Sunday, 4 February 2018

भागवताचा सारांश



 श्रीमद्  भागवत  हा  एक  अलौकिक  ग्रंथ  महर्षी  व्यासदेवांनी  मनुष्यमात्रांच्या  कल्याणासाठी  तयार  केलेला  आहे.  त्यामध्ये मनुष्याने  जीवन  कसे  जगावे  तसेच  मृत्यसमयी  काय  करावे  याचे  मार्गदर्शन  केले  आहे.  भागवत  हा  एक  आध्यात्मिक  विचार  आहे.  शरीराचा  आत्म्याशी  असलेला  संबंध  समजून  घेण्याचा  विचार  आहे.  भागवत  म्हणजे  फक्त  इतिहास  तसेच  पुराण  नाही,  ते  एक  परमसत्य  आहे.  भागवत  हा  एक  मनुष्यजीवन  सार्थकी  लावण्याचा  सविस्तरपणे  केलेला  उपदेश  आहे  आता  भागवताचे  इतिहासरूप  दर्शन  असे  आहे.  भागवत  हा  एक  हिंदू  संस्कृतीतील  महत्वाचा  धार्मिक  ग्रंथ  आहे.  जेव्हा  परमात्म्याचे  स्वरूप  जाणण्याची  इच्छा  ब्रह्मदेवास  झाली  तेव्हा  परमात्म्याच्या  स्वरूपाचा  उपदेश  प्रथम  विष्णुु  भगवानाने  ब्रह्मदेवाला  सांगितला.  तो  चतुःश्लोकी  भागवत  म्हणून  प्रसिध्द  आहे.  नंतर  नारदमुनींना  या  विश्वाचा  आधार  जाणण्याची  इच्छा  झाली  तेव्हा  ब्रह्मदेवाने  नारदमुनींना  परमसत्याचा  उपदेश  सांगितला.  महर्षी  व्यासांनी  अनेक  अध्यात्मिक  वाङमय  रचले.  वेदांचे  चार  भाग  केले.  वेदांचे  अध्यापन  केले.  सतरा  पुराणे  रचली  तरी  पुर्ण  समाधान  झाले  नाही.  तेव्हा  देवर्षी  नारदमुनींनी  महर्षी  व्यासांना  भक्तिचा  उपदेश  केला  ती  भागवताची  प्रस्तावना  आहे.  महर्षी  व्यासांनी  या  उपदेशानुसार  भागवत  पुराण  रचले  ज्यामध्ये  श्रीहरीगुणसंकिर्तन  प्रामुख्याने  आहे.  असे  हे  आत्मज्ञानाचे  महत्त्व  सांगणारे  दिव्यज्ञान  त्यांंनी  कलीयुगाच्या  प्रारंभी  आपल्या  पुत्र  शुकदेवास  शिकविले  जो  परमभक्त  असून  पुर्ण  वैरागी  होता.  शुकदेवाने  हाच  भागवत  उपदेश  परीक्षितास  सात  दिवसांमध्ये  केला.  जेव्हा  अर्जुनाचा  नातू  परीक्षितास  शमीकपुत्रा  कडून  तक्षक  सर्पदंशाने  सातव्या  दिवशी  मृत्युचा  शाप  मिळाला  तेव्हा  परीक्षिताने  गंगाकीनारी  आमरण  उपोषण  केले  त्यावेळी  परीक्षिताने  शुकदेवास  प्रश्न  केला  माझ्या  जीवनाच्या  अंतकाळी,  मृत्युसमयी  काय  करावे  जेणे  करून  या  मनुष्यजन्माचे  सार्थक  होईल.  त्यावेळी  शुकदेवाने  परीक्षितास  सात  दिवस  जो  उपदेश  केला  तेच   हे  भागवत  होय.  सात  दिवसांमध्ये  परीक्षिताने  शुकदेवास  विश्वनिर्मीतीविषयी,  श्रीहरीअवतारांविषयी,  श्रीहरीलीलांविषयी,  हरीभक्तांविषयी,  आत्मज्ञानाविषयी  अनेक  प्रश्न  केले.  