Tuesday, 12 December 2017

भागवतातील दहा लक्षणे




ब्रह्मदेवाने भागवतातील  दहा  लक्षणाचा उपदेश देवर्षी नारदांना केला आहे.  पहिले लक्षण आहे सर्ग. महतत्त्व,  विवीध  अहंकार,  तन्मात्रा,  इंद्रिय  आणि  पंचमहाभूतांची  सृष्टीस सर्ग म्हणतात. या सर्ग लक्षणाचा विस्तार  भागवतातील  पहिल्या, दुसऱ्या, व तिसऱ्या स्कंधामध्ये केलेला आहे.
दूसरे लक्षण आहे विसर्ग. ब्रह्मदेवाने  निर्माण  केलेल्या सृष्टीस विसर्ग म्हणतात.  प्रणिमांत्रांच्या  इच्छे  प्रमाणे  एका  बीजापासून  दूसरे  बीज निर्माण होणारी सृष्टी निर्माण केली. या  विसर्ग लक्षणाचा विस्तार  भागवतातील  चौथ्या स्कंधामध्ये केलेला आहे. या  विसर्ग लक्षणाने सर्वोत्कृष्ट ज्ञानाचा, शक्तीचा आणि पराक्रमाचा बोध होतो. या सृष्टीतील प्रत्येक रचनेमधील आश्चर्य पाहून मनुष्य मंत्रमुग्ध होतो. व या सृष्टीतील आश्रयभूत भगवंतास जाणण्याचा विचार करतो.
तिसरे लक्षण आहे स्थान. ब्रह्मदेवाने  निर्माण  केलेल्या सृष्टीचा व्यवहार कसा चालावा, त्याच्या मर्यादा कोणत्या आहेत, त्याचा विस्तार किती आहे असे जे सृष्टिचे  नियम आहेत त्यांना स्थान म्हण्तात. या महान कार्याचा खोलवर विचार केल्यावर भगवंताची श्रेष्ठता समजू लागते. भगवंतास शरणागत होण्याची प्रवृत्ती निर्माण होते. या स्थान लक्षणाचा विस्तार  भागवतातील  पाचव्या स्कंधामध्ये केलेला आहे.
चौथे लक्षण आहे पोषण.  सर्व प्राणीमात्रांवर  कृपा करणे म्हणजे पोषण होय. भगवंताच्या प्रत्येक अवताराचे मुख्य कारण सर्व प्राणीमात्रांवर  कृपा करणे हेच असते. तो जात-पात,  धर्म-कर्म,  आणि  आचार-विचार  याकडे  दुर्लक्ष  करून सर्व प्राणीमात्रांना आपलेसे करतो. याचा खोलवर अभ्यास करून मनुष्याने भगवंताच्या कृपेचा आदर करून स्वत:चे जीवन कृतार्थ केले पाहिजे. या पोषण लक्षणाचा विस्तार  भागवतातील  सहाव्या स्कंधामध्ये केलेला आहे.
पाचवे लक्षण आहे उति. कर्मवासना म्हणजे उति होय. कर्मबंधनामुळेच मनुष्य आपले खरे  स्वरूप  विसरलेला आहे. सर्व प्राणीमात्रांचे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी प्रत्येकास कर्म स्वातंत्र्य आहे. तसेच कर्माचा सिध्दांत आहे. कर्माचे बंधन भोगावे लागणार आहे. या कर्मवासनेमुळेच प्राणि दु:खी होतात. या कर्मवासनेचे दु:खरूप ऒळ्खून त्याचा त्याग केला पाहिजे. या उति लक्षणाचा विस्तार  भागवतातील  सर्व स्कंधामध्ये केलेला आहे. 
सहावे लक्षण आहे मन्वन्तर. मन्वन्तर म्हणजे काळाची  गणना करण्याचे साधन होय. कलियुग(४,३२,०००वर्षे),द्वापारयुग(८,६४,००वर्षे),त्रेतायुग(१२,९६,००० वर्षे), सत्ययुग (१७,२८,००० वर्षे) या चार युगांची बेरीज म्हणजे ४३,२०,००० वर्षांची एक चतुर्युगी होते. अशा ७१चतुर्युगींचे एक मन्वंतर होते. अशा चौदा मन्वंतरांचा एक कल्प होतो. सध्या सातव्या मन्वंतरातील अठ्ठाविसाव्या चतुर्युगीतील कलियुग चालू आहे. या मन्वंतर लक्षणाचा विस्तार  भागवतातील  आठव्या स्कंधामध्ये केलेला आहे. 
सातवे लक्षण आहे ईशकथा. भगवंताच्या आणि भक्तांच्या अनेक आख्यानाने युक्त चरित्रास ईशकथा म्हणतात. या कथांचे श्रध्देने श्रवण केल्यानेच भक्ती दृढ होते. अंत:करणाची शुध्दी होते. अहंकार नष्ट होतो. तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते. म्हणू भगवंताच्या आणि भक्तांच्या कथांचे श्रध्देने श्रवण केले पाहिजे. आणि चिंतन केले पाहिजे. या ईशकथा लक्षणाचा विस्तार  भागवतातील  नवव्या स्कंधामध्ये केलेला आहे. 
आठवे लक्षण आहे निरोध. जेव्हा भगवान योगनिद्रेचा स्विकार करून शयन करतात तेव्हा ब्रम्हांडाचा प्रलय होतो आणि संपुर्ण  सृष्टि  परमात्म्यामध्ये  लीन होते त्यास निरोध म्हणतात. तेव्हा  संपुर्ण  सृष्टिचे संहारण होते. या निरोध लक्षणाचा विस्तार  भागवतातील  दहाव्या स्कंधामध्ये केलेला आहे. 
नववे लक्षण आहे मुक्ति. अज्ञानकल्पित कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांचा संपूर्ण  त्याग करून वास्तविक स्वरूप परमात्म्यामध्ये स्थिर होणे याला मुक्ति म्हणतात. निष्काम भक्ती करून आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. या आत्मस्वरूपामध्ये स्थिर होणे याला मुक्ति म्हणतात. भागवतामध्ये पाच प्रकारच्या मुक्तिंचे वर्णन केले आहे. भगवंताच्या नित्य-चिन्मय धामामध्ये निवास ही सालोक्य मुक्ति आहे. भगवंतासमान ऎष्वर्य प्राप्त होणे ही सार्ष्टी मुक्ति आहे. भगवंताच्या निकट सहवास लाभणे ही सामीप्य मुक्ति आहे.  भगवंता समान रूप प्राप्त होणे ही सारूप्य मुक्ति आहे.  भगवंतामध्ये एकरूप होणे ही सायुज्य मुक्ति आहे. 
दहावे लक्षण आहे आश्रय. संपुर्ण  सृष्टिचा  आधार एकमेव परमात्मा आहे असा अर्थ आश्रय या लक्षणाचा आहे. या सगुणसाकार-रूप आश्रयाचे दहाव्या  स्कंधामध्ये आणि निर्गुण निराकार-रूप आश्रयाचे बाराव्या  स्कंधामध्ये विशेष वर्णन केलेले आहे. या आश्रयतत्त्वामध्ये भगवंताचे अधिष्ठान, साक्षित्व आणि निरपेक्षता सिध्द होते. या सृष्टिची उत्पत्ती आणि प्रलय ज्या महत्-तत्त्वाने प्रकाशित होतो ते परब्रह्म म्हणजेच आश्रय होय.

No comments:

Post a Comment