शुध्द सच्चिदानंद परमेश्वराचा अवतार ही त्याची एक लीला आहे. परमेश्वर अवतार
धारण करून दुष्टांचा संहार करतात आणि सज्जनांन प्रेमानंद देतात. लोककल्याणासाठी
आदर्श लीला करतात. भगवंतास शरण जाणे हीच मनुष्यजन्माची सार्थकता आहे. सत्य हाच
परमधर्म आहे. सत्यासाठी धन, प्राण, ऎश्वर्य या सर्वांच त्याग सहजतेने केला पाहिजे.
मनुष्यजन्माचे अंतिम परमेश्वर प्राप्ती हेच आहे. ते उद्दिष्ट कर्मयोगाच्या आचरणाने
प्राप्त होऊ शकते. त्यासाठी वर्णाश्रमाचे आचरण अत्यंत आवश्यक आहे. माता-पित्याची
सेवा करणे हे पुत्राचे परम कर्तव्य आहे. स्त्रीयांसाठी पतिव्रता-धर्माचे पालन
आवश्यक आहे. पुरूषांसाठी एकपत्नी व्रताचे पालन आवश्यक आहे. भावासाठी सर्वस्वाचा त्याग करून भावासाठी सुख प्रदान करावे.
श्रीरामाच्या वनवासामध्ये लक्ष्मणाने श्रीरामाची सेवा करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग
करून वनामध्ये गेला. धर्मात्मा राजासाठी प्रजेने आपले प्राणार्पण करणे हेच प्रजेचे
कर्तव्य आहे. श्रीरामासाठी युध्दामध्ये वानरसेनेने आत्मबलिदान केले. दुष्टराजाच्या
अन्यायाचे समर्थन करू नये. दुष्ट-सख्या भावाच्या विरोधामध्ये ऊभे रहाणे हाच
परमधर्म आहे. अहंकारी रावणाच्या विरोधामध्ये बिभिषण ऊभा राहिला होता. प्रजा
रंजनासाठी आपल्या प्राण-प्रिय माणसाचा त्याग करणे हे आदर्श राजाचे कर्तव्य आहे. श्रीरामाने
प्रजेसाठी सीतेचा त्याग केला होता. स्त्रियांवर अत्याचार करण्याने शक्तीशाली
सम्राटांचा सुध्दा विनाश होतो. शक्तीशाली रावणाने सीतेचे हरण केल्यामुळे त्याचा
अंत झाला. निष्कामतेने सदा सर्वदा परमेश्वराची सेवा करावी. हनुमानाने निष्कामतेने
सदा सर्वदा श्रीरामाची सेवा केली. सवतीच्या पुत्रांवर सुध्दा प्रेम करावे.
कौसल्या, सुमित्रेने भरत व शत्रुघ्नावर प्रेम केले होते. राजाने सदैव ब्राह्मणांचा सत्कार करावा. अन्यायाचा
नेहमी विरोध करावा. शिवधनुष्य भंग समयी लक्ष्मणाने परशूरामाचा विरोध केला होता.
साधुसंताच्या रक्षणासाठी सदॆव तत्पर असावे. कुमारवयामध्ये श्रीराम-लक्ष्मणाने
विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण केले होते. आपल्याशी दुष्ट भावनेने वागणाऱ्याशी
सुध्दा आपण चांगले वागावे. श्रीराम कैकयीशी चांगलेच प्रेमाने वागत होते. भगवंताची
चरणरज प्रेमाने मस्तकी धारण केल्याने जड वस्तुला सुध्दा चैतन्य प्राप्त होते. श्रीरामाच्या चरणरज स्पर्शाने अहिल्येच्या
शीळेचा उध्दार झाला. श्रीरामाचा अवतार हा आदर्श अवतार
होता. म्हणून कुमार अवस्थेमध्ये रामायणाचा अभ्यास करून मनुष्य-जन्माची सार्थकता
प्राप्त करून घ्यावी.
Sunday, 25 February 2018
Saturday, 17 February 2018
जातीभेद ब्राह्मणांची भूमिका
ब्राह्मणांची भूमिका सनातन
वैदिक धर्मास अनुसरून आहे. सनातन वैदिक धर्माची भूमिका गुण-कर्मावर आधारलेली आहे.