त्याचे  शुकदेवाने  विस्ताराने,  कथानकाद्वारे  प्रत्युतर  केले.  असे   हे  भागवताचे  स्वरूप  परीक्षित   शुकदेव  यांचे  संवादरूपाचे  आहे.  सात  दिवस  अखंड  तत्वज्ञान  ऐकून  परीक्षितास  आत्मज्ञानाचा  बोध  झाला.  त्याचा  देहाभिमान  पूर्णपणे  नाहीसा  झाला.  तो  ब्रह्मस्वरूप  झाला.  त्यास  मोक्ष  प्राप्त  झाला.  तेव्हा  या  गंगाकिनारी  परीक्षित  महाराजा  बरोबर  अनेक  साधु,  ऋषी,  मुनी  हे  दिव्यज्ञान  श्रवण  करण्यासाठी  बसले  होते.  त्यामध्येच  सुतमहाराज  नावाचे  एक  ज्येष्ठ  मुनी  सुध्दा  होते.  त्यांनी  हे  भागवताचे  दिव्यज्ञान  पुढे  शौनक  ऋषींना  निमीषारण्यामध्ये  कलीयुगातील  संकटावर  रामबाण  उपाय  म्हणून  हे  भागवत  पुराण  सांगितले  आहे.  आजच्या  काळामध्ये  जे  भागवत  पुराण  उपलब्ध  आहे  ते  सुत  मुनींनी  शौनक  ऋषींना  सांगितलेले  लिखीत  स्वरूपामध्ये  आहे.  हा  भागवत  ग्रंथ  संस्कृत  भाषेमध्ये  आहे.  म्हणुन  एकनाथ  महाराजांनी  सर्वसामान्यांसाठी  मराठी  भाषेमध्ये  केवळ  भक्तिरूप  तत्त्वज्ञान  असलेल्या  अकराव्या  स्कंधाचे  निरूपण  केले  आहे.  ते  एकनाथी  भागवत  म्हणून  प्रसिध्द  आहे.  पुढे  त्यांच्याच  वंशातील  कृष्ण  दयार्णवांने  एकनाथांच्या  आज्ञेप्रमाणे  श्रीकृष्णलीलेच्या  दहाव्या  स्कंधाचे  मराठी  भाषेमध्ये  निरूपण  केले.  ते  हरिवरदा  या  नावाने  प्रसिध्द  आहे.
 या  भागवतधर्माला  स्थळाचे,  जातीचे,  धर्माचे,  वंशाचे,  काळाचे  कोणतेच  बंधन  नाही.  हा  भागवतधर्म  सदा  सर्वकाळ  सर्वांसाठी  आहे.  हे  तत्वज्ञान  जिज्ञासू  पर्यंत  पोहोचविण्याची  आज  गरज  आहे.  आपल्या  संस्कृतीचा  वारसा  उद्याच्या  नवीन  पिढीला  देणे  हे  आपले  कर्तव्यच  आहे.  भागवताचा  आज  उपयोग  काय,  हे  भागवत  म्हणजे  काय,  हे  समजल्यावर  स्पष्ट  होतो.  भागवत  ही  एक  जीवन  पध्दती  आहे.  अखिल  मानवांच्या  शांती,  समाधानासाठी  भागवत  अत्यंत  उपयुक्त  आहे.  ते  फक्त  आस्तिकांसाठीच  आहे,  हिंदूंसाठीच  आहे,  भक्तांसाठीच  आहे,  असे  कदापीही  नाही.  तर  भागवत  अखिल  मानवांसाठी  आहे.  भागवतातील  मुख्य  तत्त्वज्ञान  आत्मज्ञानाची  ओळख  आहे.  ही  ओळख  मनामध्ये  रूजल्यानंतर  देहाची  आसक्ती  कमी  होते.  जेव्हा  महाभारतातील  युध्दभूमीमध्ये  द्रोणाचार्यांना  आपला  पुत्र  अश्वत्थामा  मारला  गेला  हे  युधिष्ठिरा  कडून  समजले  तेव्हा  द्रोणाचार्यांचा  जीवनाचा  दृष्टीकोन  पुर्णपणे  बदलला.  त्यांनी  शस्त्रत्याग  केला   ध्यानस्थ  झाले.  