Sunday, 10 December 2017

२०२२ चा भारत घडविण्यासाठी शिक्षणपध्दतीचा विचार




भगवत  गीता  श्रीकृष्णाचा  हा  ज्ञानोपदेश  सर्वांगाने  परिपुर्ण  आहे.  या  गीतेच्या  तत्त्वज्ञानाचा  संतश्रेष्ठ  ज्ञानेश्वर,  आद्य  शंकराचार्य,  मध्वाचार्य,  इस्कॉनचे  प्रभूपाद  स्वामी,  महायोगी  श्रीअरविंद  घोष,  लोकमान्य  टिळक,  आचार्य  विनोबा  भावे,  डॉ.  सर्वपल्ली  राधाकृष्णन  अशा  अनेक  भारतीय  विचांरवंतांनी  सखोल  अभ्यास  केला  आहे.  तसेच  जगभर  परदेशामध्ये  सुध्दा  गीतेची  १३३  भाषांतरे  इंग्रजी  भाषेमध्ये,  २१  भाषांतरे  जर्मन  भाषेमध्ये  अशा  परदेशी  विचारवंतांची  गीतेवरील  विवेचने  प्रसिध्द  झालेली  आहेत.  प्रा.  आर.  सी.  झीनर  यानी  १९७०  साली  गिफोर्ड  लेक्चर्स  मध्ये  सांगितले  होते  की  जगातील  ७५  मुख्य  भाषांमध्ये  सुमारे  २०००  हून  आधिक  भाषांतरे  झालेला  भगवद्गीता  हा  भारतीयांचा  तत्त्वज्ञान  विषयक  ग्रंथ  बायबलच्या  खालोखाल  लोकप्रिय  झालेला  जगामध्ये  दुसऱ्या  क्रमांकाचा  धार्मिक  ग्रंथ  आहे.  तसेच  इ.स.  १७८५  ते  १९८५  या  दोनशे  वर्षामध्ये  गीतेची  २८७  भाषांतरे  इंग्रजीत  प्रसिध्द  झालेली  आहेत.
अशा  अलौकिक  उपदेशातील  महत्वाचा  भाग  कोणता  आहे  याचा  विचार  केला  तर  माउलींची  ओवी  आठवते..
तू  योगयुक्त  होऊनी   फळाचा  संगु  टाकुनी   मग  अर्जुना  चित्त  देउनी   करी  कर्मे  ।।२.२६७।।
२०२२  चे  भारत राष्ट्र घडविताना  नेमके  कशाची  कमतरता  आहे  हे  विचार  करून  करून  नक्की  केले  पाहिजे.  म्हणजे  ती  कमतरता  भरून  काढता  येईल.
कर्मयोगाचाच उपदेश अत्यंत महत्त्वाचा व मुख्य आहे. परंतू दुर्दैवाने आज या सिध्दांताचे महत्त्व लक्षात घेतले गेले नाही. कर्मयोगाचे आचरणाने देशाचा विकास होऊ शकतो. धर्मराज्य होऊ शकते.
आज  मुळामध्ये  हात  घालण्याची  कोणाचीच  तयारी  नाही,  इच्छा  नाही.  मोठमोठी  भाषणे  द्यायची,  संतांची,  विचारवंतांची  अवतरणे  देऊन  लेख  लिहायचे,  परदेशातील  विचारसरणीच्या  दिशेने  उपदेश  द्यायचे  आणि  आपण  काहीतरी  महान  कार्य  करीत  आहे  याचा  अहंकार  बाळगून  लोकप्रियता  वाढवायची  याचा  आज-काल  अतिरेक  चाललेला  आहे.  अशाने  मनुष्याचा  उध्दार  होणार  नाही.  परंतू  अधःपतन  मात्र  नक्की  होईल  हे  लक्षात  घेतले  पाहिजे.
