Wednesday, 20 December 2017

विनोबाजींच्या शिक्षणपध्दतीची आवश्यकता



  विनोबाजींच्या  शिक्षणपध्दतीची  आवश्यकता
आजच्या  परिस्थितीमध्ये  जे  जे  प्रश्न  उभे  आहेत  त्याचे  एकमेव  कारण  अज्ञान  हेच  आहे.  आजच्या  तरूणाचे  जीवन  दिशाहीन  आहे.  कारण  आज  त्याला  ज्ञान  देण्या  ऐवजी  शिक्षण  (पैसे  मिळविण्याचे)  दिले  जात  आहे.  हे  ज्ञान  कीती  हीनतेचे  आहे  हे  पाश्चात्यांनी  आपल्यावर  बिंबवून,  बिंबवून  सांगितले  कारण  त्यांना  त्या  ज्ञानाची  किंमत  समजली  होती  परंतू  त्यांना  आपल्याला  अज्ञानीच  ठेवायचे  होते  कारण  त्यातच  त्यांचा  स्वार्थ  होता.  आजच्या  भयाण  परिस्थितीचे  मूळ  कारण  काय  आहे  याचा  विचार  मी  सतत  करतो.  दोनशे  वर्षांपुर्वीचा  भारतीय  नागरिक   आजचा  नागरिक  यामध्ये  मनाची  संकुचितता,  स्वार्थीपणा  कोठून  आला?  उत्तर  आहे.  आजची  शिक्षणपध्दती
ही  शिक्षणपध्दती  भारतामध्ये  सुरू  करणायाचेच  लॉर्ड  मेकॉलेचे  शब्द  आहेत--येथे  भारतामध्ये  दुराचार  नाही,  भ्रष्ट्राचार  नाही,  हा  सर्व  येथील  संस्कृतीचा  परिणाम  आहे.  ही  परिस्थिती  बदलण्यासाठी  आपल्या  (पाश्चात्य)  संस्कृतीचा  प्रसार  केला  पाहिजे.  गुरूकुल  पध्दती  नष्ट  करून  शाळापध्दती  अंमलात  आली  पाहिजे.  आणि  परिस्थिती  हळूहळू  बदलत  गेली.  १९४७  पर्यंत  आपण  पारतंत्र्यात  होतो,  परंतू  स्वतंत्र  झाल्यावर  सुध्दा  शाळापध्दतीच  चालू  आहे.  कारण  त्याची  आपल्याला  सवय  झाली.  चटक  लागली.  शाळा  शिकला  तर  मोठ्या  पगाराची  नोकरी,  मान,  सन्मान  वगैरे....
 महाराष्ट्र  राज्य  मराठी  विश्वकोश  निर्मिती  मंडळाने  प्रसिध्द  केलेल्या  मराठी  विश्वकोशामध्ये  स्पष्ट  उल्लेख  आहे,--  मेकॉलेला  प्राचीन  भारतीय  वाङमय,  शास्त्रे  टाकाऊ  वाटत  होती.  भारतासारख्या  बहुभाषीक  देशातील  कारभारात  एकसूत्रीपणा  आणण्यासाठी  इंग्रजी  भाषा  सोयीची  असा  आग्रह  मेकॉलेने  धरला  होता.  या  देशातील  जनता  आणि  तिच्यावर  राज्य  करणारे  आपण  यांच्यातील  दुभाषांचा  एक  वर्ग  इंग्रजी  शिक्षणातून  उभा  राहील.  हे  लोक  रक्ताने,  वर्णाने  भारतीय  असले  तरी  त्यांची  अभिरूची,  त्यांची  मते,  विचारपध्दती  इंग्रजी  असेल  अशी  अपेक्षा  मेकॉलेची  या  शिक्षणपध्दती  बद्दलची  होती.  ही  शिक्षणपध्दती  आपल्या  देशामध्ये  १८३५  पासून  आजतागायत  सुरू  आहे.  त्याचे  दुष्परिणाम  आपण  सर्वजण  भोगतो  आहे  हे  सुर्यप्रकाशा  इतके  सत्य  आहे.
 ही  शिक्षणपध्दती  दोषी  आहे  म्हणून  अनेकांनी  त्यामध्येच  सुधारणा  करण्याचा  प्रयत्न  केला,  तर  काही  महाभागांनी  ही  शिक्षणपध्दती  लाभदायी  आहे  म्हणून  त्याची  प्रशंसा  केली,  परंतू  शासन  पातळीवर  केणीही  ही  मेकॉले-शिक्षणपध्दती  बंद  करून  आपली  गुरूकुल  पध्दती  पुन्हा  प्रस्थापित  केली  नाही.  या  प्रचलीत  शिक्षणपध्दती  विषयी  आपल्या  देशाचे  राष्ट्रपिता  महात्मा  गांधी  म्हणतात,  --  शिक्षणाला  शुध्द  चारित्र्याची  बैठक  नसेल  तर  त्या  शिक्षणाची  किंमत  शून्य  आहे.  त्या  शिक्षणाला  सत्यनिष्ठेचा   शुध्दतेचा  भरभक्कम  आधार  नसेल  तर  ते  कुचकामी  ठरेल.  आपल्या  जीवनातील  व्यक्तीगत  शुध्दता,  पावित्र्य  यांकडे  शिक्षकांचे  लक्ष  नसेल  तर  शिक्षकांचा  नाश  होईल.  केवळ  शिक्षकांच्या  पांडित्याला  काही  किंमत  नाही.
तरी  समृध्द  भारतासाठी,  विश्व-कल्याणासाठी  आज   विनोबाजींच्या  शिक्षणपध्दतीची  अत्यंत  आवश्यकता  आहे.  त्यामुळेच  स्वावलंबन,  सेवावृत्ती,  शिक्षकांचे  मुल्य,  राष्ट्रभक्ती,  संस्कारमुल्य,  व्यसनमुक्ती,  दारूबंदी,  व्यवहारज्ञान,  कृषीमुल्य,  कलेचा  विकास,  मानवता  मुल्य,  इत्यादी  अनेक  विचारांना  आचरणाची  दिशा  मिळेल,   भारतामध्ये  ख-या  अर्थाने  सुखसमृध्दी  नांदेल   विश्वामध्ये  शांती-समाधान  प्रस्थापित  होऊ  शकेल.  इतकी  प्रंचड  ताकद   विनोबाजींच्या  शिक्षणपध्दतीमध्ये  आहे.