आपला  पुत्र  अश्वत्थामाच  आता  या  जगात  राहीला  नाही  तर  आता  माझ्या  जीवनाला  काही  अर्थ  नाही  अशी  त्यांची  स्थिती  झाली.  हे  पुत्राच्या  बाबतीत  होते  तर  आपला  देह  म्हणजे  आपण  नाही  हे  समजल्यानंतर  काय  स्थिती  होईल.  जशी  भगवान  रमण  महर्षींची  झाली  होती.  तात्पर्य़  हेच  की  जेव्हा  देहाचीच  आसक्ती  कमी  होते  तेव्हा  मान,  अ्‌पमान,  गर्व,  अहंकार,  क्रोध,  मोह,  मत्सर  सर्व  काही  देहाचे  गळून  पडते.  हेच  आजच्या  परिस्थितीचे  मुळ  कारण  आहे.  आज  आपण  सर्वत्र  पहातो  आहे.  चोरी,  दरोडे,  खून,  मारामारी,  जाळपोळ,  हत्याकांड,  सत्तेची  हाव,  भ्रष्टाचार,  स्त्रीयांवर  अत्याचार,  इत्यादी  सर्व  काही  देहाच्या  आसक्तीमुळेच  होते  आहे.  आजच्या  काळातील  उदाहरण.  भारताचे  उपराष्ट्रपती  यांना  राष्ट्रपती  पद  मिळाले  नाही  तर  लगेच  त्यांना  मानसिक  धक्का  बसला   त्यात  त्यांचा  अंत  झाला.  राष्ट्रपती  पद  हेच  जीवनाचे  ध्येय  समजून  ते  मिळाले  तरच  जीवन  नाही  तर  जीवनाला  काही  अर्थ  नाही  अशी  त्यांची  समजूत  झाली.  असो.  भागवतातील  मुख्य  जीवनमूल्य  आत्मज्ञान  अवगत  झाल्यामुळे  आजच्या  समाजातील  देहाभिमान  संपून  आज  भेडसावणाया  सर्व  समस्या  संपुष्टात  येतील.  आजच्या  सर्व  समस्या  देहाशी  निगडीत  आहेत.  देहाभिमानाचा  विसर  झाल्यावर  एकात्मतेची  भावना  निर्माण  होइल.  मुख्य  म्हणजे  मृत्युचे  भय  रहाणार  नाही.  कारण  मृत्यु  हा  देहाचा  आहे.  आणि  आपले  खरे  स्वरूप  देह  नसून  आत्मा  आहे.  भागवताच्या  आचरणाने  वेगवेगळ्या  पातळीवर  जीवन  उध्दाराचे  बदल  दिसून  येतात.  वैयक्तीक  पातळीवर  आत्मज्ञानाची  जाण  होऊन  मनःशांती  निरोगी  शरीर  सुख  समाधान  मिळेल.  कौटुंबिक  पातळीवर  कुटूंबातील  प्रत्येकाचे  जीवन  सुखी  समृद्ध  होइल.  लहान  मुलांचे  संस्कार  त्याच  वातावरणात  चांगले  होतील.  सामाजीक  पातळीवर  एका  नवीन  समृद्ध  समाजाची  निर्मीती  होइल.  ज्या  समाजातील  प्रत्येकाची  वैचारीक  क्षमता  उदार,  विशाल  आहे.  राष्ट्रीय  पातळीवर  प्रत्येकामध्ये  विश्वबंधुत्वाची  भावना  निर्माण  होइल.  जी  आजच्या  काळाची  खरी  गरज  आहे.  ही  विश्वबंधुत्वाची  भावना  नुसतीच  धोरणे  जाहीर  करून  होत  नसते.  त्यासाठी  प्रत्येकाच्या  हृदयी  विश्वबंधुत्वाची  खरी  तळमळ  असावी  लागते.  म्हणून  या  तत्त्वज्ञानाचा  विचार  करून  त्याच्या  आचरणानेच  केवळ  मनुष्यजन्माची  सार्थकता  आहे  त्याचा  अनुभव  घ्यावा.

