Thursday, 23 November 2017

कर्मयोगाचे आचरण देशाच्या विकासासाठी




श्रीकृष्णाने अर्जुनास कर्मयोगाचा उपदेश केला, ती भगवतगीता. त्या भगवतगीतेचे महत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. अर्जुनाने कर्मयोगाचे आचरण करून निरपेक्षपणे युध्द केले. विजय मिळविला. तर दुर्योधनाने पांडवांना मारण्यासाठी युध्द केले आणि कुरूवंशातील अनेक योध्दांना मरण्यास भाग पाडून स्वत:ही मेला. म्हणून कर्मयोगाचे फलीत समजून घेतले पाहिजे. कर्मयोगाचे आचरण केल्यावर काय मिळते तर कोणत्याही अपेक्षेने कार्य केल्यावर काय पदरात पडते. अर्जुन व दुर्योधन या दोघांनीही युध्द च केले. अर्जुनाने तर आपल्या गुरूस, आजोबांस युध्दामध्ये ठार मारले. तरीही अर्जुनाची अपकीर्ती झाली नाही याचे कारण अर्जुनाचा कर्मयोग हेच आहे हे समजून घेतले पाहिजे. दुर्योधनाला एकाही पांडवास मारता आले नाही, म्हणून त्यास शांततेचा पुरस्कार मिळाला नाही याचे कारण अपेक्षेने व अहंकाराने केलेले युध्द हेच आहे.
त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनास उपदेश केला कि, तू पूर्णपणे मला शरण झालास तर तूझे कार्य मीच तूझ्या माध्यमातून करेन. विश्वरूप दर्शनामध्ये श्रीकृष्णाने च कुरूवंशातील अनेक महान योध्दांना मारल्याचे अर्जुनाने पाहिले. थोडा खोलवर विचार केल्यावर उमजते कि, मनुष्याचे शरीर कोणतेही कार्य करू शकत नाही. त्या शरीरातील आत्मा च सर्व कार्य शरीराकडून करवून घेत असतो. कारण त्या शरीरातून आत्मा निघून गेल्यावर शरीर हलू सुध्दा शकत नाही. ते निर्जीव होते. याचाच अर्थ आत्मा(परमात्म्याचा अंश) सर्व कार्य शरीराकडून करवून घेत असतो. विधायक कार्य करावे कि विघातक कार्य करावे याचे स्वातंत्र्य मनुष्यास आहे, परंतू ते कार्य करणारा कर्ता मनुष्य नाही. म्हणून मनुष्यास कर्म करण्याचा अहंकार होण्याचे कारण नाही हा सिध्दांत जितका लवकर उमजेल तितके लवकर तो मनुष्य परमसुखास प्राप्त होईल.
कोणतेही कार्य करताना फळाची अपेक्षा ठेवली की सुख-दु:ख हे दोन पर्याय पुढे येतात. अपेक्षेमध्ये सुख-दु:ख आहे. अपेक्षाच नसेल तर सुख-दु:खाचे परिणाम भोगावे लागत नाहीत. ते कार्य आपण करीत नाही अशी मनस्थिती झाल्यास कर्तृत्वाचा अहंकार नष्ट होतो. हे शरीर एक कर्माचा पुतळा आहे अशा दृष्टीने त्या शरीराकडे पहाणे हाच साक्षीभाव आहे. तीच विदेह स्थिती आहे. या स्थितीमध्ये शरीराच्या विकाराचे परिणाम भोगावे लागत नाहीत. त्या कळसुत्रीच्या बाहुल्यांना वाटते आपणच नाचतो आहे. परंतू सूत्रधार त्या बाहुल्यांना नाचवित असतो. या विदेह स्थितीमध्ये मनुष्यास परमसुखाची अनुभूती येते. शरीराचे विकार सुख-दु:ख नष्ट होते.
म्हणून कर्मयोगाचे आचरण केल्यावर प्रथम मनुष्यास परमसुख प्राप्त होते. अनेक मनुष्यांनी कर्मयोगाचे आचरण केल्यास समाजाचा विकास होईल. कारण विकास हा परमसुखावर आधारलेला असतो. केवळ भौतिक समृध्दीवर समाजाचा विकास आधारलेला नसतो. समाजाचा विकास झाल्यावर देशाचा  विकास आपोआप होत असतो.
परंतू आज प्रत्येकजण कोणत्याना कोणत्यातरी अपेक्षेने कार्य करीत आहे. शेतकरी धान्य उगविण्याच्या अपेक्षेने जमिनीची मशागत करीत आहे. कारखानदार त्याच्या वस्तुंची विक्री होण्या साठी जाहिरात करीत आहे. सर्वसामान्य नोकरदार पगार मिळविण्याच्या अपेक्षेने नोकरी करीत आहे. विद्यार्थी पदवी मिळविण्याच्या अपेक्षेने शिकत आहेत. आधिकरी काम करवून घेण्याच्या अपेक्षेने आधिकार गाजवित आहेत. व्यापारी फायदा मिळविण्याच्या अपेक्षेने व्यापार करीत आहेत. राजकीय पुढारी सत्ता मिळविण्याच्या अपेक्षेने समाजसेवा करीत आहेत. प्रवचनकार, किर्तनकार बिदागीच्या अपेक्षेने धर्मप्रसार करीत आहेत. भोंदुसाधु कीर्ती मिळविण्याच्या अपेक्षेने धर्मप्रचार करीत आहेत, इत्यादी.
म्हणून आज कोणालाही परमसुख प्राप्त होत नाही. आजच्या भयाण परीस्थितीचे मूळ कारण कर्मयोगाचा अनादर हेच आहे हे प्रत्येकाने समजून घेतलेच पाहिजे. आज नाही तर उद्या. नुसत्या गीता पठणाने, गीता प्रसाराने कोणालाही शांती-समाधान, परमसुख प्राप्त होणार नाही. अर्जुनाने कर्मयोगाचे आचरण करून विजय मिळविला हे समजून उमजून घेतले पाहिजे.
कामगारांनी संप करणे, मोर्चा-धरणे-आंदोलने करणे, ही आपली संस्कृती नाही, त्यामुळे देशाचे किती नुकसान होते हे सर्व भारतियांना ज्या दिवशी समजेल तो दिवस भारत देशासाठी भाग्याचा असेल.

No comments:

Post a Comment