 


Sunday, 17 December 2017

गंगावतरण




प्राचीन  काळातील  घटना  आहे.  एकदा  चक्रवर्ती  सम्राट सगराने  अश्वमेध यज्ञ केला. तेव्हा इंद्राने  अश्वमेध यज्ञातील  घोडा   पळवून नेला. परंतू तो कपिलाश्रमाच्या बाहेर बांधला. सम्राट सगरास दोन पत्न्या होत्या. एका पत्नीस  ६००००पुत्र होते. त्या सर्व सगरपुत्रांनी चारही दिशांना तो घोडा  शोधला. सरतेशेवटी तो घोडा त्यांना कपिलाश्रमाच्या बाहेर दिसला. आपल्या आश्रमामध्ये भगवान कपिल समाधि अवस्थेमध्ये होते. अश्वमेध यज्ञातील  घोडयाबद्दल  त्यांना माहित सुध्दा नव्ह्ते. त्या सर्व सगरपुत्रांनी कपिलाश्रमाच्या बाहेर अश्वमेध यज्ञातील 
घोडा पाहून कपिलांचा  अपमान केला. त्यामुळे भगवान कपिलाने केवळ एका दृष्टीक्षेपाने  त्या सर्व सगरपुत्रांना  भस्मसात केले. सम्राट सगराने आपल्या ६००००पुत्रांचा सर्वत्र खूप शोध केला. परंतू त्या ६००००पुत्रांचा  खूप शोध लागला नाही.
सगराच्या  दुसऱ्या  पत्नीस  एकच असमंजस नावाचा पुत्र  होता. असमंजसाच्या पुत्राचे नाव अंशुमान होते. सम्राट सगराच्या आज्ञेनुसार अंशुमान घोडयाचा  शोध करण्यासाठी निघाला. शोध घेत घेत तो कपिलाश्रमापाशी आला. तेथे त्याला राखेचे मोठ-मोठे डोंगर दिसले.  अंशुमान  कपिलाश्रमामध्ये जाऊन भगवान कपिलाचे विनम्रपुर्वक दर्शन घेतले. कपिलांना  नमस्कार केला. त्या राखेच्या डोंगरांचे रहस्य अंशुमानला भगवान कपिलांकडून समजले कि, ६००००सगर पुत्रांच्या रक्षेचे ते डोंगर आहेत. अंशुमानास दु:ख झाले. तेव्हा त्यास कपिलांकडून समजले कि, सगरपुत्रांचा  उध्दार  केवळ  गंगाजलाने होऊ शकतो.  तेव्हा  गंगा  स्वर्गामध्ये होती. अंशुमानने  गंगा  पृथ्वीवर  आणण्यासाठी  कठोर तप केले. परंतू यथावकाश  अंशुमानाचा मृत्यु झाला. अंशुमानाचा पुत्र दिलीप होता. दिलीप ने सुध्दा गंगा  पृथ्वीवर  आणण्यासाठी  कठोर तप केले. परंतू यथावकाश  दिलीपाचा सुध्दा मृत्यु झाला. दिलीपाचा पुत्र भगिरथाने  गंगा  पृथ्वीवर  आणण्यासाठी  कठोर परिश्रम  केले. तेव्हा भगिरथास गंगा प्रसन्न झाली. गंगा देवीने भगिरथास दर्शन दिले. तेव्हा भगिरथाने गंगा देवीस पृथ्वीवर येण्याची प्रार्थना केली. त्यावर गंगा—मी स्वर्गातून पृथ्वीवर येताना माझा  प्रचंड  वेग असणार. तो धारण कोण करू शकेल, अन्यथा मी रसातळामध्ये  जाईन, तसेच पृथ्वीवरचे पापी मनुष्ये माझ्या पात्रामध्ये स्नान  करून  मी अपवित्र  होईन. तेव्हा पुन्हा भगिरथाने महादेवास प्रसन्न करून गंगामातेस आपल्या मस्तकावर धारण करण्याची प्रार्थना केली. आणि गंगामातेस भगिरथाने सांगितलेहे माते,महादेव  तूला मस्तका  वर  धारण  करतील, म्हणून  तूझा  वेग  साधारण  होईल,  तसेच  पुण्यवतांनी  स्नान  केल्यास तू पुन्हा  पवित्र होशील,  कारण  त्यांच्या  हृदयात  साक्षात  भगवान विराजमान असतात. तेव्हा गंगा  पृथ्वीवर अवतरीत झाली.  भगिरथाने गंगाजलाच्या पुण्यस्पर्शाने सगरपुत्रांचा  उध्दार केला. त्या सर्व् ६००००सगर पुत्रांना स्वर्गप्राप्ती झाली. गंगास्नानाने  मनुष्यास भगवत्स्वरूप प्राप्त होते. कर्मबंधनातून मुक्ती मिळ्ते. हा  गंगा  महिमा आहे. ही गंगादेवी  स्वर्गामध्ये भगवत  चरणकमलातून  निर्माण झालेली आहे.
मा  गंगे  तू  सर्व  धर्माची  अधिष्ठात्री  जीवनदायी आहेस. सर्व तीर्थांमध्ये  तू श्रेष्ठ आहेस. तू सर्वांना निर्मळ  करणारी आहेस. मनुष्याच्या ह्र्दयामध्ये परमानंद  उत्पन्न  करणारी आहेस. मनुष्यास परमशांती  देणारी आहेस.  तूझ्या  पवित्र  जलाने  आमचे  सर्व  ताप  नष्ट  होवो.

