Tuesday, 2 January 2018

कल्याण स्वामी




समर्थ संप्रदायामध्ये कल्याण स्वामींना समर्थ रामदास स्वामीं नंत्तरचे प्रथम स्थान आहे. ते दोघे देहाने भिन्न असले तरी अंतरंगी पूर्णत: एकरूप होते. इ.स. १६४८ ते इ.स. १६७८ पर्यंत कल्याण स्वामी हे  समर्थ रामदास स्वामीं बरोबर सावली प्रमाणे होते.  समर्थ रामदास स्वामींचे दासबोधासह सर्व साहित्य कल्याण स्वामींनी लिहीले आहे. चाफळला कल्याण स्वामींनी एकाच बैठकीमध्ये २०५ मनाचे श्लोक लिहीले. धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये असलेले २५० पानांचे कल्याणपोथा नावाचे बाड आज ही त्यांच्या लेखन कौशल्याची साक्ष देते. त्यांची झोळी ही एखाद्या गोणी एवढी मोठी असे. त्यामध्ये विवीध, लेखन साहित्य, शाई, बोरूचे टाक इ. साहित्य असे. त्यांचे हस्ताक्षर अतिशय वळ्णदार होते. कल्याण स्वामींनी  समर्थ रामदास स्वामींची लेखनसेवा अतिशय प्रेमाने केली. ते न थांबता तासन् तास लिहीत असत. समर्थ रामदास स्वामींनी काव्य सांगावे आणि कल्याण स्वामींनी  ते तत्काळ लिहून घ्यावे असे अनेकदा होत असे. ते लिहीताना खाडाखोड, विसरणे काहीच करीत नसत. ते नविन पाने कधी बनवीत, शाई कधी तयार करीत याचा पत्ता लागत नसे. याचे कारण त्यांचा योगाभ्यास होय. योगाभ्यासामुळे त्यांची एकाग्रता प्रचंड होती.
समर्थ रामदास स्वामींच्या आज्ञेनुसार सज्जनगडावरून डोमगावला गेले. सीना नदीच्या तीरावर डोमगाव या गावी मठ स्थापन करून रामदास स्वामींना अपेक्षित असलेले धर्मस्थापनेचे कार्य कल्याण स्वामींनी सुरू केली. इ.स. १६७८ ते इ.स. १७१४ या कालावधीमध्ये त्यांनी मराठवाडा, आंध्र प्रदेश, कर्नाटकच्या सीमा भागामध्ये अडीचशेहून आधिक मठांची स्थापना केली. त्यांची निस्पृहता, विरक्ती, ब्रह्मज्ञान, उपासना इत्यादि मुळे अनेकांनी कल्याण स्वामींचे शिष्यत्व स्विकारले. त्यांनी सामान्य जनतेचे प्रबोधन केले. त्यांची शरीरयष्टी अत्यंत बलबान होती. ते रोज बाराशे सूर्यनमस्कार घालत होते. दाढी व जटा वाढलेल्या असून ते जटा रूद्राक्षांनी बांधत असत. त्यांच्या अंगाला भस्म लावलेले असे. त्यांच्या दोन्ही कानांमध्ये कुंडले व हाताच्या बोटांमध्ये अंगठ्या असे. त्यांच्या हातामध्ये जपमाळ असून दंडावर हनुमानाची प्रतिमा असे. ते जानवे घालत असून भगव्या रंगाची लंगोटी घालत. त्यांच्या मुखामध्ये अखंड रामनाम असून त्यांचा स्वभाव अतिशय शांत होता. त्यांच्याकडे खूप मोठा ग्रंथ संग्रह असून कोणीही मागितल्यास ते त्यांना ग्रंथ देऊन टाकत असत. समर्थ कृपेने कल्याण स्वामींचा योगमार्गामध्ये मोठा आधिकार होता. त्यांनी अनेक तत्त्वज्ञानाचे साहित्याचे लेखन केले. त्यामध्ये महावाक्य पंचीकरण, सोलीव सुख, ध्रुवाख्यान, शुक आख्यान, चौचरणी ओव्या, आरत्या, पदे इत्यादिंचा समावेश आहे. महावाक्य पंचीकरण यामध्ये ब्रह्म-माया, जीव-जगत या विषयांचे निरूपण केलेले असून सोलीव सुख यामध्ये आत्मसाक्षात्काराचे वर्णन केलेले आहे.
समर्थ रामदास स्वामींच्या महानिर्वाणानंत्तर ३३वर्षांनी इ.स. १७१४मध्ये परंड्यास कल्याण स्वामींनी देह ठेवला. ते दर्भासनावर बसले. त्रिबंध लाऊन प्राणायाम केला आणि आपले प्राण पंचत्वात विलीन केले.

No comments:

Post a Comment