एकदा श्रीकृष्णाने
ब्रह्मदेव व सनकादिंना(सनक, सनंदन, सनातन,
आणि सनत्कुमार हे चार ब्रह्मदेवाचे ब्रह्मनिष्ठ पुत्र) हंसाचे रूप
घेऊन उपदेश केला. त्या उपदेशास हंसगीता म्हणतात.
मनाने, वाणीने, दृष्टीने
किंवा जे काही अनुभवले जाते ते सर्व मीच आहे, माझ्याशिवाय दुसरे काहीच नाही हे
तुम्ही निश्चित जाणून घ्या. मायेमुळे चित्त विषयासक्त होते आणि इंद्रिय-विषय
चित्तामध्ये वासनारूपाने असतात. परंतू विषय
आणि चित्त हे दोन्ही माझेच स्वरूप असलेल्या जीवाचे विकार आहेत. नेहमी इंद्रिय-विषयांचा
भोग घेतल्यामुळे चित्त त्या विषयांमध्ये प्रवेश करते आणि हे विषय चित्तातूनच निर्माण
होतात. म्हणून साधकाने माझ्यामध्ये एकरूप होऊन इंद्रिय-विषय आणि चित्त या दोन्हींचा
ही त्याग करावा. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या क्रमाने सात्विक, राजस, आणि तामस
गुणांपासून बनलेल्या बुध्दीच्या वृत्ती आहेत. जीव या सर्वांचा साक्षी आहे. म्हणून
साधकाने तुर्या-अवस्थेमध्ये हे बुध्दीचे बंधन तोडावे. (चार अवस्था—जागृती(जागेपण), स्वप्न, सुषुप्ति, तुर्या(शरीराकडे साक्षीभावाने अनुभवणे)
जोपर्यंत मनुष्य मी-माझे
हा अनेकत्वाचा भ्रम युक्ती-युक्तीने नष्ट करीत नाही, तोपर्यंत तो जागृत असूनही
अज्ञाननिद्रेत झोपलेलाच असतो. त्याचे हे जागेपण
स्वप्नातील जागेपणाप्रमाणे मिथ्याच असते. वास्तविक या विश्वामध्ये
आत्म्याशिवाय सर्वकाही मिथ्याच आहे. हा संसार, पृथ्वी, स्वर्ग सर्वकाही मिथ्याच
आहे. जो बाल्य, तारूण्य इत्यादी अवस्थांच्या रूपाने बदलणाऱ्या शरीरास आपल्या इंद्रियांनी
जागृत अवस्थेमध्ये उपभोगतो, तोच स्वप्नावस्थेमध्ये वासनामय पदार्थांचा मनाने उपभोग
घेतो आणि सुषुप्ति-अवस्थेमध्ये सर्व विषय आवरून ठेवतो. अशा प्रकारे जागृती, स्वप्न, सुषुप्ति, या तिन्ही अवस्थांचा अनुभव घेणारा साक्षी, चेतन आत्मा एकच
आहे. मनाच्या जागृती,
स्वप्न, सुषुप्ति, या तिन्ही अवस्था त्रिगुणांमुळेच झालेल्या असून मायेमुळेच
माझ्यामध्येच कल्पिल्या गेलेल्या आहेत. सर्व संशयांचा आधार असलेल्या अहंकाराला
ज्ञानरूपी शस्त्रांनी कापून टाका. आपल्याच ह्रदयामध्ये असलेल्या परमात्म्याचे
चिंतन करा. हे संपुर्ण ब्रम्हांड हा मनाचाच खेळ आहे, केवळ भ्रम आहे. जे जे व्यक्त झालेले आहे, ते ते
सर्व नश्वर आहे, या दृष्टीने त्या ब्रम्हांडाकडे पहावे. ही त्याची माया असल्यामुळे
स्वप्नाप्रमाणे खोटी आहे. म्हणून साधकाने हे ब्रम्हांड नजरेआड करून सर्व इच्छा
सोडून काहीही न करता स्वस्थ रहावे. आत्मानंदामध्ये मग्न असावे. दारू पिऊन धुंद
झालेल्या माणसाला आपल्या अंगावरील वस्त्रांची जाणिव नसते, तसेच आत्मज्ञानी माणसाला
शरीराची जाणिव नसते. स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्नातील गोष्टींचा स्विकार
करीत नाही, तसेच आत्मसाक्षात्कारी शरीराचा स्विकार करीत नाही. हे सांख्य व योग
शास्त्रातील गुढ तत्त्वज्ञान आहे.
No comments:
Post a Comment