Saturday, 16 December 2017

मार्कण्डेयास मायेचे दर्शन




प्राचीन  काळातील  घटना  आहे.  एकदा मार्कण्डेय मुनीने मायेचे दर्शन होण्याची इच्छा भगवान नारायणाकडे व्यक्त केली. तेव्हा भगवान नारायण ठीक आहे म्हणून बदरीवनामध्ये निघून गेले. मार्कण्डेय मुनी आपल्या आश्रमामध्ये मायेचे दर्शन केव्हा होईल याचेच चिंतन करू लागले. काही दिवसांनंतर एके दिवशी अचानक जोरदार तुफान आले. मुसळधार पाऊस कोसळू लागला. तेव्हा मार्कण्डेय मुनीने असे पाहिले की, विशाल समुद्र संपूर्ण पृथ्वी गिळू लागला आहे. सर्वत्र विशाल समुद्राच्या लाटा उसळत आहेत. संपूर्ण पृथ्वी समुद्रामध्ये बुडाली. मार्कण्डेय मुनी बुडाले. तहान-भूकेने व्याकुळ झाले. भयभीत झाले. लाटांचे तडाखे अंगावर येत होते. अशा प्रकारे भगवंताच्या मायेमध्ये गुरफटून त्या विशाल समुद्रामध्येच कोट्यावधी वर्षे होऊन गेली असे त्यांना वाटले. एके दिवशी अचानक त्या मुनींना एक वटवृक्ष दिसला. त्या वटवृक्षाच्या एका पानावर एक तेजस्वी बालक दिसले. त्या बालकाच्या तेजाने सर्वत्र लख्ख प्रकाश आला. ते बालक पाचूच्या खड्याप्रमाणे निळसर रंगाचे होते. ते अत्यंत मनोहर दिसत होते. ते तेजस्वी बालक आपल्या पायाची बोटे तोंडामध्ये घालून चोखीत होते. ते पाहून मार्कण्डेय मुनी आश्चर्यचकीत झाले. त्या तेजस्वी बालकाच्या दर्शनाने त्या मुनींचा थकवा निघून गेला. आनंदाने मार्कण्डेय मुनी प्रफुल्लित झाले. शरीर पुलकित झाले. त्या बालकाजवळ जाताच मार्कण्डेय मुनी त्या तेजस्वी बालकाच्या शरिरामध्ये गेले. तेथे ही मार्कण्डेय मुनींनी विशाल सृष्टी पाहिली. ते पाहून मार्कण्डेय मुनी पुन्हा आश्चर्यचकीत झाले. त्यांना काहीच समजेना. काही वेळानंतर मार्कण्डेय मुनी त्या तेजस्वी बालकाच्या शरिरातून बाहेर आले. आता पुन्हा त्या मुनींना एक वटवृक्ष दिसला. त्या वटवृक्षाच्या एका पानावर तेच तेजस्वी बालक दिसले. काही क्षणामध्ये ते तेजस्वी बालक अदृश्य झाले. तसेच तो विशाल समुद्र सुध्दा अदृश्य झाला. दुसऱ्याच क्षणी मार्कण्डेय मुनी आपल्या आश्रमामध्येच बसलेले आहेत असा अनुभव आला.
अशा रितीने मार्कण्डेय मुनीने मायेचे दर्शन घेतले.