Tuesday, 12 December 2017

अध्यात्मयोगाचा उपदेश




श्रीमद भागवतपुराणातील तिसऱ्या स्कंधामध्ये भगवान कपिलाने अध्यात्मयोगाचा उपदेश आपल्या माता देवहुतीस केलेला आहे. सुखदुःखाची  सर्वस्वी  निवृत्ती  करणारा  हा अध्यात्मयोग आहे. मनुष्याच्या  कल्याणाचे  मुख्य  साधन एकच आहे.  बंधनाचे    मोक्षाचे  साधन  एकच आहे. ते साधन आहे मनुष्याचे मन. ते मन विषयामध्ये  आसक्त  झाल्यास  बंधनास कारण होते,  तर  परमात्म्यात  रमल्यास  मोक्षप्राप्त करते. ते मन  जेव्हा  मी-माझे  सोडते  तेव्हा  शुध्द  होते. ते मन शुध्द करण्यासाठी भक्तीयोग  एकमेव  कल्याणकारी  मार्ग आहे. श्रीहरि  लीला  श्रवणाने  भगवंताबद्दलची श्रध्दा  प्रेम वृध्दीगत होते, भक्तीचा  क्रमाक्रमाने  विकास होत असतो. एका रात्रीतून दृढ भक्ती होत नसते. इंद्रियविषयांच्या  त्यागाने, संसाराविषयी वैराग्य निर्माण होते. वैराग्ययुक्त  ज्ञानाने भक्तीमध्ये दृढता प्राप्त होते, दृढभक्तीने  परमेश्वरप्राप्ती होते. चित्त  भगवंतामध्ये  स्थिर  हा  स्वभाव  म्हणजे  निष्काम  भक्ती होय.  ती निष्काम  भक्ती मुक्ती  पेक्षाही  श्रेष्ठ आहे. कारण  ती  लिंग  शरीरास  नष्ट  करते. स्त्री पुरूष हा भेद-भाव म्हणजे लिंग  शरीर होय. निष्काम  भक्तास  माया  बाधत  नाही. सर्वस्वाचा  त्याग  करून  जे  भगवंताचेच  चिंतन  करतात, ते मृत्युरूप  संसारातून  सहज पार  होतात.
सांख्ययोग  तत्त्वज्ञान थोडक्यात असे आहे. परमात्म्या  ची  दोन  रूपे असतात. एक पुरूष    दुसरे प्रकृती. पुरूष हे ज्ञानस्वरूप असते तर प्रकृती हे शक्तीस्वरूप असते. पुरूष  त्रिगुणातीत आहे तर प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे.  प्रकृतीची  पंचवीस  तत्त्वे आहेत.--पंचमहाभूते(पृथ्वी,पाणी,वायु,अग्नी,आकाश) त्यांच्या पाच तन्मात्रा यम (गंध,रस,स्पर्श,रूप,शब्द) आणी दहा  इंद्रिये(डोळे  कान  नाक  जिभ  त्वचा,  हात  पाय  वाणी  शिश्न  गुदा) तसेच मन,बुध्दी,चित्त,अहंकार    काळ. अशी एकूण पंचवीस होतात.
या नंत्तर भगवान कपिल अष्टांगयोगाचा उपदेश करतात. योग  म्हणजे  चित्ताच्या  वृत्तींचा  निरोध होय.  अभ्यास  आणि  वैराग्य  या  दोन  उपायांनी  चित्त-वृत्तींचा  निरोध होऊ शकतो.  चित्त-वृत्तींच्या  निरोधासाठी  केलेला  प्रयत्न  म्हणजे  अभ्यास होय.  हा  अभ्यास  दीर्घकाळ  अखंडपणे  केल्यावर  दृढ होत असतो.  विषयासक्ति  चित्तातून  पूर्णपणे  नष्ट  होणे  ते  वैराग्य आहे. योगाची आठ अंगे आहेत, म्हणुन अष्टांगयोग.  यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, व समाधि.  (१)यम पाच प्रकारचे आहेत. १)अहिंसा--विचाराने,  बोलण्याने,कृतीने  कोणाचीही  हिंसा  न करणे. २)सत्य--नेहमी  सत्याचा  विचार करणे. सत्य  बोलावे    तसेच  सत्याचेच  आचरण करणे. ३)अस्तेय--दुसऱ्याच्या  संपत्तीचा  लोभ  नसणे. ४)ब्रह्मचर्य--स्त्री  विषयी  काम-आसक्ती  नसणे. ५)अपरिग्रह--गरजे  पेक्षा  आधिक  वस्तुंचा  साठा  न करणे. (२)निमय पाच प्रकारचे आहेत. १)शौच--विवेकाने  मनाची    सात्विकतेने  शरीराची  शुध्दता राखणे. २)संतोष--मिळेल  त्यात  समाधान मानणे.  ३)तप--धर्माचरण करणे. ४)स्वाध्याय--आत्मज्ञान  प्राप्तीसाठी  उपासना करणे. ५)ईश्वरप्राणिधान-भगवंतावर  नितांत  श्रध्दा असणे. (३)आसन-ज्या  स्थितीमध्ये  शरीरास    मनास  सुख    स्थिरता  प्राप्त होते.(केवळ  पद्मासन) (४)प्राणायाम-आसनजय  झाल्यावर  श्वास    प्रश्वास  यांचे  नियंत्रण करणे. प्राणायामाने  चित्तातील  प्रकाशरूप  सत्त्वगुणांवर  आवरण  घालणाया  रज,  तम  गुणांचा  क्षय होतो. (५)प्रत्याहार  म्हणजे  इंद्रियांचे संयमन करणे.  नाक,  जिभ,  डोळे,  त्वचा,  कान  ही  ज्ञानेंद्रिये    वाणी,  हात,  पाय,  शिश्न,  गुदा  ही   कर्मेंद्रिये   यांना  विषयभोगा  पासून  नियंत्रित करणे. मनोनिग्रह  झाल्यानंतर  धारणा  करण्यासाठीची  योग्यता  मनाच्या  ठीकाणी  प्राप्त होत असते. (६)धारणा  म्हणजे  मन  एकाग्र  करणे. (७)ध्यान  म्हणजे  मन  एकाग्र  होणे. (८)समाधी  म्हणजे  देहाभिमान  नष्ट  होऊन  स्वरूपाचा  साक्षात्कार होणे. प्राणायामाने  शारिरीक  दोष  नष्ट होतात. प्रत्याहाराने  विषयासक्ती  नष्ट होते. धारणेने  पाप  नष्ट होते. ध्यानाने  षडविकार  नष्ट होतात.

