महाभारत महाकाव्याची रचना एक लाख श्लोकांची आहे. जो मनुष्य हे महाभारत ऐकवितो व ऐकतो त्यास ब्रह्मलोक प्राप्त होतो. हे महाभारत ऋषी-मुनींनी गौरविलेले असून श्रवण करण्यासाठी
सर्वश्रेष्ठ
आहे. वेदांसमान पवित्र आहे. या महाभारतामध्ये धर्म, अर्थ यांचे पूर्णतेने निरूपण केले आहे. महाभारत श्रवणाने
मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा प्रबळ होते. जो सत्यवादी असून दानशूर आहे, त्यास अभीष्ट अर्थप्राप्ती होते.
महाभारत श्रवणाने भ्रूणहत्येसमान महापाप नष्ट होते. यात शंका नाही. विजयाची इच्छा असणा-याने याचे जरूर श्रवण करावे. या महाभारताच्या श्रवणाने राजास विजय प्राप्त होतो, तो सर्व शत्रुंना परास्त करू शकतो. पुत्रप्राप्ती होते. असे हे मंगलकारी श्रेष्ठ साधन आहे. राजपुत्र तसेच राजकन्येने अनेक वेळा श्रवण केल्याने ती वीर पुत्रास अथवा वीर कन्येस जन्म देते. भगवान वेदव्यासांनी या महाभारतास पुण्यकारी धर्मशास्त्र, उत्तम अर्थशास्त्र तसेच सर्वोत्तम मोक्षशास्त्र म्हणलेले आहे. जो या महाभारताचे वर्तमानकाळामध्ये पठण करतो आणि भविष्यकाळामध्ये श्रवण करील त्याचे पुत्र सेवापरायण नम्र होतात. जो या महाभारताचे श्रवण करतो त्याचे काया-वाचा-मने केलेले सर्व पाप नष्ट होते. जो या महाभारताचे श्रवण करतो त्याचे शरीर पुर्णतः निरोगी रहाते, तर परलोकामध्ये सृदृढ होतो. धर्मपरायण पांडवांची उज्वल कीर्तिचा प्रसार करण्यासाठी भगवान वेदव्यासांनी या महाभारताची रचना केली. जो या महाभारताचे अध्ययन करतो त्यास धनप्राप्ती, दीर्घायुष्य, आत्मज्ञानप्राप्ती, पवित्रता, वंशवृध्दी, लाभते. जो ब्राह्मण ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून चार महिने या महाभारताचे पठण करतो, तो पापमुक्त होतो. तसेच तो वेदज्ञ होतो. या महाभारतामध्ये देवता, राजर्षि, ब्रह्मर्षि तसेच भगवान श्रीकृष्ण यांची पवित्रे चरित्र असून ती कल्याणकारी आहे. या महाभारतामध्ये ब्राह्मण तसेच गोमाता यांचे माहात्म्य सांगितले असून श्रुती-स्मृतींचे वर्णन असून प्रत्येकाने
याचे नित्य श्रवण केले पाहिजे. जो मनुष्य विशेष पर्वकाळी (मुहुर्ता च्या दिवशी—(१)गुडीपाडवा, (१/२)
अक्षयतृतीया(अर्धा), (२)विजयादशमी, (३)बलिप्रतिपदा(दिवाळी-पाडवा) ब्राह्मणांना याचे श्रवण करवितो तो सनातन ब्रह्माची प्राप्ती करतो. जो राजा या महाभारताचे श्रवण करतो, तो दीर्घकाळ राज्याचा उपभोग घेतो. गर्भवतीने या महाभारताचे श्रवण केले तर ती पुत्रवती होती. कुमारी कन्येने श्रवण केले तर तीचा लवकरच विवाह होतो. वैश्याने श्रवण केले तर त्याचा व्यापार वृध्दींगत होतो. सैनिकाने श्रवण केले तर त्याचा युध्दामध्ये विजय होतो. विशेषतः ब्राह्मणाच्या मुखातून श्रवण करावे. जो दररोज याचे पठण, श्रवण करतो त्यास परमगति प्राप्त होते. दररोज यातील किमान एक श्लोकाचे, अर्ध्या श्लोकाचे, पठण-श्रवण करावे, परंतू पठण-श्रवणा शिवाय राहू नये. या महाभारतामध्ये अनेक राजर्षिंच्या विवीध प्रकारच्या जन्मांचे वर्णन आहे. निरनिराळी मंत्रसाधना सांगितलेली आहे. विवीध मतांनुसार धर्माचे स्वरूप स्पष्ट केले आहे. राजांच्या विचित्र युध्दाचे वर्णन तसेच राजांच्या अभ्युदयाच्या कथा सांगितलेल्या आहेत. या महाभारतामध्ये अनेक ऋषी, गंधर्व व राक्षसांच्या पराक्रमाचे वर्णन विस्तारपूर्वक आहे. युध्दाच्या वर्णनामध्ये रथसेना, अश्वसेना, गजसेना यांची व्युहरचना, तसेच युध्द कौशल्याचे वर्णन आहे. सारांशाने या महाभारतामध्ये सर्व विषयांचे वर्णन केलेले आहे. जो महाभारतातील श्लोकाचे, अर्ध्या श्लोकाचे, श्राध्दसमयी ब्राह्मणांना श्रवण करवितो, त्याचे श्राध्द अक्षय होते. दिवसभर मन-इंद्रियेद्वारा
केलेली पापे, तसेच अजाणतेपणे केलेली पापे महाभारताच्या
श्रवणाने नष्ट होतात. यामध्ये भरतवंशाचा विस्तार सांगितलेला
आहे, म्हणून यास महाभारत म्हणतात. जो या महाभारताच्या उत्पत्तीचा अर्थ जाणतो, तो सर्व पापातून मुक्त होतो. यामध्ये भरतवंशाच्या क्षत्रिय राजांचा महान आणि अद्भूत इतिहास आहे. म्हणून याचे निरंतर पठण केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. केलेल्या कोणत्याही कर्माचा पश्चात्ताप होत नाही. भगवान वेदव्यासांनी या महाभारताची रचना तीन वर्षांमध्ये केली. धर्मप्राप्तीसाठी महाभारताचे श्रवण करणे हितकारी आहे, त्यामुळे त्यास सिध्दी प्राप्त होतात. या पुण्यकारी महाभारताचे श्रवण केल्याने जो संतोष प्राप्त होतो, तो स्वर्गप्राप्तीमध्ये सुध्दा नाही. जो या अद्भूत महाभारताचे श्रवण करतो, आणि करवितो, त्या राजसूय आणि अश्वमेधयज्ञाचे फळ मिळते. जसे ऐश्वर्यपूर्ण समुद्र आणि महान मेरूपर्वत हे दोन्ही रत्नांचे भांडार आहे, तसेच हे महाभारत रत्नस्वरूप कथा आणि उपदेशांचे भांडार आहे. या पुण्यकारी महाभारतामध्ये वेदांचे मर्म सांगितलेले असून श्रवण केल्याने अंतःकरण पवित्र होते व उदार अंतःकरणाची वृध्दी होते. जो या अद्भूत महाभारताचे दान करतो त्यास पृथ्वी दान केल्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणन पुण्यप्राप्ती साठी व विजयप्राप्ती साठी एकाग्रतेने श्रवण करावे. धर्म, अर्थ, काम, व मोक्ष या विषयी जो उपदेश या महाभारतामध्ये सांगितलेला आहे, तसा इतर कोणत्याही ग्रंथामध्ये नाही.
No comments:
Post a Comment