्रामध्ये दिलेला आहे. परंतू इतका संकुचित अर्थ गीतेमध्ये अपेक्षित नाही. हे माहित करून घेतले पाहिजे. योग हा शब्द युज म्हणणे, जोडणे या धातूपासून निघाला  असून धात्वर्थ जोड, जुळणी, मिळवणी, संगती असा हे, व पुढे तशी स्थिती प्राप्त होण्याचा उपाय, साधन म्हणजे कर्म असा ही झाला आहे. योगक्षेम या शब्दात योग म्हणजे प्राप्त न झालेल्या वस्तु मिळविणे असा अर्थ आहे. योग म्हणजे कर्म करण्याची विशेष प्रकारची कुशलता, युक्ती, चतुराई अशी या शब्दाची व्याख्या गीतेतच मुद्दाम स्पष्टपणे केलेली आहे.  
एकच कर्म करण्याचे जे अनेक योग, साधने, किंवा मार्ग असतात त्यापैकी पराकाष्ठेचाचांगला व शुध्द मार्ग कोणता, तो नेहमी आचरता येईल की नाही, नसल्यास त्याला अपवाद कोणते व् ते का उत्पन्न होतात, जो मार्ग चांगला समजतो तो चांगला का, किंवा ज्यास वाईट म्हणतो वाईट का आणि हा चांगला वाईट पणा कोणी व कोणत्या धोरणाने ठरवावा, इत्यादि गोष्टी ज्या शास्त्राने निश्चित करता येतात, त्यास कर्मयोगशास्त्र किंवा गीतेतल्या संक्षिप्त रूपाप्रमाणे योगशास्त्र म्हणतात.                                                            

गीता रहस्य ४


गीता रहस्य प्रकरण चौथे (आधिभौतिक सुखवाद)
या चौथ्या प्रकरणामध्ये टिळकांनी आधिभौतिक सुखवादाचे शास्त्रशुध्द पध्दतीने स्पष्टीकरण सविस्तरपणे अनेक उदाहरणे देऊन केलेले आहे. कर्माकर्म विवेचनाचा अभ्यास करताना आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक असे तीन प्रकारचे मार्ग असून धर्मशास्त्रानुसार आध्यात्मिक मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. परंतू आध्यात्मिक मार्गाचे महत्त्व पूर्णपणे लक्षात येण्यासाठी आधिभौतिक, आधिदैविक या दोन्ही मार्गाचा अभ्यास करावा लागतो. कोणत्याही कर्माचे केवळ बाह्य फल पाहून नीतिचा व अनीतिचा निर्णय करणाऱ्या या पक्षास टिळकांनी आधिभौतिक सुखवाद हे नाव दिले आहे. कारण नीतिमत्तेच्या निर्णयार्थ या मताप्रमाणे ज्या सुखदु:खाचा विचार करावयाचा ती सर्व प्रत्यक्ष दिसणारी, बाह्य म्हणजे बाह्य पदार्थांचा इंद्रियांशी संयोग झाल्याने उत्पन्न होणारी अर्थात आधिभौतिक असून हा पंथ ही सर्व जगाचा केवळ आधिभौतिकदृष्ट्या विचार करणाऱ्या पंडितांनीच उपस्थित केलेला आहे. गीतेतील कर्मयोगशास्त्राचे स्वरूप व महत्व पूर्णपणे लक्षात येण्यास नीतिशास्त्राच्या या आधिभौतिक पंथाची जितकी माहिती असणे अत्यंत जरूर आहे तेव्हढीच ढोबळ माहिती या प्रकरणामध्ये टिळकांनी दिलेली आहे.
आधिभौतिक सुखवादामध्ये एक वर्ग निव्वळ स्वार्थसुखवाद्यांचा आहे. परलोक किंवा परोपकार सर्व खोटे असून आध्यात्मिक धर्मशास्त्रे लुच्च्या लोकांनी आपले पोट भरण्यासाठी लिहीली आहेत. या जगात खरा काय तो ज्या कृत्याने साधेल किंवा ज्याने आपल्या स्वत:च्या आधिभौतिक सुखाची अभिवृध्दी होईल तेच न्याय्य, प्रशस्त किंवा श्रेयकर समजले पाहिजे, असे या पंथाच्या लोकांचे म्हणणे आहे. परंतू अर्जुनाने त्रैलोक्याच्या राज्याला सुध्दा तिलांजली दिलेली होती. आधिभौतिक सुखाच्या या पंथाचा नुसता उल्लेख करणे म्हणजेच त्यांचे खंडन करणे होय.
दूसरे आधिभौतिक पंडित असे म्हणतात किं स्वत:चे सुख किंवा स्वार्थ जरी साध्य असला तरी लोकांना आपल्याप्रमाणेच सवलत दिल्याखेरीज आपल्याला सुख मिळणे शक्य नसल्यामुळे स्वसुखासाठीच दूरदर्शीपणाने इतर लोकांच्या सुखाकडे सुध्दा आपणांस पाहिले पाहिजे. या आधिभौतिक वाद्यांची गणना दूसऱ्या वर्गामध्ये टिळकांनी केलेली आहे.
आत्मा कोण आहे हे पहिल्याने पहा, ऎक, त्याचे मनन व ध्यान कर असा याज्ञवल्क्यांचा अखेरचा उपदेश आहे. या उपदेशाने आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाची एकदा ओळख पटली म्हणजे
मग सर्व जगच आत्ममय होऊन स्वार्थ आणि परार्थ ह भेद मनातून नाहिसा होतो. तोच उपदेश गीतेमध्ये भगवंताने सांगितलेला आहे. हाच पंथ सर्वोच्च प्रतिचा आहे.
भर्तृहरि नितिशतकामध्ये म्हणतो—आपला फायदा सोडून जे लोकांचे कल्याण करतात तेच खरे सत्पुरुष होय. स्वार्थ न सोडता लोकांसाठी झटणारे सामान्य पुरूष होय. आणि आपल्या फायद्यासाठी लोकांचे नुकसान करणारे पुरूष नसून राक्षस आहेत.
सुखाचे अजून दोन प्रकार आहेत—प्रेयस व श्रेयस. प्रेयस म्हणजे इंद्रियांस प्रिय वाटणारे तात्कालिक सुख होय. व श्रेयस म्हणजे आत्म्याचे खरे व चिरकालीन कल्याण होय. सज्जन मनुष्य प्रेयसा पेक्ष श्रेयसाचा मार्ग पत्करतो.