सत्वगुणातून ब्राह्मणांची भूमिका ठरत असते. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अस्तेय,
अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्राणिधान, इंद्रिय-संयम, आणि मनोनिग्रह हे सत्वगुण
आहेत.
अहिंसा म्हणजे विचाराने, बोलण्याने, व कृतीने कोणाचीही हिंसा न करणे. शरीराने
कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे. बोलण्याने सुध्दा कोणालाही दुखवायचे नाही. आणि
मनाने सुध्दा कोणाच्याही बाबतीत हिंसात्मक विचार करायचा नाही. असे अहिंसेचे आचरण
करणाऱ्या ब्राह्मणांची भूमिका जातीभेदाच्या पलिकडे असते. सत्याचे सुध्दा आचरण
शरीराने, बोलणे वाणीने, व चिंतन मनाने ब्राह्मण करीत असतो. सत्य म्हणजे काय हे
समजून घेतले पाहिजे. या सृष्टीचा कर्ता करविता परमेश्वर असून तोच संपूर्ण सृष्टीमध्ये
ओतप्रोत व्यापून आहे हेच सत्य आहे, इतर सर्वकाही मायावी आहे. म्हणून आद्य
शंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्य जगत मित्थ्या. असा सत्याचा ध्यास घेतलेल्या ब्राह्मणांमध्ये
केवळ अभेद वृत्ती असते. तेथे भेदाचा विचार सुध्दा नाही. ब्रह्मचर्य म्हणजे केवळ
प्रजोत्पादनासाठी पत्नीशी समागम होय. वेदे विहीले पाणिग्रहण । ते प्रजार्थ
स्वदारागमन । परी रत्यर्थ नित्य मैथुन । हे वेदाज्ञा जाण असेना ।।ए.भा.५.२७४॥
एकनाथ महाराज म्हणतात, वेदामध्ये लग्नाचा विधी सांगितला आहे तो फक्त प्रजोत्पादनासाठी
स्वस्त्रीशी गमन करावे म्हणून आहे, परंतू केवळ रतिसुखासाठी दररोज स्त्रीसंग करावा
ही वेदाज्ञा नाही. ब्रह्मचर्य आचरणाने पत्नी विषयी आपूलकी निर्माण होते. इतर स्त्री
विषयी आदराची भावना निर्माण होते. जेथे स्त्रियांची पूजा
होते तेथे सुख-शांती
व समृध्दि असते. सुख-शांती व
समृध्दि अभेदातूनच निर्माण होत असते. भेदामुळे केवळ वैरभाव निर्माण होते. अस्तेय
म्हणजे दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ न करणे. स्वत: कष्ट करून मिळविलेल्या
पैशावरच आपला आधिकार ब्राह्मणांनी मानल्यामुळे लोभ नष्ट होतो. लोभ नसल्यामुळे
स्पर्धेचे भूत मागे लागत नाही. शांतता प्राप्त होते. भेदवृत्तीमुळे हाव संपत नाही.
