Saturday, 18 November 2017

शबरीस श्रीरामांचा उपदेश




सुमारे चारशे वर्षांपूर्वी गोस्वामी तुलसीदासांनी श्रीराम चरित मानस हे महान काव्य आत्मसाक्षात्कारातून निर्माण केलेले आहे. त्यामध्ये श्रीरामांनी शबरीला नवविधा भक्तीचा  उपदेश केलेला आहे असे गोस्वामी तुलसीदास सांगतात. असा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये नाही, परंतू श्रीरामांनी शबरीला नवविधा भक्तीचा  उपदेश केलेला आहे असा उल्लेख अध्यात्म रामायणामध्ये आहे.
नवधा भगति कहउ तोहि पाहि । सावधान सुनु धरू मन माही ॥
प्रथम भगति संतन्ह कर संगा । दुसरि रति मम कथा प्रसंगा ॥
श्रीराम शबरीला नवविधा भक्तीचा  उपदेश करतात—जात-पात, कुळ, धन-संपत्ती, पराक्रम, सदगुण, व चातुर्य हे सर्व मनुष्याच्या अंगी असूनही जर त्याच्या अंगी भक्ती नसेल तर तो मनुष्य मला पाण्याशिवाय एखाद्या ढगासमान आहे. मी तुला नवविधा भक्ती सांगतो आहे. तु एकाग्रतेने ऎक आणि त्याचे मनन चिंतन, आचरण कर. पहिली भक्ती आहे, संतांचा संग करणे. संत कोणाला म्हणायचे ? तर तुलसीदास सांगतात,--ज्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, व अहंकार या सहा विकारांना नियंत्रित केले आहे, त्यांना संत म्हणावे. ते संत पापरहित, कामनारहित, त्यागी, ज्ञानी, सत्यनिष्ठ, विद्वान असतात. त्यांना स्वत:ची स्तुति ऎकायला आवडत नाही, परंतू दुसऱ्यांची स्तुति ऎकायला आवडते. संतांचे अंगी इतके गुण असतात कि, त्याचे वर्णन सरस्वती किंवा वेद सुध्दा करू शकत नाहीत. अशा संतांचा सहवास करावा, ही पहिली भक्ती आहे. दुसरी भक्ती आहे, भगवंताच्या लिलांबद्दल अविट गोडी असणे. इंद्रियविषयांच्या आवडीमुळे भगवंताकडे लक्ष द्यायला वेळ ही नसतो, आणि इच्छा ही नसते. इंद्रियविषयांचा त्याग केल्याशिवाय भगवंताबद्दल गोडी निर्माण होत नसते.
गुर पद पंकज सेवा तिसरि भगति अमान । चौथि भगति मम गुन गन करइ कपट तजि गान ॥
तिसरी भक्ती आहे, देहाभिमान नष्ट करून गुरूसेवा करणे. गुरूसेवा करणे हे देहाभिमान नष्ट करण्याचे प्रभावी साधन आहे. चौथी भक्ती आहे, निरपेक्षपणे हरिगुण संकिर्तन करणे. कोणतेही कपट-कारस्थान मनामध्ये न ठेवता भगवंताच्या लिलांचे गायन करणे, ही चौथी भक्ती आहे.
मंत्र जाप मम दृढ विश्वासा । पंचम भजन सो बेद् प्रकासा ॥
छठ दम सील बिरति भहु करमा । निरत निरंतर सज्जन धरमा ॥
पाचवी भक्ती आहे, निरंतर परमेश्चराचे स्मरण करणे. तसेच परमेश्चरावर दृढ विश्वास ठेवणे. निरंतर स्मरणाने  परमेश्चराचा ध्यास लागतो. ध्यासाने  विश्वास दृढ होउ लागतो. सहावी भक्ती आहे, इंद्रियनिग्रह, वैराग्य, धर्माचरण करणे. इंद्रियनिग्रह झाल्यावर हळुहळु भौतिक विषयांचे वैराग्य होउ लागते. हेच धर्माचरण आहे, जे सज्जन संतांचे आचरण असते.
सातवॉ सम मोहि मय जग देखा । मोते संत अधिक करि लेखा
आठवॉं जथालाभ संतोषा । सपनेहु नहि देखइ परदोषा ॥
सातवी भक्ती आहे, संपूर्ण सृष्टि भगवंतामध्ये व्याप्त आहे असा अनुभव घेणे तसेच संतांची भक्ती  भगवंतापेक्षा श्रेष्ठ मानणे व करणे. संपूर्ण सृष्टिमध्ये भगवंताचे अधिष्ठान आहे याची अनुभूती येणे ही भक्तीतील उच्च अवस्था आहे. निरंतर भगवंताचे स्मरण करण्याने सर्वत्र भगवंताचा भास होऊ लागतो. भगवान नेहमी आपल्या भक्तांना मोठे करतात. भक्तांच्या सहवासानेच भगवंताचे आकर्षण वाढू लागते. आठवी भक्ती आहे, जे काही मिळेल त्यामध्ये समाधान मानणे आणि स्वप्नामध्ये सुध्दा दुसऱ्याचे दोष न पाहणे. समाधानवृत्ती अत्यंत महत्वाची आहे. मनुष्याचा वस्तुंविषयीचा, पदार्थाविषयीचा, संपत्तीविषयीचा, मोह काही संपत नाही. ती आसक्ती वैराग्याशिवाय संपत नसते. मोह हा षडविकारापैकी एक आहे. तो नष्ट केल्यावर च समाधानवृत्ती प्राप्त होते.
नवम सरल सब सन छलहीना । मम भरोस हिय हरष न दीना ॥
नव महु एकउ जिन्ह के होई । नारि पुरुष सचराचर कोई ॥
नववी भक्ती आहे, भगवंतावर दृढ श्रध्दा ठेवणे, सुख-दु:खाच्या परिस्थितीमध्ये मन शांत ठेवणे, आप-परभाव सोडून सर्व प्राणिमात्रांशी समभावाने वागणे. भगवंतावर दृढ श्रध्दा असल्याशिवाय भगवंताची भक्ती अशक्य आहे. जसजसे भगवंताचे स्मरण केल्याने अनुभूती येऊ लागते. अनुभूती आल्यावर श्रध्दा दृढ होत असते.

No comments:

Post a Comment