 स्कंध  पहिला
 या  स्कंधामध्ये  सूत  महाराजांनी  शौनकऋषींना  उपदेश  केला  आहे.  हे   श्रीमद्  भागवत  अत्यंत  गोपनीय  रहस्यात्मक  पुराण  आहे.  हे  भागवत  भगवंताच्या  स्वरूपाचा  अनुभव  करून  देणारे  असून  सर्व  वेदांचा  सारांश  आहे.  ज्याने  श्रीकृष्ण  भक्ति  होते  तोच  मनुष्याचा  सर्वश्रेष्ठ  धर्म  आहे.  ती  भक्ति  निरपेक्ष  असून  अविचलित,  अढळ  असते.  कर्म  बंधनातून  मुक्ति  आणि  भगवंताची  प्राप्ति  हेच  धर्माचे  वास्तविक  फळ  आहे.  परमसत्य  जाणण्याची  जिज्ञासा  होणे  हे  त्या  धर्माचे  उद्दीष्ट  आहे.  जो  मनुष्य  श्रध्दापुर्वक  वर्णाश्रमाचे  आचरण  करतो  आणि  महापुरूषांची  सेवा  करतो  त्यास  श्रीहरि  कथांमध्ये  गोडी  निर्माण  होऊन  परमेश्वरा  विषयी  प्रेम  उत्पन्न  होते.  भगवंताच्या  स्वरूपाचे,  गुणांचे,  लीलेचे,  नामाचे,  आणि  तीर्थक्षेत्राचे  श्रवण-कीर्तन  अत्यंत  पवित्र  आहे.  जो  मनुष्य  भगवंताच्या  अलौकीक  कथेचे  श्रध्देने  श्रवण  करतो,  त्याच्या  हृदयामध्ये  परमेश्वर  प्रगट  होतो.  त्यामुळे  त्याचे  अतःकरण  निर्मळ  होते.  तेव्हा  त्या  साधकाच्या  स्वभावातील  रजोगुण  आणि  तमोगुण  शांत  होतात.  आणि  हृदयामध्ये  सत्त्वगुण  स्थिर  होऊन  तो  अत्यंत  पवित्र  होतो.  त्यास  परमानंद  प्राप्त  होतो.  अशा  प्रकारे  मनुष्याची  भौतीक  आसक्ति  नष्ट  झाल्यामुळे  त्यास  भगवंताच्या  स्वरूपाचे  ज्ञान  होते.  त्याच्या  सर्व  शंकांचे  समाधान  होते.  कर्मयोगाच्या  आचरणाने  कर्मबंधनातून  मुक्ति  मिळते.  कलिच्या  पाच  जागा  आहेत.  १)जूगार  --  जेथे  असत्याचा  व्यवहार  होतो.  २)मद्यपान  --  त्याने  उन्मत्तपणा  येतो.  ३)स्त्रीसंग  --  यामुळे  कामवासनेमध्ये  आसक्ती  होते.  ४)हिंसा  --  तेथे  निर्दयता  वाढते.  ५)सुवर्ण  --  ज्यामुळे  लोभ  होतो.  ही  सर्व  अधर्माची  लक्षणे  आहेत.  ज्या  मनुष्यास  आपले  कल्याण  साधायचे  आहे,  त्याने  कधीही  यांचा  विचार  करू  नये.