अपरिग्रह म्हणजे गरजे पेक्षा आधिक
वस्तुंचा साठा न करणे. यामुळे वस्तुंचा विनीयोग समानतेने
होतो. माझ्या प्रमाणे इतर सर्वांना त्या वस्तुंचा उपभोग घेता आला पाहिजे ही
उदारता, व्यापकता निर्माण होते. ही मनाची व्यापकता अभेदातूनच निर्माण होत असते. तर
भेदातून संकुचितता प्रगट होते. शौच म्हणजे विवेकाने मनाची
व सात्विकतेने शरीराची
शुध्दता होय. मनाच्या शुध्दतेमध्ये भेद नसतो. मनाच्या शुध्दतेमध्ये
एकात्मतेची भावना असते. संतोष म्हणजे समाधानवृत्ती होय. भेदातून समाधानवृत्ती होऊच
शकत नाही. मी-माझे, तू-तूझे हीच भेदवृत्ती
आहे. परंतू संतोषामध्ये मी-तू पणा नसतो. मी-तू मध्ये मत्सर भावना असते. तप म्हणजे
उपासना होय. उपासनेचा खरा अर्थ आहे परमेश्वरा जवळ जाण्याचा मार्ग होय. परमेश्वरापाशी
भेदवृत्ती नाही, ती नास्तिकांमध्ये असते. तो परमेश्वर सर्वांना सूर्यप्रकाश, हवा,
पाणी देतो. स्वाध्याय म्हणजे धर्मशास्त्रांचा अभ्यास होय. सनातन वैदिक धर्माची
शिकवण भेदातून अभेदाकडे जाण्याची आहे. द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याची आहे. म्हणून
ब्राह्मणांची भूमिका जातीभेदाच्या पलिकडे जाणारी आहे. ईश्वरप्राणिधान म्हणजे भगवंतावर नितांत
श्रध्दा असणे. श्रध्देतून ज्ञान प्राप्त होते, तर ज्ञानानेच एकात्मता
प्राप्त होते. एकात्मतेमध्ये अभेदवृत्ती आहे. भेद हे अज्ञान आहे, ज्ञान हेच
अभेद-दर्शन आहे. इंद्रिय-संयम म्हणजे सर्व ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्यावर
नियंत्रण असणे. नाक, जिभ, डोळे, त्वचा, कान ही ज्ञानेंद्रिये व वाणी, हात, पाय, शिश्न, गुदा ही
कर्मेंद्रिये यांना विषयभोगा पासून
नियंत्रित ठेवणे हा इंद्रिय-संयम आहे. वस्तुत: ज्ञानेंद्रिये ही ज्ञान
ग्रहण करण्यासाठी असतात आणि कर्मेंद्रिये कर्म करण्यासाठी असतात. परंतु मनुष्य
त्यांचा गैरवापर करतात आणि त्यामुळे अनर्थ निर्माण होतो. ॐ भद्रं कर्णेभि: श्रृणुयाम
देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:। स्थिरैरंगैस्तुष्टुवा सस्तनूभिर्व्यशेम देवहितं
यदायु: ॥प्रश्नोपनिषद शांतिपाठ॥ ही देवांकडे केलेली प्रार्थना आहे. हे देवांनो,
आम्ही परमेश्वराची आराधना करण्यासाठी कानांनी कल्याणकारी शब्दांचे श्रवण करू,
डोळ्यांनी कल्याणकारी दृश्ये पाहु, तसेच सृदृढ शरीराने कल्याणकारी वस्तुंचा उपभोग
घेऊ. याचा भावार्थ असा आहे, कि ब्राह्मण जो काही ज्ञान ग्रहण करतो, कर्म करतो ते
सर्वकाही परमेश्वराची आराधना करण्यासाठीच करतो. परमेश्वराची आराधना करण्यामध्ये
भेदवृत्ती नसते. केवळ भौतिक उपभोगासाठी भेदवृत्ती असू शकते. परमेश्वराची आराधना
करण्यामध्ये कर्मयोग साधना आहे. कर्मयोग म्हणजे कर्म करण्याचा अहंकार सोडून
कर्मफळाची अपेक्षा न करणे. अर्जुनाने याच कर्मयोगाच्या आचरणाने महाभारत युध्द
जिंकले. शेवटचा परंतु अत्यंत महत्वाचा सदगुण आहे मनोनिग्रह. मनोनिग्रह म्हणजे मनावर
नियंत्रण होय. रामदास स्वामींनी या मनोनिग्रहासाठी २०५ श्लोकांची रचना केलेली आहे.
मनुष्याची सर्व इंद्रिये मनाच्या नियंत्रणामध्ये असतात. ब्राह्मण ते मन परमेश्वराच्या
चरणी समर्पित करतात. म्हणून त्यांचे मन अभेदवृत्तीमध्ये स्थिर असते.
अशा रितीने ब्राह्मणांची
भूमिका जातीभेदाच्या पलिकडे असते. ज्या मनुष्याचे आचरण अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरिग्रह, शौच,
संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्राणिधान, इंद्रिय-संयम, आणि मनोनिग्रह या सत्वगुणांवर आधारलेले आहे, त्यांनाच धर्मशास्त्रामध्ये
ब्राह्मण संबोधलेले आहे.