या नंत्तर भगवान कपिल भक्तीयोगाचा उपदेश करतात. प्रत्येक मनुष्याचा स्वभाव सत्त्व, रज, व तम या त्रिगुणाने बनलेला असतो. त्रिगुणाच्या  भेदामुळे  भावनेमध्ये  भिन्नता होते. प्राणी    ईश्वर  यांच्यात  भेद  मानून  मत्सर  भावनेने  पूजन  करणारा  तामस  भक्त होय.  यश,ऐश्वर्य  प्राप्तीच्या  उद्देशान प्रतिमांमध्ये  भेद  मानून  पूजन  करणारा  राजस  भक्त होय.  पापक्षय  करण्यासाठी  कर्तव्य  बुध्दीने  तसेच  भक्त    भगवान  यांच्यात  भेद  मानून  पूजन  करणारा  सात्वीक  भक्त होय.  तर अनन्यतेने  भगवंतामध्ये  निरंतर  प्रेम  करणारा  निष्काम  भक्त होय, तोच  सर्वश्रेष्ठ आहे. तो निष्काम भक्त भगवंतामध्ये  एकरूप  होतो.  प्राणीमात्रांतील  परमेश्वराचा  तिरस्कार  करून  प्रतिमेचे  पूजन  करणारा हा केवळ  देखावा असून ते  भस्मामध्ये  हवन केल्या  समान निरर्थक आहे. प्राणीमात्रांचा  द्वेष  करणाऱ्यास  कधीही शांती  प्राप्त होत नाही.  आत्म व परमात्मा  यामध्ये  भेद  मानणाऱ्यास  नेहमी मृत्युचे  भय असते. भक्तियोगाने  तात्काळ  वैराग्य प्राप्त होते, त्याने ब्रह्मज्ञान  प्राप्ती होते.
साधनेचा क्रम आहे--अनुष्ठान-अनुसंधान-अनुराग-अनुभव-एकरूपता
या  ज्ञानाचा  उपदेश  दुष्ट,  उध्दट, गर्वीष्ठ,  दुराचारी,  विषयासक्त,  ढोंगी  मनुष्यास  कधी  ही  सांगू  नये. परंतू  श्रध्दावान, विनम्र, प्राणीमात्रांशी  मैत्री  करणारा,  गुरूसेवेमध्ये  तत्पर, भौतीक  विषयांमध्ये  अनासक्त,  शांतचित्त,  मत्सरशून्य, निर्मळ  अंतःकरणाचा, शरणागत  मनुष्यास  हा  अध्यात्मयोग जरूर सांगावा.

No comments:

Post a Comment