महाभारत
व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे । नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः ।।
महर्षी वेद व्यास हे विष्णुरूप असून व्यासरूप हेच साक्षात विष्णु आहेत. ते ब्रह्मनिधी वसिष्ठांच्या वंशातील असून त्यांना मी नमस्कार करतो.
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् । देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ।।
बदरिकाश्रमनिवासी प्रसिध्द ऋषी श्रीनारायण, नर(अर्जुन), त्यांची लीला प्रगट करणारी सरस्वती, महर्षी वेदव्यास जे अंतःकरणातील दुर्गुण नष्ट करून सत्वगुण अंतःकरणामध्ये उत्पन्न करतात त्यांना वंदन करून महाभारताचे पठण करावे
भारताध्ययनं पुण्यमपि पादम धीयतः । श्रद्दध्यानस्य पूयन्ते सर्वपापान्यशेषतः ।।
महाभारताच्या अभ्यासाने अंतःकरण शुध्द होते. अढळ श्रध्देने कोणत्याही एका श्लोकाच्या अध्ययनाने सर्व पाप संपूर्णतः नष्ट होते.
द्वैपायनेन यत् प्रोक्तं पुराणं परमर्षिमा । सुरैर्ब्रह्मर्षि भिश्चैव श्रुत्वा यदभि पूजितम् ।।
महर्षी वेद व्यासांनी या पुराणामध्ये ज्या राजर्षी, ब्रह्मर्षींचे वर्णन केले त्याची देवतांनी व ऋषींनी आपापल्या लोकामध्ये खूप स्तुती केलेली आहे.
भगवान् वासुदेवश्च कीर्त्यते-त्र सनातनः । स हि सत्यमृतं चैव पवित्रं पुण्यमेव च ।।
या महाभारताचा मुख्य विषय साक्षात परब्रह्मस्वरूप वासुदेव आहे. त्यांचेच यामध्ये संकीर्तन केले आहे. ते सत्यस्वरूप, परमपवित्र आणि पुण्यवान आहेत
शाश्वतं ब्रह्म परमं ध्रुवं ज्योतिः सनातनम् । यस्य दिव्यानि कर्माणि कथयन्ति मनीषिणः ।।
तेच शाश्वत परब्रह्म असून अविनाशी सनातन ज्योतिस्वरूप आहेत. मुमुक्षू त्यांच्या दिव्य लिलांचे संकीर्तन करतात.
आपल्या सनातन वैदिक संस्कृतीचा आधार वेद, वेदांत तत्त्वज्ञान
आहे. हे अतिप्राचीन तत्त्वज्ञान आहे. वर्णाश्रमावर आधारीत आहे.--ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यासाश्रम. वेद, वेदांत तत्त्वज्ञान अत्यंत रहस्यमय असून सामान्य मनुष्यास समजण्यास कठीण असल्याने
तेच सोपे करून वेदांत तत्त्वज्ञान उदाहरणे, कथानकाद्वारे--महाभारत, रामायण व भागवत या महाकाव्यामध्ये
प्रतित झालेले आहे. महाभारत ज्ञानप्रधान,
रामायण कर्मप्रधान
तर भागवत भक्तिप्रधान
असून महाभारत श्रध्दास्थान, रामायण आदर्शस्थान तर भागवत प्रेमाचे स्थान आहे.
या महाभारत महाकाव्यामध्ये
एकुण १८ प्रकरणे आहेत.--(१)आदिपर्व-२३३अध्याय, (२)सभापर्व-८१अध्याय, (३)वनपर्व-३१६अध्याय, (४)विराटपर्व-७२अध्याय, (५)उद्योगपर्व-१९६अध्याय, (६)भीष्मपर्व-१२२अध्याय, (७)द्रोणपर्व-२०२अध्याय, (८)कर्णपर्व-९६अध्याय, (९)शल्यपर्व-६५अध्याय, (१०)सौप्तिकपर्व-१८अध्याय, (११)स्त्रीपर्व-२७अध्याय, (१२)शांतिपर्व-३६५अध्याय, (१३)अनुसासनपर्व-१६८अध्याय, (१४)आश्वमेधिकपर्व-११३अध्याय, (१५)आश्रमवासिकपर्व-३९अध्याय, (१६)मौसलपर्व-८अध्याय, (१७)महाप्रस्थानिकपर्व-३अध्याय, (१८)स्वर्गारोहणपर्व-५अध्याय
महाभारत सार
मनुष्याने या संसारामध्ये हजारो माता-पित्यांचा तसेच शेकडो स्त्री-पुत्रांचा अनुभव केलेला आहे.
अज्ञानी मनुष्यास दररोज हजारो सुखाचे व दुःखाचे शेकडो प्रसंग प्राप्त होतात, परंतू विद्वान मनुष्याच्या मनावर त्याचा कोणताच प्रभाव होत नाही.
मी दोन्ही हात वर करून गर्जना करून सांगतो आहे, परंतू माझे कोणी ऐकतच नाही, धर्माने मोक्ष प्राप्त होतोच, परंतू अर्थ आणि काम सुध्दा प्राप्त होतो, तरी सुध्दा धर्माचे आचरण करीत नाही.
कोणत्याही इच्छेसाठी, भितीने, लोभाने, किंवा प्राण वाचविण्यासाठी सुध्दा स्वधर्माचा त्याग करू नये. धर्म नित्य आहे. सुख दुःख अनित्य आहे. तसेच जीवात्मा नित्य आहे. जीवाची बंधने अनित्य आहेत.
या महाभारताचा सारांशाने उपदेश भारतसावित्री नावाने प्रसिध्द आहे. जो दररोज पहाटे याचे पठण करतो त्यास संपूर्ण महाभारत पठणाचे फळ मिळते व त्यास परमात्मा प्राप्ती होते.
No comments:
Post a Comment