दिवाळीचे बदलत गेलेले स्वरूप
दिवाळीचे बदलत गेलेले स्वरूप समजून घेण्यासाठी दिवाळीचे सांस्कृतिक महत्त्व समजून
घेतले पाहिजे. दिवाळीच्या उत्सवामध्ये आश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरकचतुर्दशी, आश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन, तर
कार्तीक शुध्द प्रतिपदा म्हणजे पाडवा आणि
कार्तीक शुध्द द्वितीया म्हणजे भाऊबीज असे
चार मुख्य दिवस आहेत. दिवाळी हा
दिव्यांच्या सजावटीचा उत्सव आहे.
आपले जीवन प्रकाशमय व
समृध्द व्हावे हेच
दिवाळीच्या उत्सवाचे विशेष
महत्व आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे
अभ्यंगस्नान करण्याची प्रथा
आहे. अभ्यंगमर्दनाने शरीर
निरोगी व सशक्त
होते. आपल्या मनातील दुष्ट
प्रवृतींचा नाश करून
मनाची विशालता वाढविणे हे या
दिवसाचे महत्त्व. आश्विन
अमावस्येला लक्ष्मीचे पूजन
करून कृतज्ञता व्यक्त
केली जाते. कार्तीक प्रतिपदा हा
पाडव्याचा दिवस व्यापारी नवीन वर्षाचा प्रथम दिवस आहे.
व्यापारी मंडळी या
दिवशी आपल्या हिशोबांच्या नवीन वह्यांची पूजा करून नवीन वर्षाच्या उद्योगधंद्याची सुरवात करतात. या
दिवशी पत्नीने पतिराजास औक्षण करण्याची पध्दत आहे.
पति-पत्नीचे
अतूट नाते अखंडीत रहावे हा
उद्देश. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्तिक शुध्द द्वितीयेला म्हणजे भाऊबीजेला भावाला बहिणीने औक्षण करण्याची पध्दत आहे.
बहिण भावाचे प्रेम अतूट रहावे हाच
विचार.
परंतू ही संस्कृती हळुहळु बदलत गेली. एकत्र कुटुंबे विभक्त
होत गेली. घरामध्ये नविन सुन आली की ती वेगळे व्हायचा विचार करू लागली. त्यासाठी
नवीन घर, घरासाठी कर्ज, ते फेडण्याची विवंचना इत्यादी प्रश्न आपणहून निर्माण केले
गेले. मुख्य कारण एकच मनाची संकुचितता. त्यामुळे आनंद संपला. ही मनाची संकुचितता पाश्चात्य
विचारधारेतून आलेली आहे हे समजून घेतले पाहिजे. संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे ही मनाची व्यापकता विसरली जात आहे. विभक्त कुटुंबामुळे घरांची मागणी वाढली. त्यासाठी वाडे
पाडून ओनरशीप फ्लॅट झाले. चोरांच्या भितीमुळे एका दरवाज्याला
दुसरे सेफ्टी डोअर असे दोन दरवाजे झाले. दोन्ही दरवाजे नेहमी
बंद. फक्त जाणे येण्यासाठीच उघडायचे. शेजारधर्म
संपला. विभक्त कुटुंबामध्ये आई वडील दोघेही नोकरी करू लागले.
त्यामुळे फराळ, दिव्यांची रोषणाई सर्वकाही बाजारातून
विकत आणले जाऊ लागले. ते घरी स्वत:च्या हाताने करण्याचा आनंद
संपला आणि दुर्दॆव हे कि त्याची सवय झाली व त्यातच आनंद मानू लागले. आतषबाजीच्या
नविन नविन शोधामुळे धूराचे, ध्वनींचे व विचारांचे प्रदुषण वाढत चालले आहे. त्यामुळे आपले आचरण अधोगतीला जाऊ लागलेले आहे. तसेच विनाकारण पैशाचा धूर होत आहे. उदा. दहा हजार, पन्नास हजार फटाक्यांची माळ वाजविणे असा अतिरेक अनेक ठिकाणी दिसून येतो. ही दिवाळीच्या मंगल सणाची चेष्टा आहे. कारण दिवाळी हा लक्ष्मीपूजनाचा सण आहे तर आपण त्या पैशाची किंमत न करता त्याची उधळपट्टी करतो. हे चूकीचे आहे. आज
मनोरंजनाची अनेक साधने असल्याने परंपरागत रूढींचा
लोप होत आहे. उदा. रांगोळी काढणे प्रथा संपली. कारण आज बाजारामध्ये विवीध प्रकारचे
स्टिकरर्स, छाप मिळू लागले आहेत. सुहासिक उटण्यांच्या ऎवजी आकर्षक केमीकलची साबणे मिळू
लागली आहेत. आंब्याच्या पानांच्या तोरणांच्या ऎवजी आकर्षक फुलांच्या कृत्रीम माळा मिळू
लागल्या आहेत. परदेशाच्या आकर्षणाने पति, भाऊ यांना पत्नी व बहिणीकडे येता येईलच
सांगता येत नाही. विज्ञान तंत्रज्ञानाच्या साह्याने पाडवा भाऊबीज साजरी करावी
लागते. आपल्या देशामध्ये सुध्दा दळण-वळणाच्या आधुनिक विश्वामध्ये पति, भाऊ नोकरी-व्यवसाय निमित्त दूरवर रहात असतील तर ते प्रवासातून सुखरूप पत्नी व
बहिणीकडे येतीलच सांगता येत नाही. असे अनेक विषय आहेत. शब्दमर्यादेमुळे त्यांचा उल्लेख होऊ शकत नाही.
तरी दिवाळीच्या सणाचे सांस्कृतिक महत्व लक्षात घेऊन त्याची जोपासना करण्यामध्ये शहाणपणा आहे. त्यामध्ये आपले व सर्वांचेच कल्याण आहे हा विचार लक्षात घेऊन दिवाळी साजरी करावी.
या दिवाळी निमित्त आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश व सद्गुणांची समृध्दि व्हावी हीच शूभेच्छा !
! !
स्वामी मोहनदास, भारतीय तत्तज्ञान प्रसारक
एल-५०७ चंद्रमा-विश्व धायरी पुणे-४११०६८(९४२०८५९६१२)
No comments:
Post a Comment