Saturday, 1 July 2017

तरूण पिढीतील सामाजिक जाणिव


  तरूण  पिढीतील  सामाजिक  जाणिव
 आजच्या   तरूण  पिढीमध्ये  सामाजिक  जाणिवच  नाही  हे  खेदाने  नमूद  करावे  लागते  याचे  कारण  शोधायला  गेले  तर  विश्वास  बसणार  नाही.  इतका  सूक्ष्म  विचार,  खोलवर  विचार  केला  तरच  उद्याची   तरूण  पिढीमध्ये  सामाजिक  जाणिव  रुजू  लागण्याची  शक्यता  आहे.
 आजच्या  तरूणाला  आपण,  आपली  बायको,  मुले,  आणि  मित्र-मैत्रिणी  या  शिवाय  दुसरे  काही  दिसतच  नाही.  हाच  आजचा  पायाभूत  प्रश्न  आहे.  मुलाचे  लग्न  झाले  की  त्या  जोडप्याला  आई-वडील  सुध्दा  परके  होतात.  त्यांनी  दुसरीकडे  रहाण्याचा  विचार  सुरू  होतो  किंवा  जोडप्याने  दुसरीकडे  रहाण्याचा  विचार  सुरू  होतो.  जनरेशन  गॅपच्या  संयुक्तिक   भ्रामक  विचाराने  तो   तरूण  स्वस्थ  रहातो.   तरूण  पिढीमध्ये  आपल्या  आई-वडीलांच्या  बाबतीत  ही  जाणीव  दिसते  तर  समाजाचे  लांबच  राहिले.  आणि  समाज  हा  तरूण,  वृध्द,  मुले  यांच्या  पासूनच  बनलेला  असतो.  आजच्या  तरूणाला  समाजाची  गरजच  नाही,  फिकीरही  नाही.  कारण  त्याच्या  सर्व  गरजा  तो  पैसे  देऊन  पुरवितो.  तो  सर्व  व्यहार  पैशामध्येच  मोजतो.  त्यासाठी  त्याला  पैसा  मिळविणे  आवश्यक  आहे.  हा  पैसा  मिळविण्यासाठी  तो  करू  नये  ते  करतो.  त्याची  त्याला  लाज  सुध्दा  वाटत  नाही.
 आजच्या   तरूण  पिढीला  जीवनाचे  उद्दीष्ट  काय  हेच  माहित  नाही.  मनुष्यजन्माचे  ध्येय  भौतिक  सुखाचा  उपभोग  हे  नक्की  नाही.  परंतू  आजचा   तरूण  भौतिक  सुखाच्याच  मागे  धावतो  आहे.  त्या  क्षणिक  सुखासाठी  संपूर्ण  आयुष्य  खर्च  करतो,  वाया  घालवितो  आणि  एके  दिवशी  मरतो.  तरी  सुध्दा  त्याला  सुख  समाधान  मिळत  नाही.  कारण  सुख  शांती  भौतिक  सुखामध्ये  नसते.  ते  तर  नश्वर  आहे.  त्यामध्ये  कशी  परमशांती  मिळेल.  आत्मानुभूती  हेच  मनुष्यजन्माचे  उद्दीष्ट  आहे.  त्यामध्येच  सामाजिक  जाणिव  एक  भाग  आहे.  या  आत्मानुभूतीमध्ये  विश्वबंधुत्वाचा   समदर्शनाचा  विचार  आहे.  वैयक्तीक  पातळीवर  आत्मज्ञानाची  जाण  झाल्यावर  मनःशांती  निरोगी  शरीर  सुख  समाधान  मिळते.  कौटुंबिक  पातळीवर  कुटूंबातील  प्रत्येकाचे  जीवन  सुखी  समृद्ध  होऊन  लहान  मुलांचे  संस्कार  त्याच  वातावरणात  चांगले  होतात.  सामाजीक  पातळीवर  एका  नवीन  समृद्ध  समाजाची  निर्मीती  होऊन  प्रत्येकाची  वैचारीक  क्षमता  उदार,  विशाल  बनते.  राष्ट्रीय  पातळीवर  प्रत्येकामध्ये  विश्वबंधुत्वाची  भावना  निर्माण  होते.  जी  आजच्या  काळाची  खरी  गरज  आहे.  ही  विश्वबंधुत्वाची  भावना  नुसतीच  धोरणे  जाहीर  करून  होत  नसते.  त्यासाठी  प्रत्येकाच्या  हृदयी  विश्वबंधुत्वाची  खरी  तळमळ  असावी  लागते.