आज  अनेक  प्रश्न  आहेत.  त्यातील  काही  प्रश्न  एकमेकावर  अवलंबून  आहेत.  काही  प्रश्न  भौगोलीक  परिस्थितीशी  निगडीत  आहेत.  काही  प्रश्न  राजकीय,  सामाजिक,  आर्थिक  आहेत.  परंतू  सर्व  प्रश्नांचे  मूळ  कारण  फक्त  एकाच  प्रश्नाशी  निगडीत  आहे.  तो  प्रश्न  सोडविला  तर  सर्व  प्रश्न  चुटकीसरशी  सुटणार  आहेत.  म्हणून  त्या  एकाच  प्रश्नाकडे  लक्ष  देण्यासाठी,  तो  सोडविण्यासाठी  सर्व  भारतीयांनी  प्रयत्न  केला  पाहिजे.  आपल्या  देशाची  प्रतिज्ञा  काय  सांगते.  भारत  माझा  देश  आहे.  सारे  भारतीय  माझे  बांधव  आहेत.   या  प्रतिज्ञेचा  कोणी  विचार  करत  नाही.  फक्त  शाळेमध्ये  म्हणली  जात  असे.  पण  त्याचा  अर्थ   आचरण  याकडे  कोणाचेच  लक्ष  नसते.  ही  प्रतिज्ञा  जरी  आचरणात  आणली  तरी  भारताची  समृध्दी  झाल्याशिवाय  रहाणार  नाही.  मग  कोणतेच  प्रश्न  उरणार  नाहीत. आपल्या संस्कृतीमध्ये वसुधैव कुटुंबकम् ही शिकवण आहे. म्हणजे संपुर्ण पृथ्वी हे आमचे एक कुटुंब आहे असा सर्वव्यापक विचार करणारी आमची संस्कृती आहे. तोच विचार आपल्या देशाच्या प्रतिज्ञेमध्ये सांगितलेला आहे. कुटुंबामध्ये आपलेपणा असतो. सर्व भारतीयांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आपूलकी निर्माण झाल्यावर किती सौख्य नांदेल. चोऱ्या, मारामारी, खून, दरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार होणार नाहीत, कामगारांचा संप होणार नाही, मोर्चा-धरणे-आंदोलने होणार नाहीत, ही आपूलकीची भावना सर्व भारतियांना ज्या दिवशी समजेल तो दिवस भारत देशासाठी भाग्याचा असेल. आणि हेच प्रबोधन करण्याचे खरे काम राजकीय नेत्यांचे आहे. परंतू आजची राजकीय विचारसरणी केवळ सत्तेशी निगडीत झालेली दिसून येते.
इंग्रजांनी  साठ  वर्षांपुर्वी  आपल्याला  धमकाविलेले  होते  तुम्हास  स्वातंत्र्य  मिळाले  तरी  पुढची  १००  वर्षे  तूमच्या  मनामध्ये  आमच्याच  विचारांचे  राज्य  चालणार  आहे.  नेमके  तेच  आज  प्रत्यक्षामध्ये  पाहायला  मिळत  आहे.  अजून  सुध्दा  आपण  त्याच्याच  विचारांचे  अनुकरण  मोठ्या  गर्वाने  करतो  आहे.  आपली  शासन  पध्दती,  शिक्षण  पध्दती,  न्याय  पध्दती,  उद्योग  पध्दती,  सांस्कृतीक  पध्दती  सर्व  काही  त्यांचेच  अनुकरण  आहे.  त्याचे  परिणाम  आपण  भोगतो  आहे  तरीही  कोणाचेही  डोळे  उघडले  जात  नाही.  साधी  गोष्ट  मेकॉलेने  सुरू  केलेली  कारकून  देणारी,  नोकरदार  निर्माण  करणारी  शिक्षण  पध्दती  १९४७  साली  बंद  करून  आपली  गुरूकुल  पध्दती  सुरू  करायला  हवी  होती.  मॅक्समुलर या इंग्रजी  विचारवंतांनेच  म्हणले  आहे  ज्या  राष्ट्राला  रामायण-महाभारतासारख्या  उच्च  विचारसरणीचा  वारसा  आहे  त्यांना  आम्ही  (इंग्रजांनी)  शिकविण्याची  गरज  नाही.  आपल्या  संस्कृतीमध्ये  आणि  त्यांच्या  संस्कृतीमध्ये  जमिन-आसमानाचा  फरक  आहे.  आपली  संस्कृती  त्यागावर  आधारीत  असून  मोक्षप्रधान  तर  त्यांची  उपभोगावर  आधारीत  असून  भोगविलासी  आहे.
गुरूकुल  पध्दतीमध्ये  शारिरीक  विकास,  मानसिक  विकास,  बौध्दीक  विकास,  आध्यात्मिक  विकास  या  माध्यमातून  हे  चारित्र्य  शुध्द  होत  असते.