Friday, 16 February 2018
सदगुरू
भारतीय साधन-पध्दतीमध्ये सदगुरू
शरणागती सर्वप्रथम आहे. सदगुरूच्या कृपेशिवाय भक्तिसाधनेचे यथार्थ रहस्य समझत
नाही. केवळ धर्मशास्त्र-पठणाने , अध्ययनाने भगवत-प्राप्ती असंभव आहे. सदगुरू
साधनेतील धोके समजाऊन सांगून त्यापासून दक्ष कसे रहावे याचे मार्गदर्शन करतात. भगवत-प्राप्तीची
साधना शिष्यालाच करावी लागते. सदगुरू आणि भगवान या मध्ये कोणताच फरक नाही, हेच
गुरूतत्त्व आहे.
परंतू आज सदगुरू मिळणे
अत्यंत कठीण आहे. लोभी, पाखंडी अनेक गुरू पहायला मिळतात. म्हणून सदगुरूंच्या
वैशिष्ट्याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
सदगुरू शुध्द स्वभावाचा
असावा. तो जितेंद्रिय असावा. वेदशास्त्रांचा जाणकार असावा. परोपकारी असावा. दयाळु
असावा. सत्यवचनी असावा. योगविद्यामध्ये अनुभवसिध्द असावा. भगवत-भक्त असावा. धर्माचरण
करणारा असावा.
Thursday, 15 February 2018
पुरूषोत्तम-मास माहात्म्य
पुरूषोत्तम-मासाचा अभ्यास
करण्यासाठी थोडा खगोल शास्त्राचा विचार केला पाहिजे. पृथ्वी स्वत:भोवती तसेच
सूर्याभोवती फिरते. तर चंद्र पृथ्वी भोवती फिरतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास
३६५ दिवस ५तास ४८ मिनीटे लागतात. या कालावधीस सौरवर्ष म्हणतात. चंद्राला पृथ्वी भोवती फिरण्यास २९ दिवस १२ तास ४४
मिनीटे लागतात. या कालावधीस चांद्रमास म्हणतात. अशा चंद्राच्या १२ प्रदक्षिणा
होण्यास ३५४ दिवस ८तास ४८ मिनीटे लागतात. या कालावधीस चांद्रवर्ष म्हणतात. अशा
रितीने सौरवर्ष व चांद्रवर्ष यामध्ये अंदाजे ११ दिवसांचा फरक आहे. हा ११ दिवसांचा
फरक दर तीन वर्षांनंतर एका महिन्याने भरून काढला जातो. या नविन महिन्यास
पुरूषोत्तम-मास म्हणतात.
वास्तविक सूर्य स्थिर असून
पृथ्वी सूर्याभोवती फिरते. परंतू आपल्याला सूर्य फिरत असल्याचा भास होतो. या
भासमान सूर्याच्या गतीला संक्रमण म्हणतात. बारा राशीतून सूर्याचे संक्रमण होत
असते. प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातो. परंतू
चांद्रमासामुळे अंदाजे तीन वर्षांनंतर सूर्याचे संक्रमण होत एखाद्या महिन्यामध्ये
सूर्याचे संक्रमण होतच नाही. त्या महिन्यास पुरूषोत्तम-मास म्हणतात.
अशा रितीने यंदा जेष्ठ पुरूषोत्तम-मास आहे. (१६मे२०१८-१३जुन२०१८) पुरूषोत्तम-मासा मध्ये गृहप्रवेश, वास्तुशांत, विवाह, मुंज, इत्यादी संकल्पयुक्त धार्मिक कार्यांचे मुहुर्त नसतात. पुरूषोत्तम-मासा मध्ये तीर्थस्नान, दानधर्म, उपास, मौनव्रत करावीत. त्यामुळे जीवन सुखदायी व शांतीमय होते.
गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणम् । गोकुलोत्सव मीशानं गोविंदं गोपिकाप्रियम् ।।
संपूर्ण महिनाभर या मंत्राचे निरंतर पवित्र उच्चारण केल्याने पुरूषोत्तम भगवंताची प्राप्ती होते.