 हा  आजचा   तरूण  इतका  भरकटत  चाललेला  आहे.  याचे  प्रथमदर्शनी  कारण  आजुबाजूची  परिस्थिती,  समाजातील  वातावरण  हेच  आहे.  याचाच  परिणाम  या   तरूण  पिढीवर  होत  आहे.  हा  मार्ग  चूकीचा  आहे  हे  सांगणारे  वयोवृध्द  आज  शोधून  सापडत  नाहीत.  एकतर  त्यांना  चूक  काय  आणि  बरोबर  काय  हे  समजत  नाही.किंवा  दुसरे  त्याच्यामध्ये  या   तरूण  पिढीला  उपदेश  करण्याचे  धाडस  नसते.  सर्वप्रथम  आपली  चूक  काय  हे  समजले  पाहिजे,  उमजले  पाहिजे.  तरच  ती  सुधारण्याचा  प्रयत्न  शक्य  आहे.  मी  माझ्या  घरी  मोठ्या  आवाजामध्ये  गाणी  ऐकतो   यामध्ये  काय  चूक  आहे  असे  वाटत  असले  तर  मला  सामाजिक  जाणिव  कशी  होईल  ?  शेजायांना  त्याचा  त्रास  होऊ  नये  ही  जाणिव  कशी  होईल  ?  म्हणून  सामाजिक  जाणिव  होण्यासाठी  मनाची  व्यापकता  आवश्यक  आहे.  मन  जेव्हढे  संकुचित  तेव्हढी  सामाजिक  जाणिव  कमी  असते.
 या   तरूण  पिढीमध्ये  सामाजिक  जाणिवेचा  अभाव  असल्यामुळेच  आजचे  सर्व  अनिष्ट  प्रकार  रोज  घडून  येत  आहेत.  त्याची  यादी  करण्याची  गरज  नाही  कारण  ते  आपण  सर्वजण  रोज  अनुभवत  आहोत.त्याचा  विचार  गंभीरपणे  कोणीही  करीत  नाही.  आजच्या  सर्व  आर्थिक,  सामाजिक,  औद्योगिक,  शैक्षणिक,  धार्मिक,  अध्यात्मिक  मध्ये  प्रामुख्याने  सरकारचा  हस्तक्षेप  आहे.  या  सरकारचे  धोरण  चुकू  नये  याचा  प्रयत्न  ही   तरूण  पिढी  अजिबात  करीत  नाही.  साधी  गोष्ट  आहे  जर  या   तरूण  पिढीने  जर  मतदान  केले  तरी  सुध्दा  सरकारामध्ये  अमुलाग्ग्र  बदल  होऊ  शकतो.  परंतू  मतदानाच्या  दिवशी  मिळालेल्या  सुट्टीच्या  दिवशी  हे   तरूण  सहलीला  जातात.  आज  सर्व  साधारणपणे  सुशिक्षीत,  उद्योगी   तरूण  पिढी  मतदान  करीतच  नाही.  जर  त्यांनी  मतदान  केले  तर  आजची  परिस्थिती  नक्कीच  दिसणार  नाही.  आपल्या  देशामध्ये  १००     मतदान  झाल्याचे  ऐकीवात  नाही.  जेव्हा  आपण  म्हणतो  ४०   मतदान  झाले  तेव्हा  निवडून  आलेला  उमेदवार  फक्त  ४०   लोकांचेच  नेतृत्व  करतो,  उरलेल्या  ६०   लोकांचे  काय  ?  वास्तविक  या  ६०   लोकांसाठी  तो  उमेदवार  सरकारामध्ये  काम  करीत  असतो  कारण  ४०   लोक  सर्व  साधारणपणे  कोण  असतात.  ज्यांना  काही  उद्योग  नाही  फक्त  राजकरणामध्ये   सत्तेमध्ये  रस  आहे.  हे  चित्र  असे  दिसते  ज्यांना  काही  उद्योग  नाही  त्यांनी  उद्योगी   लोकांच्या  डोक्यावर  हुकूमशहा  उभा  करून  ठेवायचा.  या  परिस्थितीमध्ये  अर्थव्यवस्थेचे,  समाजव्यवस्थेचे,  न्यायव्यवस्थेचे  काय  होते  आहे  हे  आपण  पहातो  आहे.  ही  परिस्थिती  बदलण्यासाठी  उत्पन्नाचा  निकष  मताधिकाराला  लावल्यास  खुप  फरक  पडेल.  जे  लोक  उत्पन्नाचा  कर  सरकारला  देतात  त्यांनाच  मताधिकार  असावा  तसेच  मतदान  सक्तीचे  करावे.  आजची   तरूण  पिढी  याच  प्रकारामध्ये  प्रामुख्याने  असते.यामूळे  जे  लोक  देशाच्या  प्रगतीमध्ये  प्रत्यक्ष  सहभागी  आहेत  त्यांच्या  मताला  सरकारमध्ये  महत्वाचे  स्थान  मिळेल.  आज  परिस्थिती  उलटी  आहे.  या  उद्योगी  लोकांना  सरकारचे  निर्णय  पटत  नाहीत  पण  त्यांच्या  मताला  आज  कींमत  नाही  कारण  ते  आज  मतदानामध्ये  अल्पसंख्यांक  आहेत.  एकंदरीत  आपल्या  देशामध्ये  लोकशाहीचे  चित्र  असे  आहे.  