ब्राह्मणांची भूमिका सनातन
वैदिक धर्मास अनुसरून आहे. सनातन वैदिक धर्माची भूमिका गुण-कर्मावर आधारलेली आहे.
सत्वगुणातून ब्राह्मणांची भूमिका ठरत असते. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अस्तेय,
अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्राणिधान, इंद्रिय-संयम, आणि मनोनिग्रह हे सत्वगुण
आहेत.
अहिंसा म्हणजे विचाराने, बोलण्याने, व कृतीने कोणाचीही हिंसा न करणे. शरीराने
कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे. बोलण्याने सुध्दा कोणालाही दुखवायचे नाही. आणि
मनाने सुध्दा कोणाच्याही बाबतीत हिंसात्मक विचार करायचा नाही. असे अहिंसेचे आचरण
करणाऱ्या ब्राह्मणांची भूमिका जातीभेदाच्या पलिकडे असते. सत्याचे सुध्दा आचरण
शरीराने, बोलणे वाणीने, व चिंतन मनाने ब्राह्मण करीत असतो. सत्य म्हणजे काय हे
समजून घेतले पाहिजे. या सृष्टीचा कर्ता करविता परमेश्वर असून तोच संपूर्ण सृष्टीमध्ये
ओतप्रोत व्यापून आहे हेच सत्य आहे, इतर सर्वकाही मायावी आहे. म्हणून आद्य
शंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्य जगत मित्थ्या. असा सत्याचा ध्यास घेतलेल्या ब्राह्मणांमध्ये
केवळ अभेद वृत्ती असते. तेथे भेदाचा विचार सुध्दा नाही. ब्रह्मचर्य म्हणजे केवळ
प्रजोत्पादनासाठी पत्नीशी समागम होय. वेदे विहीले पाणिग्रहण । ते प्रजार्थ
स्वदारागमन । परी रत्यर्थ नित्य मैथुन । हे वेदाज्ञा जाण असेना ।।ए.भा.५.२७४॥
एकनाथ महाराज म्हणतात, वेदामध्ये लग्नाचा विधी सांगितला आहे तो फक्त प्रजोत्पादनासाठी
स्वस्त्रीशी गमन करावे म्हणून आहे, परंतू केवळ रतिसुखासाठी दररोज स्त्रीसंग करावा
ही वेदाज्ञा नाही. ब्रह्मचर्य आचरणाने पत्नी विषयी आपूलकी निर्माण होते. इतर स्त्री
विषयी आदराची भावना निर्माण होते. जेथे स्त्रियांची पूजा
होते तेथे सुख-शांती
व समृध्दि असते. सुख-शांती व
समृध्दि अभेदातूनच निर्माण होत असते. भेदामुळे केवळ वैरभाव निर्माण होते. अस्तेय
म्हणजे दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ न करणे. स्वत: कष्ट करून मिळविलेल्या
पैशावरच आपला आधिकार ब्राह्मणांनी मानल्यामुळे लोभ नष्ट होतो. लोभ नसल्यामुळे
स्पर्धेचे भूत मागे लागत नाही. शांतता प्राप्त होते. भेदवृत्तीमुळे हाव संपत नाही.
