Saturday, 16 December 2017

मार्कण्डेयास मायेचे दर्शन




प्राचीन  काळातील  घटना  आहे.  एकदा मार्कण्डेय मुनीने मायेचे दर्शन होण्याची इच्छा भगवान नारायणाकडे व्यक्त केली. तेव्हा भगवान नारायण ठीक आहे म्हणून बदरीवनामध्ये निघून गेले. मार्कण्डेय मुनी आपल्या आश्रमामध्ये मायेचे दर्शन केव्हा होईल याचेच चिंतन करू लागले. काही दिवसांनंतर एके दिवशी अचानक जोरदार तुफान आले. मुसळधार पाऊस कोसळू लागला. तेव्हा मार्कण्डेय मुनीने असे पाहिले की, विशाल समुद्र संपूर्ण पृथ्वी गिळू लागला आहे. सर्वत्र विशाल समुद्राच्या लाटा उसळत आहेत. संपूर्ण पृथ्वी समुद्रामध्ये बुडाली. मार्कण्डेय मुनी बुडाले. तहान-भूकेने व्याकुळ झाले. भयभीत झाले. लाटांचे तडाखे अंगावर येत होते. अशा प्रकारे भगवंताच्या मायेमध्ये गुरफटून त्या विशाल समुद्रामध्येच कोट्यावधी वर्षे होऊन गेली असे त्यांना वाटले. एके दिवशी अचानक त्या मुनींना एक वटवृक्ष दिसला. त्या वटवृक्षाच्या एका पानावर एक तेजस्वी बालक दिसले. त्या बालकाच्या तेजाने सर्वत्र लख्ख प्रकाश आला. ते बालक पाचूच्या खड्याप्रमाणे निळसर रंगाचे होते. ते अत्यंत मनोहर दिसत होते. ते तेजस्वी बालक आपल्या पायाची बोटे तोंडामध्ये घालून चोखीत होते. ते पाहून मार्कण्डेय मुनी आश्चर्यचकीत झाले. त्या तेजस्वी बालकाच्या दर्शनाने त्या मुनींचा थकवा निघून गेला. आनंदाने मार्कण्डेय मुनी प्रफुल्लित झाले. शरीर पुलकित झाले. त्या बालकाजवळ जाताच मार्कण्डेय मुनी त्या तेजस्वी बालकाच्या शरिरामध्ये गेले. तेथे ही मार्कण्डेय मुनींनी विशाल सृष्टी पाहिली. ते पाहून मार्कण्डेय मुनी पुन्हा आश्चर्यचकीत झाले. त्यांना काहीच समजेना. काही वेळानंतर मार्कण्डेय मुनी त्या तेजस्वी बालकाच्या शरिरातून बाहेर आले. आता पुन्हा त्या मुनींना एक वटवृक्ष दिसला. त्या वटवृक्षाच्या एका पानावर तेच तेजस्वी बालक दिसले. काही क्षणामध्ये ते तेजस्वी बालक अदृश्य झाले. तसेच तो विशाल समुद्र सुध्दा अदृश्य झाला. दुसऱ्याच क्षणी मार्कण्डेय मुनी आपल्या आश्रमामध्येच बसलेले आहेत असा अनुभव आला.
अशा रितीने मार्कण्डेय मुनीने मायेचे दर्शन घेतले.

No comments:

Post a Comment