श्रीब्रह्मवैवर्त
पुराणानुसार एकदा श्रीराधाराणीने उध्दवाला उपदेश केला.
हे उध्दवा, सर्व
वरदानांमध्ये श्रीकृष्णाची दास्यभक्ती श्रेष्ठ वरदान आहे. सायुज्य, सलोक्य,
सारूप्य, सामीप्य आणि कैवल्य या पाच मुक्तींमध्ये सुध्दा हरिभक्ती सर्व श्रेष्ठ आहे. ब्रह्मत्व, देवत्व, इंद्रत्व, अमरत्व,
अमृतप्राप्ती तसेच सिध्दीप्राप्ती या सर्वांपेक्षा हरिभक्ती अत्यंत दुर्लभ आहे.
पुर्वजन्मांच्या पुण्याईने या भारतभूमीमध्ये जन्माला येऊन जो हरिभक्ती करतो, त्यास
पुन्हा जन्माला यावे लागत नाही, कारण तो मुक्त होतो. त्याचाच जन्म सार्थकी लागतो.
तो आपल्या माता-पिता, पुर्वज, बहिण-भाऊ, पत्नी-पुत्र, गुरू-शिष्य, नोकर या
सर्वांचे सहस्त्रावधी कर्मबंधने नष्ट करतो. जे कर्म कृष्णार्पण केले जाते, किंवा
ज्या कर्माने श्रीकृष्णाची भक्ती वृध्दींगत होते, ते कर्म सर्वोत्तम आहे. शुध्द
अंत:करणाने व शास्त्रोक्त संकल्पाने केलेले कर्म मंगलमय असते. अशा केलेल्या
कर्माचे फळ अनंत सुखकारी असते. श्रीकृष्णासाठी व्रत करणे, तप करणे, पूजन करणे यामुळे श्रीकृष्णाची दास्यभक्ती वृध्दींगत होते.
संपूर्ण पृथ्वीचे दान,
त्रिभुवनाची परिक्रमा, सर्व तीर्थक्षेत्रांचे स्नान, सर्व व्रते, तप, वेद-वेदांत
शिकणे तसेच शिकविणे, दुर्लभ तत्त्वज्ञानाचा उपदेश, अतिथिंचा सत्कार, शरणागतांना
अभय-दान, गायत्री-पुरश्चरण, ब्राह्मण-भोजन, माता-पित्यांची सेवा इत्यादी शुभ
कर्मे श्रीकृष्णाच्या दास्यभक्तीचा सोळावा
भाग सुध्दा नाहीत. म्हणून हे उध्दवा, तू श्रीकृष्णाचेच नित्य निरंतर स्मरण कर. तो श्रीकृष्ण प्रकृतीत, निर्गुण,
परमात्मा, ईश्वर, नित्य, सत्य, परब्रह्म आणि प्रकृतीचे स्वामी आहे. तो परिपूर्ण,
शुध्दरूप, भक्तांसाठी अनुग्रहरूप, ज्योतिस्वरूप, तसेच आदिकारण आहे. म्हणून हे उध्दवा, तू पापी ममता (श्रीकृष्ण माझा भाऊ आहे ही ममता) सोडून परमानंदस्वरूप श्रीकृष्णाचेच
नित्य निरंतर स्मरण कर.
हा दिव्य उपदेश ऎकून
उध्दवाला मोठे आश्चर्य वाटले. तसेच या परमोच्च तत्वज्ञानाने तो तृप्त झाला. त्याने
श्रीराधाराणीच्या चरणी पुन्हा पुन्हा लोटांगणे घातली. त्या अद्भूत प्रेमाने
त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहू लागले, संपूर्ण शरीर रोमांचित झाले.
No comments:
Post a Comment