Monday, 20 November 2017

ऋतुंच्या वर्णनातून उपदेश




वसंत,  ग्रीष्म,  वर्षा,  शरद,  हेमंत, शिशीर असे सहा ऋतु आहेत. त्यातील वर्षा व शरद या दोन ऋतुंमध्ये निसर्ग रमणिय असतो. म्हणून शुकदेवाने परिक्षिताला या दोन ऋतुंमधील निसर्गाचे वर्णन करून तत्त्वज्ञानाचा उपदेश केलेला आहे.
प्रथम वर्षाऋतुतील निसर्गाचे वर्णन केलेले आहे. जसे काळे  ढग  वाऱ्याच्या  प्रेरणेने  आपले  जीवन, पाणी जमिनीवर सोडून देतात, तसेच  दयाळू सज्जन दुःखितांसाठी  आपल्या  प्राणांचे सुध्दा समर्पण करतात. वाळलेली  जमिन  पावसाच्या  पाण्याने  फुगू  लागते,  तसेच  तपाने  झालेले  कृषशरीर  फलप्राप्ती  नंतर  धष्ट-पुष्ट होते. जसे अंधारामध्ये  काजवे  चमकतात, तसेच  कलियुगातील  अज्ञानामुळे पाखंडी  अधर्माचा  प्रभाव  वाढतो. जसे बेडूक  पावसाच्या  गर्जनेने  डराव-डराव   करतात, तसेच  गुरूच्या  धाकाने  शिष्य  बडा-बडा वेदपठण  करतात. जसे पावसाळ्यात  लहान  नद्या  पात्र  सोडून  वाहतात, तसेच  इंद्रियाधीन  मनुष्याचे  शरीर, घर, धनसंपत्ती  कुमार्गाकडे जात असते. जसे पावसाचे  पाणी  जलचर् आणि स्थलचर  दोघांनाही  जीवन  देते, तसेच  भगवंताची  सेवा  केल्यास  अंतर्बाह्य  सौदर्य  वाढते. जसा समुद्र  तुफानामुळे    नद्यांच्या  पाण्यामुळे  खवळतो, तसेच  वासनामय  योग्याचे  चित्त  विषयांमुळे  भ्रष्ट  होते. जसे मुसळधार  पावसाने  पर्वतास  काहीच  व्यथा  होत  नाहीत, तसेच  चित्त  भगवंतास  समर्पित  केल्यावर  कोणत्याही व्यथा  नाहीत. जसे परोपकारी  मेघामध्ये  चंचल  विज  स्थिर  रहात  नाही, तसेच  चंचल  स्त्रीया  गुणी  पुरूषांपाशी  रहात  नाहीत. जसे काळे  ढग  चंद्राला  झाकून  निस्तेज   करतात, तसेच  देहाचा  अहंकार  आत्म्यास  झाकून  ठेवतो. जसे ढगांच्या आगमनाने  मोर  आनंदीत  होतात, तसेच  दुःखी  गृहस्थी  भक्ताच्या  आगमनाने  आनंदीत  होतात. जसे सुकलेले  वृक्ष  पावसामुळे  पानाफुलांनी  बहरून  जातात, तसेच तपाने  कृष  झालेले  योगी, तपस्या पुर्ण  झाल्यावर  धष्ट-पुष्ट होतात. जसे तळ्यातील  काटे  पक्ष्यास  त्रासदायक असले तरी  पक्षी तळे सोडीत  नाही, तसेच  संसारात  मनुष्यास  कटकटी असल्या तरी तो संसार सोडीत  नाही. जसे पावसाने  नद्यांचे  बांध  फुटून  वाहु  लागले,  तसेच  कलियुगातील  पाखंडांमुळे  वैदिकमार्गाची  शिस्त  नष्ट होऊ लागली. जसे ढग  वाऱ्याच्या  प्रेरणेने  पाण्याचा  वर्षाव  करतात,  तसेच  ब्राह्मणांच्या  प्रेरणेने  श्रीमंत  लोक  दानधर्म  करतात.
आता ऋतुतील निसर्गाचे वर्णन केलेले आहे. जसे सरोवरांत  कमळे  उमलल्यामुळे  पाणी  निर्मळ  झाले  तसेच  योगसाधनेमुळे  मनुष्याचे  चित्त  निर्मळ  होते. जसे पावसामुळे  जमिनीवरचा  कचरा  नष्ट  झाला, तसेच  धर्माचरणामुळे  मनुष्याचे  पाप  नष्ट  होते. जसे काळया  ढगांनी  पाण्याचा  त्याग  केल्यामुळे  शुभ्र  झाले, तसेच  ऋषींनी  सर्व  कामनांचा  त्याग  केल्याने  ते तेजस्वी होतात. जसे पर्वतावरून  कोठे  झरे  वाहतात, तर  कोठे   वाहत  नाही, तसेच  सद्गुरू पात्रतेनुसार कोणास  उपदेश  करतात, कोणास  करीत नाहीत. जसे लहान  खड्यातील  जलचरांना  पाणी  कमी  होणार  समजत  नाही, तसेच  मनुष्यास  आयुष्य  कमी  होत  आहे  समजत  नाही. जसे लहान  खड्यातील  जलचरांना  सूर्य  किरणांचा  त्रास  होतो, तसेच  दरिद्रीजनास  संसाराचा  त्रास  होत  असतो. जसे वेली  दिवसेदिवस  कोवळेपणा  सोडतात, तसेच  विवेकीमनुष्य  हळुहळु  मी-माझेपणा  सोडतो. जसे समुद्र  शांत  झाला,  तसेच  मन  संकल्प  रहित  झाल्यावर  कर्मकांड  सोडून  मनुष्य शांत  होतो. जसे शेतामध्ये  बांध  घालून  शेतकरी पाणी  अडवू  लागले, तसेच  योगीजन  इंद्रिये  संयमित  करून  ज्ञान  मिळवू  लागले. जसे फळफुलांतून वाहणाऱ्या वाऱ्याच्या स्पर्शाने गोपीजनांचा ताप नाहीसा होत होता, तसेच मनाने श्रीकृष्णांना अलिंगन देऊन गोपींचा ताप नाहीसा होत होता.

No comments:

Post a Comment