 आमचे  ध्यान  कोणत्याही  मूर्तीमध्ये  सिमीत  नसून  ते  सर्वव्यापी  परमात्म्यामध्ये  स्थिर  झालेले  आहे.  या  परमात्म्याचे  वर्णन  केले  आहे,  ही  दिसणारी  त्रिगुणमयी  सृष्टि  भासमान  आहे,  तरी  ज्याच्या  सत्तेमुळे  ही  मायारूप  सृष्टि  सत्यवत  भासते  तोच  परमात्मा  आहे.  ज्याने  हे  विश्व  निर्माण  केलेे  तोच  पालन  आणि  संहार  करतो  त्या  सत्यरूप  परमात्म्याचे  आम्ही  एकाग्रतेने  चिंतन  करतो.  परमात्मा  सर्व  ठिकाणी  आहे.  तो  मायाकार्यापासून  मुक्त  असून  माया  त्याची  दासी  आहे.  म्हणून  तो  मायातीत  आहे.  त्याच्या  पासून  सर्वांना  ज्ञानाचा  प्रकश  मिळतो  म्हणून  तो  स्वयंप्रकाशित  आहे.  अशा  या  परमात्म्याचे  आपण  निरंतर  ध्यान  केले  पाहिजे.  त्याच  परमात्म्याने  हे  विश्व  निर्माण  केले  आहे.  तोच  या  सृष्टिचे  पालन  आणि  संहारण  करतो.  असे  त्या  परमात्म्याचे  स्वरूप  सर्वव्यापी,  विश्वात्मक  आहे.  त्या  सत्यरूप  परमात्म्याचे  आपण  सर्वांनी  अहैतुक  भक्तिने  आणि  एकाग्रतेने  चिंतन  केले  पाहिजे.  येथे  मनुष्यजन्माचे  अंतिम  उद्दीष्ट  मोक्ष  कसा  प्राप्त  करून  घ्यावयाचा  याचे  विवेचन  केलेले  आहे.  तसेच  परमधर्माचे  निरूपण  केलेले  आहे.  या  ग्रंथाचा  अभ्यास  शुध्द  अंतःकरणाच्या  पुरूषाने  करावा  असे  स्पष्ट  सांगितले  आहे.  या  ग्रंथाचा  अभ्यास  जो  अढळ  श्रध्देने  करतो,  त्याचे   आध्यात्मिक,  आधिदैविक,  आधिभौतिक  असे  तीन  प्रकारचे  ताप  नष्ट  होतात.
 आपल्या  सनातन  धर्मामध्ये  सर्व  तत्त्वज्ञानाला  वेदांचाच  आधार  आहे.  वेद  हे  कोणीही  तयार  केले  नसून  साक्षात  परमेश्वराच्या  मुखातून  प्रकट  झाले  आहेत.  ज्याप्रमाणे  गीता  उपदेशामध्ये  अर्जुनाला  विश्वरूप  पहाण्यासाठी  दिव्यदृष्टी  धारण  करावी  लागली  त्याप्रमाणे  ही  देववाणी  समजण्यासाठी  मनाची  विशालता,  व्यापकता  अत्यंत  आवश्यक  आहे.  सामान्य  जनांस  हे  वेदांतील  तत्त्वज्ञान  समजू  शकत  नाही  म्हणून  येथे  या  वेदातील  सार  तत्त्व  सोपे  करून  सांगितले  आहे.  तसेच  या  भागवतास  कल्पवृक्षाच्या  फळाची  उपमा  दिलेली  आहे.  ते  फळ  परिपक्व  झालेले  असून  परमानंदाने  रसरशीत  आहे  आणि  शुकदेवांच्या  मुखातून  हे  भागवत  शापग्रस्त  परीक्षित  राजास  सांगितलेले  असल्याने  ते  आधिक  मधूर  झालेले  आहे.  म्हणून  या  भागवत  रसाचे   निरंतर  श्रवण  करीत  रहावे  असा  भगवान  प्राप्तीचा  सोपा  मार्ग  येथे  स्पष्ट  केला  आहे.  जेव्हा  श्रीकृष्णभक्ती  अंतःकरणी  प्रगटते  तेव्हा  तात्काळ  ज्ञान  वैराग्य  प्राप्त  होते.  म्हणून  निरपेक्ष  भक्तिचे  महत्त्व  अनेक  प्रकारांनी  सांगितले  आहे.

