पुरूषोत्तम-मासाचा अभ्यास
करण्यासाठी थोडा खगोल शास्त्राचा विचार केला पाहिजे. पृथ्वी स्वत:भोवती तसेच
सूर्याभोवती फिरते. तर चंद्र पृथ्वी भोवती फिरतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास
३६५ दिवस ५तास ४८ मिनीटे लागतात. या कालावधीस सौरवर्ष म्हणतात. चंद्राला पृथ्वी भोवती फिरण्यास २९ दिवस १२ तास ४४
मिनीटे लागतात. या कालावधीस चांद्रमास म्हणतात. अशा चंद्राच्या १२ प्रदक्षिणा
होण्यास ३५४ दिवस ८तास ४८ मिनीटे लागतात. या कालावधीस चांद्रवर्ष म्हणतात. अशा
रितीने सौरवर्ष व चांद्रवर्ष यामध्ये अंदाजे ११ दिवसांचा फरक आहे. हा ११ दिवसांचा
फरक दर तीन वर्षांनंतर एका महिन्याने भरून काढला जातो. या नविन महिन्यास
पुरूषोत्तम-मास म्हणतात.
वास्तविक सूर्य स्थिर असून
पृथ्वी सूर्याभोवती फिरते. परंतू आपल्याला सूर्य फिरत असल्याचा भास होतो. या
भासमान सूर्याच्या गतीला संक्रमण म्हणतात. बारा राशीतून सूर्याचे संक्रमण होत
असते. प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातो. परंतू
चांद्रमासामुळे अंदाजे तीन वर्षांनंतर सूर्याचे संक्रमण होत एखाद्या महिन्यामध्ये
सूर्याचे संक्रमण होतच नाही. त्या महिन्यास पुरूषोत्तम-मास म्हणतात.
अशा रितीने यंदा जेष्ठ पुरूषोत्तम-मास आहे. (१६मे२०१८-१३जुन२०१८) पुरूषोत्तम-मासा मध्ये गृहप्रवेश, वास्तुशांत, विवाह, मुंज, इत्यादी संकल्पयुक्त धार्मिक कार्यांचे मुहुर्त नसतात. पुरूषोत्तम-मासा मध्ये तीर्थस्नान, दानधर्म, उपास, मौनव्रत करावीत. त्यामुळे जीवन सुखदायी व शांतीमय होते.
गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणम् । गोकुलोत्सव मीशानं गोविंदं गोपिकाप्रियम् ।।
संपूर्ण महिनाभर या मंत्राचे निरंतर पवित्र उच्चारण केल्याने पुरूषोत्तम भगवंताची प्राप्ती होते.
बृहद्नारदीय पुराणामध्ये पुरूषोत्तम-मासा मध्ये काय करावे याचा उपदेश भगवान श्रीकृष्णाने नारदास केला आहे. तो थोडक्यात असा आहे. दररोज नारायणाचे नामस्मरण करावे. मौनव्रत करून भगवंताचे चिंतन, मनन करावे. श्रीमद भागवत महापुराणाचे श्रवण, चिंतन करावे. या मासाचा स्वामी साक्षात पुरूषोत्तम असल्याने या मासास पुरूषोत्तम-मास असे म्हणतात. या पुरूषोत्तम-मासामध्ये नेहमीची भौतिक सुख-समृध्दीची कर्मे करू नये. परंतू या पुरूषोत्तम-मासामध्ये दानधर्म करावे. दररोज धात्रीस्नान करावे. आवळ्याचा गर अंगास लाऊन स्नान करणे याला धात्रीस्नान म्हणतात. बारा वर्षे गंगास्नान करून जे पुण्य मिळते तेच पुण्य या पुरूषोत्तम-मासामध्ये दररोज कोणत्याही पाण्याने धात्रीस्नान केल्याने केवळ एकाच महिन्यामध्ये प्राप्त होते.
या पुरूषोत्तम-मासामध्ये दीपदान केल्याने सौंदर्य, संपत्ती, ज्ञान व मोक्ष प्राप्त होते. सुवर्ण दान केल्याने सर्व मनोरथ पुर्ण होतात. गोदान केल्यास पापमुक्ती होते. चांदी दान केल्याने पितरांना संतुष्टी प्राप्त होते. तांब्याच्या वस्तू दान केल्याने महादेव प्रसन्न होतात. हिरे माणिकाच्या दानाने यश-किर्ती मिळते. मोती दान केल्याने मुक्ती लाभते. अंथरूण-पांघरूण दान केल्याने सर्व पापांचा नाश होतो. वस्त्र दान केल्याने शांती समाधान लाभते. लोकरीची वस्त्र दान केल्याने सर्व प्रकारच्या भिती पासून मुक्तता होते. अन्नदानाने सर्व सिध्दी प्राप्त होतात. जल दानाने अक्षय पुण्य प्राप्त होते. जे पुण्य नष्ट होत नाही त्यास अक्षय पुण्य म्हणतात. पादत्राण दान केल्याने यम-यातने पासून मुक्तता होते. धृतपात्र दान केल्याने अक्षय सूर्यलोक प्राप्त होतो. तीळपात्र दान केल्याने रूद्रलोक प्राप्त होतो. सप्तधान्य दान केल्याने सप्तर्षी प्रसन्न होतात. धृत-विलायची युक्त लाडू दान केल्याने गोलोक होतो. धृत-पक्व मोदक दान केल्याने कार्य सिध्दी प्राप्त होते. भागवत ग्रंथ दान केल्याने कुळाचा उध्दार होतो. पती-पत्नी दोघांस अनारसे पात्रासहीत दान केल्याने जन्म-मरणाच्या दुष्ट चक्रातून मुक्ती मिळते.
असे हे पुरूषोत्तम-मासा मध्ये दानाचे महत्त्व आहे. जो मनुष्य दृढ श्रध्देने दानधर्म करतो त्यास चार पुरूषार्थ प्राप्त होतात. हे दान किती, कशासाठी करावे हे सुध्दा सांगितलेले आहे. आपल्या उत्पन्नाचा पाचवा भाग दान करावे. आपल्या धनाची शुध्दी होण्यासाठी दान करावे. आपण मिळविलेल्या उत्पन्नावर इतर लोकांच्या वाईट वासना असतात. म्हणून ते उत्पन्न आपणास लाभदायक होण्यासाठी दान करावे. उदाहरणार्थ एखाद्या मनुष्याने शंभर रूपये मिळविल्यास त्याने आपले ऐशी रूपये शुध्द होण्यासाठी वीस रूपये दान करावे. तरी जो मनुष्य या पुरूषोत्तम-मासामध्ये दानधर्म करीत नाही तो महामूर्ख समजावा. कारण तो आपले कल्याण साधण्याचा प्रयत्न करीत नाही, मनुष्यजन्माचे सार्थक करून घेत नाही. खाणे, पीणे व भोग भोगणे एव्हढेच मनुष्यजन्माचे सार्थक नसून मोक्ष प्राप्ती हेच आहे.
No comments:
Post a Comment