Thursday, 5 October 2017

भक्तराज प्रल्हादाचा उपदेश



भक्तराज प्रल्हादाचा उपदेश
भगवंतास  शरण  हीच  मनुष्यजन्माची  सार्थकता आहे. हा मनुष्यजन्म अत्यंत दुर्लभ आहे. कारण केवळ या मनुष्यजन्मामध्येच परमात्मा प्राप्ती होउ शकते. परंतू  हा मनुष्यजन्म कधीही नष्ट होणारा नाशिवंत आहे. म्हणून मनुष्याने लहानपणापासूनच परमात्मा प्राप्ती करून देणाऱ्या साधनांचे अनुष्ठान सुरू केले पाहिजे. जसे  दुःख  प्रयत्न    करता  प्राप्त होते,  तसेच  सुख  सुध्दा  आपोआप  प्राप्त होते, त्यासाठी  प्रयत्न  म्हणजे  आयुष्य, शक्ती  वाया  घालविणे होय. लोखंड  लोहचुंबकाकडे  ओढले  जाते, तसेच  आपले चित्त  भगवंताकडे  आकृष्ट झाले पाहिजे. संसारी मायेमुळे  मनुष्याची  बुध्दी  मोहग्रस्त  होते, म्हणून  मी-माझे  पणाचा  खोटा  दुराग्रह होतो.
साधारणपणे मनुष्याचे अर्धे  आयुष्य  झोपेमध्ये  व्यर्थ होते.  बालपणी  समज  नसते, कुमारअवस्थेमध्ये  खेळण्यात  व्यर्थ होते. तरूणपणी  स्वजनांच्या  संगोपनामध्ये व्यर्थ होते. जो  जननेद्रिय    रसनेद्रियांच्या  सुखामध्ये  आसक्त, तो  स्वतःस  रेशमी  किड्यासमान  कर्मबंधनात  अडकवून  घेत असतो. जो  पत्नीच्या  मनोरंजनाचे  साधन  होऊन  तीचे  खेळणे  झाला, ज्याने  आपल्या  पायात  संतानरूपी  बेडी  अडकवून  घेतली, त्याचा  उध्दार  अशक्य आहे. भगवान  प्राप्त  करण्यास  फार  मोठे  प्रयत्न करावे लागत नाहीत, कारण  तो  सर्वांच्या  हृदयस्थ आहे. तो सर्वव्यापी, अविनाशी, परमात्मा आहे. हा  भागवतधर्म  विज्ञानासहित  परमशुध्द ज्ञानाचा  दिपस्तंभ आहे.  देहाचे सहा विकार आहेत--जन्म, अस्तित्वाची  जाणिव, वाढ, परिणाम, क्षय, विनाश(मृत्यु). तर आत्म्याची  बारा  लक्षणे आहेत--नित्य, शुध्द, एक, क्षेत्रज्ञ, आश्रय, निर्विकार, असंग,  व्यापक, स्वयंप्रकाशी, आदीकारण, आवरणशून्य, अविनाशी.
आत्मज्ञान  प्राप्तीची  अनेक  साधने असली तरी ज्याने  निष्कामप्रेम  निर्माण  होते, तोच  उपाय, तीच  साधना  सर्वश्रेष्ठ असते. स्वत:स  विद्वान समजणारा ज्या  उद्देशाने  अनेक  कर्म  करतो, प्रत्येक  वेळी त्याचा उद्देश  सफल  होत  नाहीत, खूप वेळा विफलता, उदासिनता  प्राप्त होते. कर्माचे  दोन उद्देश असतात. सुखप्राप्ती आणि दुःखनिवृत्ती.
जो  आधी  इच्छा  नसल्या  ने  सुखी असतो, त्याला  इच्छेमुळे  दुःख  भोगावे लागते. परंतू दरिद्री  नेहमी  सुखी असतो कारण त्याला कोणतीच इच्छा  नाही. याचा अर्थ सुखदुःखाचे  मुळ  इच्छेमध्ये असते.  महत्वाची  गोष्ट  ज्या  शरीराने  सुख  भोगायचे  ते  शरीर  सुध्दा  नाशीवंत, क्षणभंगुर आहे याचा विचार नेहमी केला पाहिजे.
श्रवणं  कीर्तनं  विष्णोः  स्मरणं  पादसेवनम्  । अर्चनम  वंदनं  दास्यं  सख्यमात्मनिवेदनम्।।
ही नऊ  प्रकारची  भक्ति  उत्तम  अध्ययन  पध्दती आहे.  श्रवण  म्हणजे भगवंताच्या लिला-कथा ऐकणे. किर्तन  म्हणजे  भगवंताचे गुणगान करणे. स्मरण म्हणजे  भगवंताच्या गुणांचे चिंतन करणे. पादसेवन म्हणजे  भगवंतावर अढळ  श्रध्दा असणे. अर्चन म्हणजे  भगवंतावरची अढळ  श्रध्दा व्यक्त करणे, पूजन करणे. वंदन म्हणजे  भगवंताविषयी कृतज्ञता    नम्रता असणे. दास्य म्हणजे  भगवंताची आज्ञा  पालनामध्ये  तत्परता असणे. सख्य म्हणजे  भगवंताच्या, भक्तांच्या सहवासाची इच्छा करणे, सत्संग करणे. आत्मनिवेदन  म्हणजे  भगवंतामध्ये  समर्पित  होणे.  

No comments:

Post a Comment