बृहद्नारदीय पुराणामध्ये पुरूषोत्तम-मासा मध्ये काय करावे याचा उपदेश भगवान श्रीकृष्णाने नारदास केला आहे. तो थोडक्यात असा आहे. दररोज नारायणाचे नामस्मरण करावे. मौनव्रत करून भगवंताचे चिंतन, मनन करावे. श्रीमद भागवत महापुराणाचे श्रवण, चिंतन करावे. या मासाचा स्वामी साक्षात पुरूषोत्तम असल्याने या मासास पुरूषोत्तम-मास असे म्हणतात. या पुरूषोत्तम-मासामध्ये नेहमीची भौतिक सुख-समृध्दीची कर्मे करू नये. परंतू या पुरूषोत्तम-मासामध्ये दानधर्म करावे. दररोज धात्रीस्नान करावे. आवळ्याचा गर अंगास लाऊन स्नान करणे याला धात्रीस्नान म्हणतात. बारा वर्षे गंगास्नान करून जे पुण्य मिळते तेच पुण्य या पुरूषोत्तम-मासामध्ये दररोज कोणत्याही पाण्याने धात्रीस्नान केल्याने केवळ एकाच महिन्यामध्ये प्राप्त होते.
या पुरूषोत्तम-मासामध्ये दीपदान केल्याने सौंदर्य, संपत्ती, ज्ञान व मोक्ष प्राप्त होते. सुवर्ण दान केल्याने सर्व मनोरथ पुर्ण होतात. गोदान केल्यास पापमुक्ती होते. चांदी दान केल्याने पितरांना संतुष्टी प्राप्त होते. तांब्याच्या वस्तू दान केल्याने महादेव प्रसन्न होतात. हिरे माणिकाच्या दानाने यश-किर्ती मिळते. मोती दान केल्याने मुक्ती लाभते. अंथरूण-पांघरूण दान केल्याने सर्व पापांचा नाश होतो. वस्त्र दान केल्याने शांती समाधान लाभते. लोकरीची वस्त्र दान केल्याने सर्व प्रकारच्या भिती पासून मुक्तता होते. अन्नदानाने सर्व सिध्दी प्राप्त होतात. जल दानाने अक्षय पुण्य प्राप्त होते. जे पुण्य नष्ट होत नाही त्यास अक्षय पुण्य म्हणतात. पादत्राण दान केल्याने यम-यातने पासून मुक्तता होते. धृतपात्र दान केल्याने अक्षय सूर्यलोक प्राप्त होतो. तीळपात्र दान केल्याने रूद्रलोक प्राप्त होतो. सप्तधान्य दान केल्याने सप्तर्षी प्रसन्न होतात. धृत-विलायची युक्त लाडू दान केल्याने गोलोक होतो. धृत-पक्व मोदक दान केल्याने कार्य सिध्दी प्राप्त होते. भागवत ग्रंथ दान केल्याने कुळाचा उध्दार होतो. पती-पत्नी दोघांस अनारसे पात्रासहीत दान केल्याने जन्म-मरणाच्या दुष्ट चक्रातून मुक्ती मिळते.
असे हे पुरूषोत्तम-मासा मध्ये दानाचे महत्त्व आहे. जो मनुष्य दृढ श्रध्देने दानधर्म करतो त्यास चार पुरूषार्थ प्राप्त होतात. हे दान किती, कशासाठी करावे हे सुध्दा सांगितलेले आहे. आपल्या उत्पन्नाचा पाचवा भाग दान करावे. आपल्या धनाची शुध्दी होण्यासाठी दान करावे. आपण मिळविलेल्या उत्पन्नावर इतर लोकांच्या वाईट वासना असतात. म्हणून ते उत्पन्न आपणास लाभदायक होण्यासाठी दान करावे. उदाहरणार्थ एखाद्या मनुष्याने शंभर रूपये मिळविल्यास त्याने आपले ऐशी रूपये शुध्द होण्यासाठी वीस रूपये दान करावे. तरी जो मनुष्य या पुरूषोत्तम-मासामध्ये दानधर्म करीत नाही तो महामूर्ख समजावा. कारण तो आपले कल्याण साधण्याचा प्रयत्न करीत नाही, मनुष्यजन्माचे सार्थक करून घेत नाही. खाणे, पीणे व भोग भोगणे एव्हढेच मनुष्यजन्माचे सार्थक नसून मोक्ष प्राप्ती हेच आहे.
Subscribe to:
Comments (Atom)