शारिरीक  विकास  आयुर्वेदाच्या  उपचाराने  होउ  शकतो.  आयुर्वेदामध्ये  आहार,  विहार,  दिनचर्या,  ऋतुचर्या,  सदवृत्त,  पंचकर्म  इत्यादींचा  सखोल  विचार  केलेला  आहे.  आपण  जे  अन्न  खातो  त्याप्रमाणे  आपले  शरीर    मन  घडत  असते.  खाल्लेल्या  अन्नापासून  रस,  रक्त,  मांस,  मेद,  अस्थि,  मज्जा,  शुक्र  हे  सप्तधातू  तयार  होतात.  सात्विक  आहाराने  शरीर  सुदृढ    स्वभाव  सत्त्वगुणी  होतो.
मानसिक  विकास  अष्टांगयोगाच्या  आचरणाने  होउ  शकतो.  योग  म्हणजे  चित्ताच्या  वृत्तींचा  निरोध.  चित्त  वृत्तींच्या  निरोधासाठी  केलेला  प्रयत्न  म्हणजे  अभ्यास  असून  ही  साधना  आहे.  तर  अनुभवयुक्त  इंद्रिय  विषयांची  आसक्ती  चित्तामधून  नष्ट  होणे  हेच  वैराग्य  असून  ते  साध्य  आहे.  अष्टांगयोग  साधना  यम,  निमय,  आसन,  प्राणायाम,  प्रत्याहार,  धारणा,  ध्यान,  समाधी  या  आठ  पाययांनी  पुर्ण  होत  असते.  चित्तातील  सर्व  विकार  नष्ट  होतात. 
बौध्दीक  विकास  विवेकज्ञानाने  होउ  शकतो.  प्रत्येक  गोष्टीचा  सांगोपांग  /  सारासार  विचार  करून  काय  अभिष्ट  आहे  याचा  निर्णय  करण्याचे  सामर्थ्य  म्हणजे  विवेक  होय.  बुध्दीचा  उपयोग  विधायक  कार्याकरीता  करणे  हा  विवेक  होय.
आध्यात्मिक  विकास  आत्म-साक्षात्काराने  होउ  शकतो.  क्रमाक्रमाने  शारिरीक  विकास,  मानसिक  विकास    बौध्दीक  विकास  झाल्यानंतरच  आध्यात्मिक  विकास  होणे  हेच  मनुष्याच्या  जीवनातील  अंतिम  उद्दिष्ट  आहे  आणि  तोच  सर्वांगीण  विकास  आहे.
अशा सर्वांगीण  विकासामुळे  वेगवेगळ्या  पातळीवर  जीवन  उध्दाराचे  बदल  दिसून  येतात.  वैयक्तीक  पातळीवर  विवेकाची  जाणिव  होऊन  मनःशांती,  निरोगी  शरीर,  सुख  समाधान  मिळेल.  कौटुंबिक  पातळीवर  कुटूंबातील  प्रत्येकाचे  जीवन  सुखी  समृद्ध  होइल.  लहान  मुलांचे  संस्कार  त्याच  वातावरणात  चांगले  होतील.  सामाजीक  पातळीवर  एका  नवीन  समृद्ध  समाजाची  निर्मीती  होइल.  ज्या  समाजातील  प्रत्येकाची  वैचारीक  क्षमता  उदार,  विशाल  आहे.  राष्ट्रीय  पातळीवर  प्रत्येकामध्ये  विश्वबंधुत्वाची  भावना  निर्माण  होइल.  जी  आजच्या  काळाची  खरी  गरज  आहे.  ही  विश्वबंधुत्वाची  भावना  नुसतीच  धोरणे  जाहीर  करून  होत  नसते.  त्यासाठी  प्रत्येकाच्या  हृदयी  विश्वबंधुत्वाची  खरी  तळमळ  असावी  लागते.  म्हणून  या  सर्वांगीण  विकासाचा  विचार  करून  त्याच्या  आचरणानेच  केवळ  मनुष्यजन्माची  सार्थकता  आहे  त्याचा  अनुभव  घ्यावा.
तरी  थोर  शिक्षणतज्ञ,  विचारवंत,  राजकीय  पुढारी  या  सर्वांनी  आजच्या  शिक्षण पध्दतीचा  खोलवर  अभ्यास  करून  आपल्या  देशाच्या  समृध्दीसाठी  योग्य  धोरणे  निश्चीत  केली  पाहिजेत  असे  कळकळून  सांगावे  वाटते.

No comments:

Post a Comment