Sunday, 17 December 2017

गंगावतरण




प्राचीन  काळातील  घटना  आहे.  एकदा  चक्रवर्ती  सम्राट सगराने  अश्वमेध यज्ञ केला. तेव्हा इंद्राने  अश्वमेध यज्ञातील  घोडा   पळवून नेला. परंतू तो कपिलाश्रमाच्या बाहेर बांधला. सम्राट सगरास दोन पत्न्या होत्या. एका पत्नीस  ६००००पुत्र होते. त्या सर्व सगरपुत्रांनी चारही दिशांना तो घोडा  शोधला. सरतेशेवटी तो घोडा त्यांना कपिलाश्रमाच्या बाहेर दिसला. आपल्या आश्रमामध्ये भगवान कपिल समाधि अवस्थेमध्ये होते. अश्वमेध यज्ञातील  घोडयाबद्दल  त्यांना माहित सुध्दा नव्ह्ते. त्या सर्व सगरपुत्रांनी कपिलाश्रमाच्या बाहेर अश्वमेध यज्ञातील 
घोडा पाहून कपिलांचा  अपमान केला. त्यामुळे भगवान कपिलाने केवळ एका दृष्टीक्षेपाने  त्या सर्व सगरपुत्रांना  भस्मसात केले. सम्राट सगराने आपल्या ६००००पुत्रांचा सर्वत्र खूप शोध केला. परंतू त्या ६००००पुत्रांचा  खूप शोध लागला नाही.
सगराच्या  दुसऱ्या  पत्नीस  एकच असमंजस नावाचा पुत्र  होता. असमंजसाच्या पुत्राचे नाव अंशुमान होते. सम्राट सगराच्या आज्ञेनुसार अंशुमान घोडयाचा  शोध करण्यासाठी निघाला. शोध घेत घेत तो कपिलाश्रमापाशी आला. तेथे त्याला राखेचे मोठ-मोठे डोंगर दिसले.  अंशुमान  कपिलाश्रमामध्ये जाऊन भगवान कपिलाचे विनम्रपुर्वक दर्शन घेतले. कपिलांना  नमस्कार केला. त्या राखेच्या डोंगरांचे रहस्य अंशुमानला भगवान कपिलांकडून समजले कि, ६००००सगर पुत्रांच्या रक्षेचे ते डोंगर आहेत. अंशुमानास दु:ख झाले. तेव्हा त्यास कपिलांकडून समजले कि, सगरपुत्रांचा  उध्दार  केवळ  गंगाजलाने होऊ शकतो.  तेव्हा  गंगा  स्वर्गामध्ये होती. अंशुमानने  गंगा  पृथ्वीवर  आणण्यासाठी  कठोर तप केले. परंतू यथावकाश  अंशुमानाचा मृत्यु झाला. अंशुमानाचा पुत्र दिलीप होता. दिलीप ने सुध्दा गंगा  पृथ्वीवर  आणण्यासाठी  कठोर तप केले. परंतू यथावकाश  दिलीपाचा सुध्दा मृत्यु झाला. दिलीपाचा पुत्र भगिरथाने  गंगा  पृथ्वीवर  आणण्यासाठी  कठोर परिश्रम  केले. तेव्हा भगिरथास गंगा प्रसन्न झाली. गंगा देवीने भगिरथास दर्शन दिले. तेव्हा भगिरथाने गंगा देवीस पृथ्वीवर येण्याची प्रार्थना केली. त्यावर गंगा—मी स्वर्गातून पृथ्वीवर येताना माझा  प्रचंड  वेग असणार. तो धारण कोण करू शकेल, अन्यथा मी रसातळामध्ये  जाईन, तसेच पृथ्वीवरचे पापी मनुष्ये माझ्या पात्रामध्ये स्नान  करून  मी अपवित्र  होईन. तेव्हा पुन्हा भगिरथाने महादेवास प्रसन्न करून गंगामातेस आपल्या मस्तकावर धारण करण्याची प्रार्थना केली. आणि गंगामातेस भगिरथाने सांगितलेहे माते,महादेव  तूला मस्तका  वर  धारण  करतील, म्हणून  तूझा  वेग  साधारण  होईल,  तसेच  पुण्यवतांनी  स्नान  केल्यास तू पुन्हा  पवित्र होशील,  कारण  त्यांच्या  हृदयात  साक्षात  भगवान विराजमान असतात. तेव्हा गंगा  पृथ्वीवर अवतरीत झाली.  भगिरथाने गंगाजलाच्या पुण्यस्पर्शाने सगरपुत्रांचा  उध्दार केला. त्या सर्व् ६००००सगर पुत्रांना स्वर्गप्राप्ती झाली. गंगास्नानाने  मनुष्यास भगवत्स्वरूप प्राप्त होते. कर्मबंधनातून मुक्ती मिळ्ते. हा  गंगा  महिमा आहे. ही गंगादेवी  स्वर्गामध्ये भगवत  चरणकमलातून  निर्माण झालेली आहे.
मा  गंगे  तू  सर्व  धर्माची  अधिष्ठात्री  जीवनदायी आहेस. सर्व तीर्थांमध्ये  तू श्रेष्ठ आहेस. तू सर्वांना निर्मळ  करणारी आहेस. मनुष्याच्या ह्र्दयामध्ये परमानंद  उत्पन्न  करणारी आहेस. मनुष्यास परमशांती  देणारी आहेस.  तूझ्या  पवित्र  जलाने  आमचे  सर्व  ताप  नष्ट  होवो.

No comments:

Post a Comment