 तसेच  एक  महत्त्वाचा  सिध्दांत  सांगितलेला  आहे,  मनुष्याने  धर्माचे  अनुष्ठान  वर्षानुवर्षे  केले  तरी  त्याच्या  हृदयात  भक्तिचा  उदय  होत  नसेल  ते  अनुष्ठान  केवळ  निरर्थक  आहे  कारण  त्याने  फक्त  रजोगुण  वाढतो.
 श्रीहरिची  कथा  श्रवण  केल्याने  मनुष्यास  श्रीहरि  कथांमध्ये  गोडी  निर्माण  होऊन  परमेश्वरा  विषयी  प्रेम  उत्पन्न  होते.  भगवंताच्या  स्वरूपाचे,  गुणांचे,  लीलेचे,  नामाचे,  आणि  तीर्थक्षेत्राचे  श्रवण-कीर्तन  अत्यंत  पवित्र  आहे.  जो  मनुष्य  भगवंताच्या  अलौकीक  कथेचे  श्रध्देने  श्रवण  करतो,  त्याच्या  हृदयामध्ये  परमेश्वर  प्रगट  होतो.  त्यामुळे  त्याचे  अंतःकरण  निर्मळ  होते.  तेव्हा  त्या  साधकाच्या  स्वभावातील  रजोगुण  आणि  तमोगुण  शांत  होतात.  आणि  हृदयामध्ये  सत्त्वगुण  स्थिर  होऊन  तो  अत्यंत  पवित्र  होतो.  त्यास  परमानंद  प्राप्त  होतो.  अशा  प्रकारे  मनुष्याची  भौतीक  आसक्ति  नष्ट  झाल्यामुळे  त्यास  भगवंताच्या  स्वरूपाचे  ज्ञान  होते.  त्याच्या  सर्व  शंकांचे  समाधान  होते.
 जो  मनुष्य  श्रीहरिची  कथा  श्रवण   करता  घर,  धन,  पति,  पत्नी,  मूले  नातेवाईक,  प्रसिध्दी,  समाजसेवा  यांच्यामध्ये  समरस  होऊन  इंद्रिय  सुखांसाठी  नेहमी  धडपड  करतो.  त्यास  कधीही  सुखशांती  मिळत  नाही.  आयुष्यभर  जरी  त्याने  खूप  कष्ट-मेहतन  केली  तरी  त्याला  मिळालेले  भौतीक  सुख  केवळ  क्षणिकच  असते.  जो  मनुष्य  श्रीहरिची  कथा  श्रवण  करीत  नाही  त्याचा  देहाभिमान  सूटत  नाही.  त्यामुळेच  त्याला  मरणानंतर  पुन्हा  जन्म  घ्यावा  लागतो  आणि  जन्म-मरणाच्या  यातना  भोगाव्या  लागतात.  ज्या  मनुष्याच्या  जीवनामध्ये  शांतीचा  अभाव  आहे.  त्याने  मनः  शांती  मिळविण्यासाठी  भागवताचा  अभ्यास  करावा.  ज्या  मनुष्यास  आत्मज्ञान  मिळविण्याची  तिव्र  इच्छा  आहे,  त्यांच्यासाठी  हे  भागवत  परमात्म्याचे  दर्शन  घडविणारा  अतुलनीय  दीपक  आहे.  यामध्ये  शुध्द  अंतःकरणाच्या  पुरूषाने  जाणून  घेण्यास  योग्य  असे  परमात्म्याचे  निरूपण  केलेले  आहे.   अज्ञानाच्या  अधंकारातून  ज्या  मनुष्यास  ज्ञानाच्या  प्रकाशाकडे  जाण्याची  तीव्र  इच्छा  आहे  त्याच्या  साठी  भागवत  अत्यंत  उपयुक्त  आहे.  श्रीहरिची  लिला  सामान्य  मनुष्यास  जाणता  येत  नाही  कारण  तो  निर्गुण  निराकार  असून  केवळ  भक्तांच्या  कल्याणासाठी  सगुणरूप  धारण  करून  अवतारकार्य  करीत  असतो.  मनुष्याची  बुध्दी  त्रिगुणात्मक  असल्यामुळे  ती  निर्गुणास  जाणण्यास  केवळ  असमर्थ  आहे.  जसे  सामान्य  मनुष्य  साध्या  वेषात  असलेल्या  कलाकाराला  पाहून  त्यास  ओळखू  शकत  नाही  तसेच  सामान्य  मनुष्य  श्रीहरिस  जाणू  शकत  नाहीे.  तसेच  सामान्य  मनुष्याची  बुध्दी  रजो   तमोगुणांनी  जड  झालेली  असल्याने  सत्त्वगुणांचाही  विसर  पडलेला  असतो.  म्हणून  त्या  सामान्य  त्रिगुणयुक्त  मनुष्यास  निर्गुण,  गुणातीत  परमात्म्यास  जाणता  येत  नाही.