अपरिग्रह म्हणजे गरजे पेक्षा आधिक
वस्तुंचा साठा न करणे. यामुळे वस्तुंचा विनीयोग समानतेने
होतो. माझ्या प्रमाणे इतर सर्वांना त्या वस्तुंचा उपभोग घेता आला पाहिजे ही
उदारता, व्यापकता निर्माण होते. ही मनाची व्यापकता अभेदातूनच निर्माण होत असते. तर
भेदातून संकुचितता प्रगट होते. शौच म्हणजे विवेकाने मनाची
व सात्विकतेने शरीराची
शुध्दता होय. मनाच्या शुध्दतेमध्ये भेद नसतो. मनाच्या शुध्दतेमध्ये
एकात्मतेची भावना असते. संतोष म्हणजे समाधानवृत्ती होय. भेदातून समाधानवृत्ती होऊच
शकत नाही. मी-माझे, तू-तूझे हीच भेदवृत्ती
आहे. परंतू संतोषामध्ये मी-तू पणा नसतो. मी-तू मध्ये मत्सर भावना असते. तप म्हणजे
उपासना होय. उपासनेचा खरा अर्थ आहे परमेश्वरा जवळ जाण्याचा मार्ग होय. परमेश्वरापाशी
भेदवृत्ती नाही, ती नास्तिकांमध्ये असते. तो परमेश्वर सर्वांना सूर्यप्रकाश, हवा,
पाणी देतो. स्वाध्याय म्हणजे धर्मशास्त्रांचा अभ्यास होय. सनातन वैदिक धर्माची
शिकवण भेदातून अभेदाकडे जाण्याची आहे. द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याची आहे. म्हणून
ब्राह्मणांची भूमिका जातीभेदाच्या पलिकडे जाणारी आहे. ईश्वरप्राणिधान म्हणजे भगवंतावर नितांत
श्रध्दा असणे. श्रध्देतून ज्ञान प्राप्त होते, तर ज्ञानानेच एकात्मता
प्राप्त होते. एकात्मतेमध्ये अभेदवृत्ती आहे. भेद हे अज्ञान आहे, ज्ञान हेच
अभेद-दर्शन आहे. इंद्रिय-संयम म्हणजे सर्व ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्यावर
नियंत्रण असणे. नाक, जिभ, डोळे, त्वचा, कान ही ज्ञानेंद्रिये व वाणी, हात, पाय, शिश्न, गुदा ही
कर्मेंद्रिये यांना विषयभोगा पासून
नियंत्रित ठेवणे हा इंद्रिय-संयम आहे. वस्तुत: ज्ञानेंद्रिये ही ज्ञान
ग्रहण करण्यासाठी असतात आणि कर्मेंद्रिये कर्म करण्यासाठी असतात. परंतु मनुष्य
त्यांचा गैरवापर करतात आणि त्यामुळे अनर्थ निर्माण होतो. ॐ भद्रं कर्णेभि: श्रृणुयाम
देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:। स्थिरैरंगैस्तुष्टुवा सस्तनूभिर्व्यशेम देवहितं
यदायु: ॥प्रश्नोपनिषद शांतिपाठ॥ ही देवांकडे केलेली प्रार्थना आहे. हे देवांनो,
आम्ही परमेश्वराची आराधना करण्यासाठी कानांनी कल्याणकारी शब्दांचे श्रवण करू,
डोळ्यांनी कल्याणकारी दृश्ये पाहु, तसेच सृदृढ शरीराने कल्याणकारी वस्तुंचा उपभोग
घेऊ. याचा भावार्थ असा आहे, कि ब्राह्मण जो काही ज्ञान ग्रहण करतो, कर्म करतो ते
सर्वकाही परमेश्वराची आराधना करण्यासाठीच करतो. परमेश्वराची आराधना करण्यामध्ये
भेदवृत्ती नसते. केवळ भौतिक उपभोगासाठी भेदवृत्ती असू शकते. परमेश्वराची आराधना
करण्यामध्ये कर्मयोग साधना आहे. कर्मयोग म्हणजे कर्म करण्याचा अहंकार सोडून
कर्मफळाची अपेक्षा न करणे. अर्जुनाने याच कर्मयोगाच्या आचरणाने महाभारत युध्द
जिंकले. शेवटचा परंतु अत्यंत महत्वाचा सदगुण आहे मनोनिग्रह. मनोनिग्रह म्हणजे मनावर
नियंत्रण होय. रामदास स्वामींनी या मनोनिग्रहासाठी २०५ श्लोकांची रचना केलेली आहे.
मनुष्याची सर्व इंद्रिये मनाच्या नियंत्रणामध्ये असतात. ब्राह्मण ते मन परमेश्वराच्या
चरणी समर्पित करतात. म्हणून त्यांचे मन अभेदवृत्तीमध्ये स्थिर असते.
अशा रितीने ब्राह्मणांची
भूमिका जातीभेदाच्या पलिकडे असते. ज्या मनुष्याचे आचरण अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरिग्रह, शौच,
संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्राणिधान, इंद्रिय-संयम, आणि मनोनिग्रह या सत्वगुणांवर आधारलेले आहे, त्यांनाच धर्मशास्त्रामध्ये
ब्राह्मण संबोधलेले आहे.
No comments:
Post a Comment