महाभारत या महाकाव्याचे रचनाकार महर्षी वेद व्यास आहेत. ते विष्णुरूप असून व्यासरूप हेच साक्षात विष्णु आहेत. याचा सरळ अर्थ असा कि, व्यास आणि विष्णु एकच आहेत. ते ब्रह्मनिधी वसिष्ठांच्या वंशातील असून त्यांना मी नमस्कार करतो. नमस्कार याचा मतितार्थ
असा कि, संपूर्ण शरणागती होय. संपूर्ण शरणागत झाल्याशिवाय
कृपाशीर्वाद मिळत नसतो. महाभारत या महाकाव्यातील सरळ अर्थ, मतितार्थ, गुढार्थ, भावार्थ
समझण्यासाठी भगवान वेद व्यासांचा कृपाशीर्वाद अत्यंत महत्वाचा आहे. ते मनुष्याच्या
अंतःकरणातील दुर्गुण नष्ट
करून सत्वगुण अंतःकरणामध्ये
उत्पन्न करतात. तसेच भगवंतांची लीला
प्रगट करणारी सरस्वतीस वंदन करून
महाभारताचे पठण करावे. कारण सरस्वती वाणीची देवता आहे. महाभारताच्या अभ्यासाने अंतःकरण शुध्द होते. अढळ श्रध्देने कोणत्याही एका श्लोकाच्या अध्ययनाने सर्व पाप संपूर्णतः नष्ट होते. त्यासाठी दृढ विश्वास पाहिजे. महर्षी वेद व्यासांनी या पुराणामध्ये ज्या राजर्षी, ब्रह्मर्षींचे वर्णन केले त्यांची देवतांनी व ऋषींनी आपापल्या लोकांमध्ये खूप स्तुती केलेली आहे. या महाभारताचा मुख्य विषय साक्षात परब्रह्मस्वरूप वासुदेव आहे. त्यांचेच यामध्ये संकीर्तन केले आहे. ते सत्यस्वरूप, परमपवित्र आणि पुण्यवान आहेत. तेच शाश्वत परब्रह्म असून अविनाशी सनातन ज्योतिस्वरूप आहेत. मुमुक्षू त्यांच्या दिव्य लिलांचे संकीर्तन करतात. आपल्या सनातन वैदिक संस्कृतीचा
आधार वेद, वेदांत तत्त्वज्ञान
आहे. हे अतिप्राचीन तत्त्वज्ञान आहे. वर्णाश्रमावर आधारीत आहे.--ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यासाश्रम. वेद, वेदांत तत्त्वज्ञान अत्यंत रहस्यमय असून सामान्य मनुष्यास समजण्यास कठीण असल्याने
तेच सोपे करून वेदांत तत्त्वज्ञान उदाहरणे, कथानकाद्वारे--महाभारत, रामायण व भागवत या महाकाव्यामध्ये
प्रतित झालेले आहे. महाभारत ज्ञानप्रधान,
रामायण कर्मप्रधान
तर भागवत भक्तिप्रधान
असून महाभारत श्रध्दास्थान, रामायण आदर्शस्थान तर भागवत प्रेमाचे स्थान आहे.
