Friday, 15 December 2017

मुमूक्षू ब्राह्मणाचे मनोगत




भगवान श्रीकृष्ण उध्दवास उपदेश करतात. प्राचीन  काळातील  घटना  आहे.  अवंती नगरामध्ये एक ब्राह्मण रहात होता. शेती, व्यापार करून त्याने पुष्कळ संपत्ती मिळविली. तो अतिशय कंजूष, लोभी व रागीट होता. तो आपल्या स्वजनांच्या खाण्या-पिण्यामध्ये सुध्दा कंजूषी करित असे. त्याचा कंजूषपणा व वाईट स्वभाव यामुळे त्याचे सर्व स्वजन त्याला एकट्याला सोडून घरातून निघून गेले. घरातून निघून जाताना त्या ब्राह्मणाची सर्व संपत्ती स्वजन, नोकर, चोर इत्यादि जण घेऊन गेले. सर्व संपत्ती नष्ट झाल्यामुळे सतत त्याच चिंतेने त्या बिचाऱ्या ब्राह्मणास अतिशय दु:ख झाले. त्या ब्राह्मणास पश्चात्ताप झाला. मी आज पर्यंत स्वजनांच्या खाण्या-पिण्यामध्ये सुध्दा कंजूषी केली. कष्ट करून संपत्ती मिळविली. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो म्हणतो—कंजूष मनुष्यास धनापासून कधीच सुख मिळत नाही. जसे अंगावरील थोडेसे कोड सुंदर रूप बिघडवून टाकते, त्याच प्रमाणे थोडेसा सुध्दा धनाचा लोभ यशस्वी लोकांचे यश आणि गुणी लोकांचे गुण नष्ट करतो. धन-संपत्तीचे पंधरा अनर्थ आहेत. १.चोरी, २.हिंसा, ३.असत्य भाषण, ४.अहंकार, ५.काम, ६.क्रोध, ७.गर्व, ८.दंभ, ९.भेदबुध्दी, १०.वैर, ११.अविश्वास, १२.स्पर्धा, १३.लंपटपणा, १४.जुगार, १५.मद्यपान हे पंधरा अनर्थ मनुष्या ठिकाणी  धन-संपत्तीमुळेच होतात असे धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. म्हणून ज्या मनुष्यास आपले कल्याण करून घ्यावयाचे आहे, त्याने अर्थ नावाच्या अनर्थाला दूर ठेवले पाहिजे. आई, वडिल, भाऊ, बहिण, पत्नी, पुत्र, कन्या असे जे एका घरामध्ये एकरूप होऊन जातात, तेच सर्वजण धन-संपत्तीमुळे इतके दुरावले जातात कि, ते एकमेकांचे शत्रु होतात, एकमेकांच्या जिवावर उठतात. सर्वदेवस्वरूप भगवान श्रीहरी माझ्यावर प्रसन्न झाले यात काहिच शंका नाही. म्हणून तर त्यांनी मला या अवस्थेला आणून वैराग्य दिले. या वैराग्यामुळे मनुष्य भवसागर पार करू शकतो. आता मी सावधतेने साधना करून भगवतप्राप्ती करून घेईन. भगवान श्रीकृष्ण उध्दवास उपदेश करतात—त्या ब्राह्मणाने मनोमय निश्चय करून मी-माझे पणाची गाठ तोडून टाकली. यानंत्तर त्याने मौन धारण करून संन्यास ग्रहण केला. आपले मन, इंद्रिये नियत्रित करून तो भिक्षू नगरात, गावांमध्ये स्वच्छंदपणे फिरत असे. कालांतराने तो म्हातारा झाला. त्याचा दुष्ट माणसे खूप छळ करीत. त्याच्या अंगावर दगडे फेकी, मल-मूत्र टाकी, तर कधी थूंकत. परंतू तो संन्यासी काहीच बोलत नसे. अशा प्रकारे तिरस्कार करून दुर्जन माणसे जरी त्याला धर्मापासून च्युत करण्याचा प्रयत्न करीत, तरी सुध्दा तो सात्विक धैर्याने आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहिला. तो ब्राह्मण म्हणतोमाझ्या सुख-दु:खाला कारणीभूत कोणी माणसे नाहीत, देवता नाहीत, शरीर नाही, ग्रह नाहीत, कर्म नाही की काळ नाही. माझे मन च खरे कारणीभूत आहे असे धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. ते मन च जीवाला या संसारचक्रामध्ये फिरवीत असते. दान, स्वधर्माचे आचरण, यम-नियम, वेदाध्ययन, सत्कर्मे, व्रत-वैकल्ये ही सर्व कर्मे मनाचा निग्रह करण्यासाठी असतात. कारण मनाची एकाग्रता हाच परमयोग आहे. ज्याचे मनसाठी असतात. कारण मनाची एकाग्रता हाच परमयोग आहे. ज्याचे मन एकाग्र होऊन एकदम शांत झाले, त्याला दान, स्वधर्माचे आचरण, यम-नियम, वेदाध्ययन, सत्कर्मे, व्रत-वैकल्ये ही सर्व कर्मे करण्याची काहिही आवश्यकता नाही. परंतू ज्याचे मन चंचल आहे, त्याने भरपूर सत्कर्मे केली तरी त्याचा काहिही उपयोग नाही. मन एकाग्र झाल्यावर इंद्रिये नियंत्रित होतात. इंद्रिये मनाला एकाग्र करू शकत नाहीत, मन फार मोठे बलवान आहे. सामान्य माणसे मन:कल्पित शरीराला मी-माझे मानून हा मी हा दुसरा या भ्रमाने या भवसागरामध्ये भटकत रहातात.
भगवान श्रीकृष्ण उध्दवास उपदेश करतात. अशा रितीने त्या संन्यासी ब्राह्मणाने चिंतन करून सर्व अज्ञान नष्ट केले. शेवटी माझ्यामध्ये एकरूप झाला.


No comments:

Post a Comment