Wednesday, 14 February 2018

पुरूषोत्तम-तत्त्व




पुरूषोत्तम-तत्त्व फक्त या विश्वामध्ये व्यापून आहे, तर विश्वातीत आहे. हे विश्व त्याच्या ऎश्वर्ययोगाच्या केवळ एक अंश आहे. हे पुरूषोत्तम-तत्त्व अनंत आहे अनिर्वचनीय आहे, नित्य आपल्या ऎश्वर्यामध्ये स्थित असते. या विश्वामध्ये तसेच याविश्वाच्या बाहेर सुध्दा सर्वत्र पुरूषोत्तमाची अभिव्यक्ति आहे. भगवान श्रीकृष्ण या पुरूषोत्तम-तत्त्वाचे दिव्य मूर्तस्वरूप आहे. भगवान श्रीकृष्ण निर्गुण आहे कि सगुण आहे, निराकार आहे कि साकार आहे, ज्ञेयतत्त्व आहे कि ज्ञाता आहे, मायावी आहे कि मायातीत आहे, हे समझणे मनुष्यास संभव नाही. परंतू भगवंताच्या कृपेने च हे समझणे मनुष्यास संभव आहे. भगवान श्रीकृष्ण सच्चिदानंदस्वरूप, दिव्यदेह युक्त आहे.
एकदा श्रीकृष्णाने महादेवास दर्शन देऊन उपदेश केला—हे महादेवा, आज तू माझे जे अलौकिक रूप पाहिले आहेस, ते विशुध्द प्रेमाची घनमूर्ती आहे. माझ्या या रूपास धर्मशास्त्रानुसार निर्गुण, निराकार परात्पर ब्रह्म म्हणतात. माझ्यामध्ये प्रकृतीच्या गुणांचा अभाव असल्याने मला निर्गुण म्हणतात. माझ्यामध्ये प्रकृतीच्या गुणांची सत्ता अनंत असल्याने मला ईश्वर म्हणतात. माझे हे अलौकिक रूप प्राकृतीक डोळ्यांनी दिसत नसल्याने मला निराकार म्हणतात. मी सर्वव्यापक असल्याने पंडितजन मला ब्रह्म म्हणतात. मी स्वत: अकर्ता असल्याने मला निष्क्रिय म्हणतात. कारण मी स्वत: काहीच कार्य करीत नाही, ब्रह्मा, विष्णु, व् रूद्र हे माझे अंश सृष्टिच्या निर्मितीचे, पोषणाचे, व संहाराचे कार्य करतात.
भगवान श्रीकृष्ण प्राप्त करण्याचे मुख्य साधन अनन्य शरणागती किंवा पूर्ण समर्पण हेच आहे. भगवंताची अपरा व परा अशी दोन प्रकृती आहेत. अपरा ही जड असून परा ही चॆतन्यस्वरूप आहे. या परा शक्तिपासून सृष्टी निर्माण झालेली आहे. भगवंताची ही परा शक्ति स्वरूपभूता महाशक्तिचाच अंश आहे.
वेदांतानुसार तीन सत्ता आहेत. १.पारमार्थिक, २.व्यावहारिक, ३.प्रातिभासिक पारमार्थिक सत्तेमध्ये एकच ब्रह्म आहे. या ब्रह्मामध्ये जेव्हा स्पंदन उत्पन्न होते, तेव्हा व्यावहारिक, प्रातिभासिक सत्ता निर्माण होतात. जाग्रत अवस्थेमध्ये व्यावहारिक सत्ता तर स्वप्नावस्थेमध्ये प्रातिभासिक सत्ता मानलेली आहे. पारमार्थिक सत्ता हेच परमसत्य असून व्यावहारिक व प्रातिभासिक या दोन्ही सत्ता अज्ञानयुक्त आहेत.
हेच पुरूषोत्तम-तत्त्व मनुष्याने जाणून घेऊन त्याची अनुभूतीसाठी नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे तेच मनुष्य-जीवनाचे अंतिम उद्दीष्ट आहे.

No comments:

Post a Comment