म्हणून रामायणाचे अध्ययन बालपणी, महाभारताचे अध्ययन तारुण्यामध्ये, तर भागवताचे अध्ययन वृध्दापकाळी
करावे. या महाभारत महाकाव्यामध्ये एकुण १८ प्रकरणे आहेत. महाभारतकार
त्या प्रकरणाला पर्व म्हणतात. (१)आदिपर्वामध्ये २३३ अध्याय आहेत, (२)सभापर्वामध्ये ८१ अध्याय आहेत, (३)वनपर्वामध्ये ३१६ अध्याय आहेत, (४)विराटपर्वामध्ये ७२ अध्याय आहेत, (५)उद्योगपर्वामध्ये १९६ अध्याय आहेत, (६)भीष्मपर्वामध्ये १२२ अध्याय आहेत, (७)द्रोणपर्वामध्ये २०२ अध्याय आहेत, (८)कर्णपर्वामध्ये ९६ अध्याय आहेत, (९)शल्यपर्वामध्ये ६५ अध्याय आहेत, (१०)सौप्तिकपर्वामध्ये १८ अध्याय आहेत, (११)स्त्रीपर्वामध्ये २७ अध्याय आहेत, (१२)शांतिपर्वामध्ये ३६५ अध्याय आहेत, (१३)अनुसासनपर्वामध्ये १६८ अध्याय आहेत, (१४)आश्वमेधिकपर्वामध्ये ११३ अध्याय आहेत, (१५)आश्रमवासिकपर्वामध्ये ३९ अध्याय आहेत, (१६)मौसलपर्वामध्ये ८ अध्याय आहेत, (१७)महाप्रस्थानिकपर्वामध्ये ३ अध्याय आहेत, (१८)स्वर्गारोहणपर्वामध्ये ५ अध्याय आहेत.
महाभारतकारांनी महाभारत सार
थोडक्यात सांगितले आहे, ते असे--मनुष्याने
या संसारामध्ये हजारो माता-पित्यांचा तसेच शेकडो स्त्री-पुत्रांचा अनुभव केलेला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये एकाच जन्माचा विचार केलेला नाही.
प्रत्येक जन्मामध्ये निरनिराळे माता-पिता तसेच स्त्री-पुत्र असतात, अशा ८४लक्ष योनि
सांगितलेल्या आहेत. म्हणजेच ८४लक्ष जन्म
होय. अज्ञानी मनुष्यास दररोज हजारो सुखाचे व दुःखाचे शेकडो प्रसंग प्राप्त होतात, परंतू विद्वान मनुष्याच्या मनावर त्याचा कोणताच प्रभाव होत नाही. कारण विद्वान स्वत:चे आत्मस्वरूप जाणून असतो. आत्म्यास सुख दुःख नसते, ते
सुख दुःख केवळ
देहास असते.
अज्ञानी मनुष्य
स्वत:चे आत्मस्वरूप विसरून केवळ देहास आपले मानतो, म्हणून अज्ञानी मनुष्यास
सुख दुःख प्राप्त होते. महाभारतकार
गर्जना करून सांगतात कि, धर्माने मोक्ष प्राप्त
होतोच, परंतू अर्थ
आणि काम सुध्दा
प्राप्त होतो, तरी सुध्दा
धर्माचे आचरण करीत
नाही. स्वधर्माचे आचरण केल्याने
समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होते. प्रतिष्ठेमुळे अर्थ प्राप्ती होते. अर्थ म्हणजे साधन-संपत्ती होय. त्या साधन-संपत्तीमुळे
काम
प्राप्त होतो, काम म्हणजे
इंद्रिय-विषय-भोग. भौतिक संपत्तीपासून इंद्रियसुख प्राप्त होते. आपल्या
संस्कृतीमध्ये चार पुरूषार्थ सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ,काम व मोक्ष होय. मनुष्यास
धर्माचरणाने
अर्थ व काम व सुध्दा
प्राप्त होतो, तरी सुध्दा
अज्ञानी मनुष्य धर्माचे
आचरण करीत नाही, असा खेद महाभारताचा आशय आहे. महाभारतकार
पुन्हा गर्जना करून सांगतात कि, मनुष्याने कोणत्याही इच्छेसाठी, भितीने, लोभाने, किंवा प्राण वाचविण्यासाठी सुध्दा स्वधर्माचा त्याग करू नये. धर्म नित्य आहे. सुख दुःख अनित्य आहे. तसेच जीवात्मा नित्य आहे. जीवाची बंधने अनित्य आहेत. या महाभारताचा सारांशाने उपदेश भारतसावित्री नावाने प्रसिध्द आहे. जो मनुष्य दररोज पहाटे याचे पठण करतो त्यास संपूर्ण महाभारत पठणाचे फळ मिळते व त्यास परमात्मा प्राप्ती होते.
No comments:
Post a Comment