 आपल्या  शास्त्रांमध्ये  सांगितलेल्या  प्रमाणे  वर्णाश्रमाचे  आचरण  करणारा  मनुष्य  उत्तम  पुरूष  आहे.  स्वधर्माचे  पालन  करून  बारा  वर्षे  गुरूगृही  राहून  ब्रह्मचर्य  व्रताने  ज्ञान  संपादन  करणे.  ज्ञान  संपादन  केल्यानंतर  तो  आपल्याच  वर्णाच्या  सुशील  कन्येशी  विवाह  करून  सुध्दा  संसारामध्ये  आसक्त  होत  नाही.  या  गृहस्थधर्माचे  कर्तव्य  पूर्ण  केल्या  नंतर  तो  मनुष्य  वानप्रस्थ  आश्रमामध्ये  प्रवेश  करतो.  तपस्या  करणे  हाच  वानप्रस्थीचा  मुख्य  धर्म  आहे.  जंगलात  पर्णकुटीमध्ये  राहून  फक्त  कंदमूळाचा,  फळाचा  आहार  घेतो.  उन-पाऊस   थंडी  अंगावर  घेऊन  शरीराची  आसक्ति  हळू-हळू  कमी  करतो.  वानप्रस्थ-व्रताचे  बारा  वर्षे  आचरण  केल्या  नंतर  ब्रह्मविचाराचे  सामर्थ्य  असेल  तर  सर्वत्याग  करून  संन्यास  ग्रहण  करतो.  कोणा  ही  व्यक्ति,  वस्तु,  स्थान  यांच्या  कडून  कशाची  ही  अपेक्षा  करीत  नाही.  तो  नेहमी  आत्मानुसंधानामध्ये  मग्न  असतो.  या  प्रमाणे  वर्णाश्रमाचे  आचरण  करणारा  मनुष्य  उत्तम  पुरूष  आहे.  भगवान  श्रीकृष्णाचे  नाम-संकिर्तन  निरंतर  केल्यामुळे  भौतिक  विषयांचे  आकर्षण  कमी  होते.  अशा  उपासनेने  श्रीकृष्ण  भक्ति  वाढते  आणि  भौतिक  वस्तुं  विषयांची  आसक्ति  कमी  होऊ  लागते.  हळू-हळू  ही  आसक्ति  कमी  होऊन  पूर्णपणे  नष्ट  झाल्यावर  परब्रह्माची  अनुभूती  येते.  आत्मसाक्षात्कार  होतो.  अशी  मनाची  स्थिती  अंतकाळी  टीकून  असेल  तर  जन्ममरणापासून  मुक्ती  मिळते.  अंतसमयी  जी  वासना  असते  त्याप्रमाणे  पुढचा  जन्म  मिळतो.  परंतू  आत्मस्वरूपाची  मनाची  स्थिती  अंतकाळी  टीकून  असेल  तर  मरणा  नंतर  पुन्हा  जन्म  घ्यावा  लागत  नाही.

No comments:

Post a Comment