सत्तालालसी  लोकांचे,  सर्वसाधारण  लोकांसाठी,  राजकारणी  लोकांनी  चालविलेले,  सरकार  म्हणजे  भारत  सरकार.  या  भारताच्या  आजच्या  लोकशाही  धोरणांचा  आज  विचार  केला  नाही  तर  उद्या  हा  प्रश्न  कोणते  रूप  धारण  करील  सांगता  येत  नाही.  ही  परिस्थिती  बदलण्यासाठी  आजच्या   तरूण  पिढीनेच  पुढाकार  घेतला  पाहिजे.  जसे  सहकारी  संस्थेच्या  अध्यक्षाच्या  निवडणूकीमध्ये  याच  संस्थेच्या  सभासदांना  मतदानाचा  आधिकार  असतो.  कारण  त्यांचाच  त्या  संस्थेच्या  कारभारामध्ये  सहभाग  असतो.  मरणावस्थेमध्ये  आलेल्या  वयोवृध्दांना  सरकार  बनविण्याचा  आधिकार  देणे  हे  कीती  मुर्खपणाचे  आहे  हे  असा  खोलवर  विचार  केला  तर  समजते,  उमजते.  याचा  अर्थ  वयोवृध्दांचा  अनादर  नक्कीच  नाही.  त्यांची  सेवा  करण्यामध्ये  त्यांचा  आदर  यथार्थपणे  व्यक्त  होतो.  असो.
 तर  सांगायचे  हेच  आहे  की  परिणामांचा  सुक्ष्म  रितीने  विचार  केल्यास  सामाजीक  जाणिव  सर्व  क्षेत्रामध्ये  दिसून  येते.  म्हणून  आजच्या  सर्व  आर्थिक,  सामाजिक,  औद्योगिक,  शैक्षणिक,  धार्मिक,  अध्यात्मिक  क्षेत्रामध्ये  प्रामुख्याने  विकास  घडवून  आणण्याची  क्षमता  आजच्या   तरूण  पिढीच्या  सामाजीक  जाणिवेमध्ये  आहे.  यामध्येच  देशाची  म्हणजेच  आपली  सर्वांचीच  समृध्दी  अ्‌वलंबून  आहे.  आज  आपल्या  देशाला  स्वातंत्र्य  मिळून  ५७  वर्षे  पुर्ण  होतील  तरी  सुध्दा  आपला  देश  समृध्द  नाही  परंतू  काही  राजकारणी  नक्कीच  कोट्याधीश  आहेत  याचे  कारण  काय  ?  त्याला  जबाबदार  कोण  ?  इतर  देशांमध्ये  समृध्दी  कशामुळे  आहे  ?  याचा  विचार  आजच्या   तरूण  पिढीलाच  करावा  लागणार  आहे,  कारण  त्यांचे  आयुष्य  अजून  बाकी  आहे.  वृध्दांचे  तर  संपत  चालले  आहे  आणि  त्यांनी  केले  नाही  म्हणून  आजच्या   तरूण  पिढीला  ते  करावे  लागणार  आहे.  आज  नाही  तर  उद्या  !!!
 अशा  रितीने   तरूण  पिढीतील  सामाजिक  जाणिवेची,  परिणामांची  विचारक्षमता  येण्यासाठी  तरूणांच्या  सर्व  शक्तिंचा   गुणांचा  विकास  म्हणजे  व्यक्तिमत्त्वाचा  विकास  होणे  आवश्यक  आहे.  शरीराची  सुदृढता   मनाची  व्यापकता  झालेली  असतील  तरच  विज्ञानाच्या  विकासाचा  विधायक  कार्यासाठी  उपयोग  केला  जातो  नाहीतर  नूसत्या  विज्ञानमयाच्या  विकासाने  विघातक  उपक्रम  निर्माण  होतात  आणि  प्रगती  होत  नाही.  हीच  गोष्ट  आज  प्रत्ययाला  येत  आहे.  विज्ञान  संपन्नतेनंतर  आनंदमयाचा  विकास  होणे  हेच  मनुष्याच्या  जीवनातील  अंतिम  उद्दिष्ट  आहे  आणि  तोच  सर्वांगीण  विकास  आहे.  तसेच  नूसत्याच  आनंदमयाच्या  विकासाने  पाखंडी,  ढोंगी,  कर्मठ  कर्मकांड  या  प्रवृत्ती  बळावतात  आणि  अंतिम  उद्दिष्टाकडे  दुर्लक्ष  होऊन  अधर्माचा  प्रभाव  वाढू  लागतो.  आजच्या  परिस्थितीचे  मूळ  कारण  हेच  आहे.

 -------स्वामी  मोहनदास,  भागवताचार्य   एल  -  ५०७   चंद्रमा-  विश्व,   धायरी,   पुणे  -  ४११०४१



No comments:

Post a Comment